पहाटपावलं - अर्थवाही अश्रू

Mrunalini-Chitale
Mrunalini-Chitale

पंचवीस ऑगस्टची संध्याकाळ. असंख्य क्रीडाप्रेमी भारतीयांची नजर दूरचित्रवाणीच्या पडद्यावर खिळलेली. स्वित्झर्लंडमध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामना, सिंधू आणि जपानच्या नाओमी ओकुहारामध्ये रंगणार होता. गेली दोन वर्षे सिंधूला रौप्यपदावर समाधान मानावं लागलं होतं. या वेळी मात्र पहिल्यापासून सामन्यावर वर्चस्व मिळवत सिंधूनं सामना जिंकला. जागतिक स्पर्धेत जगज्जेतेपद मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. जेतेपद स्वीकारताना नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणं भारतीय राष्ट्रगीताची धून वाजू लागली. ती ऐकताना सिंधूला अश्रू आवरता आले नाहीत. फक्त सिंधूलाच नाहीत, तर हा सोहळा पाहणाऱ्या अनेकांचे डोळे पाणावले. त्यामध्ये सिंधूनं खेळासाठी घेतलेले अपरिमित कष्ट, तिची निष्ठा, तिची जिद्द याविषयीचा आदर आणि कौतुक सामावलेलं होतं.

या घटनेला पंधरा दिवससुद्धा उलटले नाहीत, तो अशाच प्रकारची आसवं डोळ्यांत उभी राहिली ती सात सप्टेंबरच्या पहाटेपहाटे. आपलं चांद्रयान मजल दरमजल करत चंद्राच्या कक्षेत पोचलेलं. ‘विक्रम’ला चंद्रावर उतरताना पाहण्यासाठी लक्षावधी भारतीय टीव्हीसमोर बसून राहिलेले. यश नजरेच्या टप्प्यात आलेलं; परंतु अचानक ‘इस्त्रो’मधील शास्त्रज्ञांचे चेहरे गंभीर झाले. प्रति सेकंदाला काळजीचं सावट गडद होत गेलं. अखेरीस ‘विक्रम’शी असलेला संपर्क तुटला असल्याचं वास्तव समोर आलं. खूप अस्वस्थ, हतबल वाटावं असा क्षण. प्रगल्भ बुद्धिमत्ता नि परीक्षेची कसून तयारी असूनही यश मिळालं नाही, तर नैराश्‍य कसं दाटून येतं याचा अनुभव देणारा क्षण. अशा वेळी सावरायला गरज असते ती वडीलधाऱ्या माणसाची. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही भूमिका कसोशीनं पेलली.

‘इस्रो’तील सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक करून बाहेर पडत असता त्यांना निरोप द्यायला या मोहिमेचे शिल्पकार डॉ. के. सिवन दारापर्यंत आले. सिवन म्हणजे हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन शेतकरी ते ‘रॉकेट मॅन’ असा यशस्वी टप्पा गाठलेले शास्त्रज्ञ. आत्तापर्यंत त्यांनी आपल्या भावना रोखून धरल्या होत्या. मोदींना निरोप देताना मात्र त्यांना अश्रू अनावर झाले. सिवन यांना आलिंगन देऊन नि:शब्दपणे मोदी त्यांना थोपटत राहिले. त्यांना आश्वस्त करत राहिले. तो क्षण पाहताना अनेकांचे डोळे पाणावले. मनात आलं, सिंधूचे यश साजरं करताना डोळ्यांत उभ्या राहिलेल्या पाण्याची किंमत जशी अमूल्य होती, तेवढंच मूल्य अपयशामुळे ओघळलेल्या अश्रूंचं आहे. सिंधूनं जागतिक स्पर्धा जिंकून स्वित्झर्लंडमध्ये तिरंगा फडकवला म्हणून अभिमानानं डोळे भरून आले होते नि आज चंद्रावर राष्ट्रध्वज फडकू शकला नसला, तरी डोळ्यांत उभे राहिलेले पाणी राष्ट्रप्रेमाची भावना जागविणारे आहे. खरंच माणसाचे अश्रू कितीकिती भावना व्यक्त करू शकतात. ते सुखदु:खाला सामावून घेणारे असतात. जिद्दीला मानवंदना देणारे असतात. संवादाचे पूल साधणारे असतात नि माणसामाणसाला जोडणारेही असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com