पहाटपावलं : जीवनशिक्षणाचं बीज

Mrunalini-Chitale
Mrunalini-Chitale

दिवाळी येऊन गेली तरी पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. दिवाळीत "ओलीप्रतिपदा, धनछत्रोदशी, लक्ष्मीभिजन, जलपाडवा, भाऊभीज' अशा "व्हॉट्‌सअप' फेमस जोक्‍सचा पाऊस पडत असताना, माझं मन पन्नास एक वर्षे मागे जाऊन पोचलं. त्या वर्षीही पावसाळा संपत नव्हता, पण म्हणून किल्ला करायचा आमचा बेत कायम होता. डबे, बाटल्या वेड्यावाकड्या रचून त्यावर पोतं अंथरलं. वर माती थापून अळीव पेरलं. ही सगळी पूर्वतयारी झाल्यावर शेत, कुस्तीचा आखाडा, देऊळ, विमानतळ, धरण आणि सिंहासनाधिष्ठित शिवाजी महाराज यांच्यासह आमचा किल्ला सजला. त्या वर्षी विमानाला पारदर्शक दोरा बांधून खिडकीमागे लपलेल्या शशीनं विमानाला ओढण्याचा प्रयोग केला. विमान एकदम वर झेपावताना पाहून विनायकनं शक्कल काढली की आपला किल्ला तिकीट लावून दाखविण्याइतका भारी झाला आहे. तो अजून भारी करण्यासाठी महाराजांचं सिंहासन चांदीचं केलं.

वाड्याच्या दारात उभं राहून आम्ही ओरडायला सुरवात केली. "या. या. या. इथं प्रेक्षणीय किल्ला आहे. तिकीट ऐच्छिक.' पहिल्या दिवशी अठ्ठावीस लोक आले. देवापुढे ठेवतात तसे कुणी दहा पैसे ठेवले, तर कुणी दोन. दिवसअखेरी पाच रुपये सत्तर पैसे जमलेले पाहून चार दिवसांत आपल्याला बावीस रुपये ऐंशी पैसे मिळणार, हे मंगलनं झटपट हिशेब करून सांगितलं. त्या पैश्‍यात वडा-पावची पार्टी करायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी नानाआजोबा किल्ला पाहायला आले. किल्ल्याचं निरीक्षण करत ते म्हणाले, "हात शिंच्यांनो, महाराजांना बसायला सिगारेटच्या चांदीचं सिंहासन केलंत? कुठं फेडाल हे पाप?' त्यांचं बोलणं कुणीच मनावर घेतलं नाही. 

भाऊबिजेच्या दिवशी जाग आली ती पावसाच्या आवाजानं. धावत-पळत सर्वजण किल्ल्यापाशी पोचलो तोवर बुरुज ढासळलेले. चांदीच्या सिंहासनाच्या चिंध्या झालेल्या. अनेक मावळे धारातीर्थी पडलेले. ते दृश्‍य पाहून माझे डोळे गळायला लागले. नानाआजोबा म्हणाले, "तरी मी सांगत होतो, महाराजांना सिगारेटच्या...' त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सत्या ओरडला, "जी चित्रं जिवंत आहेत त्यांना उचला. म्हणजे पुढच्या वर्षी वापरता येतील.' स्नेहल मावळा उचलायला लागली तर मातीचा लगदा तिच्या हातात आला. तशी ती हसतच सुटली. ते पाहून सगळ्यांनी हसत-खिदळत मावळ्यांचा लगदा गोळा करायला सुरवात केली. मंगल पैश्‍यांचा डबा घेऊन आली. त्यामध्ये साडेसोळा रुपये जमल्याचं तिनं जाहीर केलं. त्याचं काय करायचं याचे मनसुबे रचण्यात सगळे दंग झाले. साधा किल्ला करताना किती गोष्टी आम्हाला शिकायला मिळायच्या. जीवनशिक्षण याहून  वेगळं ते काय असतं..?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com