पहाटपावलं : बांधिलकी

Mrunalini-Chitale
Mrunalini-Chitale

स्वातीला चित्रकलेमध्ये किती गती आहे, हे मला माहीत नव्हतं; माहीत होतं ते चित्रकलेविषयी तिला असलेलं विलक्षण प्रेम. आपली कला जोपासण्याची तिची धडपड आणि त्यासाठी आठवड्यातील दोन तासांचा तिने राखून ठेवलेला वेळ. घरदार, उच्चपदस्थ नोकरी सांभाळत आपला छंद जोपासताना तिची दमछाक व्हायची, तरीही या दोन तासांशी ती तडजोड करायची नाही.

त्यापायी घरच्यांच्या तक्रारी, मित्रमंडळींची चेष्टामस्करी याकडे ती लक्ष द्यायची नाही. तिची ही धडपड समजून घ्यायची मला इच्छा होती. अचानक मला त्याचं उत्तर मिळालं. आम्ही मित्रमंडळी महाबळेश्वरला गेलो होतो. रात्री उशिरापर्यंत गप्पा झाल्यामुळे मस्त झोपायचं ठरवलं असूनही लवकर जाग आली. बाहेर पाहिलं तर समोरच्या हिरवळीवर स्वाती बसली होती.

आजूबाजूला ब्रश नि रंग. कागदावर चित्र रंगविण्यात ती मग्न होती. आज रविवार म्हणजे चित्रकलेसाठी राखून ठेवलेला वेळ. मी गुपचूप तिच्या मागं जाऊन उभी राहिले. अधूनमधून मान वर करून ती समोर पाहत होती. निळसर पाणी. जांभळा डोंगर. गुलाबी रंगाच्या अनंत छटांसह झुकलेलं आभाळ ती कागदावर उतरवत होती. येणारेजाणारे तिच्या चित्रामध्ये डोकावत होते. पण तिचं कुणाकडेच लक्ष नव्हतं. तिचे कागद, रंग नि निसर्गाचं अथांगपण एवढंच काय ते तिचं विश्व होतं. तिला असं स्वत:तच हरवून चित्र काढताना पाहणं लोभसवाणं होतं. तिच्या चित्रापेक्षा मला फक्त तिच्याकडं पाहत राहावंसं वाटलं. मला हेही माहीत होतं की हे चित्र स्पर्धेसाठी पाठवून बक्षीस मिळवायची तिची ईर्षा नव्हती, की दिवाणखान्याची भिंत सजवायची इच्छा नव्हती. चित्राच्या निमित्तानं तिचं तिनं अवकाश निर्माण केलं होतं; जे फक्त तिचं होतं.

एखादा चित्रकार चित्र काढतो किंवा एखादा लेखक लिहितो तेव्हा त्याला जे वाटतं, जे भावतं ते कलेच्या माध्यमातून व्यक्त करायची नि दुसऱ्यापर्यंत पोचवायची त्याची धडपड असते. त्यातून काही मिळवायची इच्छा असते. प्रत्येक वेळी पैशांची अपेक्षा असते असं नाही, पण निदान कौतुकाची थाप, प्रशंसेची पावती हवीशी वाटते. त्यातूनच मग दुसऱ्याशी तुलना, स्पर्धा, चढाओढ, ताणताणाव निर्माण होण्याची शक्‍यता वाढते. बहुधा हे सारे समजून तिनं तिची कला सगळ्यांपासून दूर ठेवली होती. तिची चित्रं फक्त तिच्यासाठी होती. चित्रकलेच्या माध्यमातून तिनं स्वत:शी एक नातं जोडलं होतं. या नात्यावर तिचं मनस्वी प्रेम होतं, प्रेमाची बांधिलकी होती. समोरच्या निसर्गचित्राचा अविभाज्य भाग बनून गेलेल्या स्वातीची एकतानता मी थक्क होऊन पाहत राहिले आणि तिच्या कलेशी असलेलं तिचं नातं उलगडत गेलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com