निसर्गाला वाचवू तरच आपली धडगत!

Nature
Nature

‘कोविड-१९’ या विषाणूच्या संसर्गाला केवळ आपण जबाबदार आहोत. कोणतीही किंमत मोजून आर्थिक विकास साधण्याच्या जगभरात राबविल्या जात असलेल्या मॉडेलचा हा दुष्परिणाम आहे. सध्याच्या संकटातून बाहेर पडण्याची आपल्याला एक छोटीशी संधी आहे, ती म्हणजे भविष्यासाठी विषारी बिजांची पेरणी न करणे....

‘कोविड-१९सारखे आजार आपल्या शरीरात संसर्ग पसरविणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून होतात. यातील ७० टक्के आजार वन्यजीव व पाळीव प्राण्यांतून माणसांमध्ये संक्रमित होतात. या विषाणूंचे जनक असलेल्या वन्यप्राण्यांशी माणसाचा संपर्क वा संघर्ष झाल्यास अशा प्रकारच्या साथी मोठ्या प्रमाणावर पसरतात. सर्रासपणे होणारी जंगलतोड, शेतीचा अनियंत्रित विस्तार, तीव्र रसायने व खतांचा वापर, खाणकाम, पायाभूत विकासकामे व त्याचबरोबर जंगली प्रजातींच्या मोठ्या प्रमाणावरील शोषणामुळे संसर्गजन्य आजारांचे हे वादळ वन्यजीवांकडून मानवापर्यंत पोचले आहे. अशा प्रकारचे भाग संसर्गजन्य आजारांच्या दृष्टीने कायम असुरक्षित मानले जातात.

आपल्या कृतीमुळे पृथ्वीवरील तीनचतुर्थांश जमीन बाधीत झाली आहे, दलदलीचा ८५ टक्के प्रदेश नष्ट झाला आहे, पृथ्वीवरील ३३ टक्के जमीन व ७५ टक्के शुद्ध पाणी पिके व पाळीव प्राण्यांसाठी वापरले आहे. त्यात भर म्हणून आपण वन्यजीवांचा अनियंत्रित व्यापार केला आणि विमान वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ केली. आग्नेय आशियातील वटवाघळांमध्ये कोणतेही नुकसान न करता पसरणाऱ्या एक विषाणूने जगभरातील तीस लाख लोकांना कसे संक्रमित केले, या प्रश्‍नाचे उत्तर यातून अगदी सहज मिळते. कोविड-१९  च्या प्रसारात मानवाचाच हात असल्याचेही यातून स्पष्ट होते.

ही केवळ एक सुरुवात आहे, हे लक्षात घ्या. खरेतर, प्राण्यांतून मनुष्यात येणाऱ्या संसर्गामुळे दरवर्षी सुमारे सात लाख जणांचा मृत्यू होतो, मात्र भविष्यात मृत्यूंचे प्रमाण खूपच जास्त असेल. सस्तन प्राणी व पक्ष्यांमध्ये मानवाला संसर्ग करू शकणारे सतरा लाख अज्ञात विषाणू असल्याचे सांगितले जाते. त्यातील कोणताही एक विषाणू कोविड-१९ पेक्षा अधिक घातक आणि विध्वंसक ठरू शकतो. आपण सध्या निवडत असलेल्या पर्यायांवर काळजीपूर्वक विचार न केल्यास भविष्यातील संसर्ग सातत्याने होत राहतील, अधिक वेगाने पसरतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठे दुष्परिणाम होतील व मृत्यूचे प्रमाणही खूप अधिक असेल. सर्वप्रथम, सध्या सुरू असलेली साथ रोखण्यासाठी आपण करीत असलेले प्रयत्न भविष्यातील मोठ्या साथी आणि संकटाला आमंत्रण देणाऱ्या ठरणार नाहीत, हे निश्‍चित करावे लागेल. जगभरात अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी व जाहीर झालेल्या अब्जावधी डॉलरच्या पॅकेजमध्ये (प्रोत्साहन योजना) तीन महत्त्वाच्या गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे.

पर्यावरण नियमांचे पालन
१) पर्यावरणविषयक नियम अधिक कडक करावे लागतील व त्यांची सक्तीचे अंमलबजावणी करावी लागेल. या प्रोत्साहन योजनांमध्ये शाश्‍वत विकास आणि निसर्गपूरक कामे करणाऱ्यांनाच सवलत द्यावी लागेल. आताच्या काळात पर्यावरणविषयक नियम शिथिल करणे, शेतीमधील रासायनिक खतांवरचे निर्बंध उठवणे, विमानसेवेसारख्या प्रवास वाहतुकीला प्रोत्साहन देणे, जीवाश्‍म इंधनावर आधारित ऊर्जा प्रकल्पांना मान्यता देणे राजकीयदृष्ट्या फायद्याचे ठरू शकते. मात्र, धोरणात आवश्‍यक मूलभूत बदल न करता अशा योजना राबविल्यास हे भविष्यात येणाऱ्या मोठ्या साथीच्या आजारांसाठीचेच ‘अनुदान’ ठरेल.

२) आरोग्यविषयक धोरणे राबविताना वैश्‍विक ते स्थानिक पातळीवर ‘एकात्मिक आरोग्य’ (वन हेल्थ) हे सर्वंकष धोरण अंगीकारावे लागले. मनुष्य, प्राणी, झाडे व आपल्या पर्यावरणामधील जटिल परस्परसंबंधाचा विचार हे धोरण ठरविताना करावाच लागेल. उदा. वन मंत्रालय केवळ जंगलतोडी संदर्भातील धोरण आखते व त्याचा फायदा केवळ खासगी क्षेत्रातील कंपन्यांना होतो. याचे दुष्परिणाम सार्वजनिक आरोग्य खाते व स्थानिक नागरिकांना मोठ्या साथीच्या आजाराच्या रूपाने भोगावे लागतात. एकात्मिक आरोग्य योजना स्वीकारल्याने आपल्याला विकास योजनांमुळे नागरिक व पर्यावरणावर होणारे दूरगामी दुष्परिणाम विचारात घेणे शक्‍य होईल.

३) साथीच्या आजारांचा सर्वाधिक धोका असलेल्यांना योग्य आर्थिक मदत देणे, आरोग्य सेवा पोचविणे व त्यांच्या मानसिकतेत बदल होण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर आपल्याला भर द्यावा लागेल. याचा अर्थ संसर्गाचे ‘हॉटस्पॉट’ असलेल्या परिसरातील रुग्णालये, स्थानिकांच्या मदतीने नागरिकांचे सर्वेक्षण करून रुग्णांचा शोध घेणारे व विशेष मदत करणाऱ्यांपर्यंत आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघ पोचवावा लागेल. मोठा धोका पत्करून सुरू असलेले आर्थिक व्यवहार व त्यांमध्ये असुरक्षितपणे काम करणाऱ्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी व्यवहार्य व शाश्‍वत पर्याय देण्याचाही यामध्ये समावेश करावा लागेल. हा कोणताही परमार्थ नसून, सर्वांच्याच फायद्याची व भविष्यात जगभरात येणारे साथीचे आजार राखण्यासाठीची महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे. 

निसर्गही करेल मदत 
खरे तर, आपल्याला परिवर्तन घडवून आणणारा मोठा बदल अपेक्षित आहे. त्यावर मागील वर्षीच्या ‘आयीबीईएस ग्लोबल असेसमेंट रिपोर्ट‘मध्ये भर देण्यात आला होता. (या अहवालामध्ये येत्या काही दशकांत प्राणी व वनस्पतींच्या लाखो प्रजाती अस्तंगत होतील, असे सांगण्यात आले होते.) हे बदल मूलभूत, तंत्रज्ञानविषयक,आर्थिक व सामाजिक असतील. यामध्ये ध्येये, मूल्ये, सर्वच क्षेत्रांमध्ये सामाजिक व पर्यावरणविषयक जाणिवांचा प्रसार यांचा समावेश करावा लागेल. हे सर्व खूप भयानक आणि महागडे वाटत असले, तरी आपण सध्या मोजत असलेल्या किमतीच्या तुलनेत खूपच सौम्य आहे. `कोविड- १९ ने आपल्याला अशा प्रकारचे परिवर्तन घडवून आणण्यात स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध करणाऱ्यांचा सामना करण्याचा व नेहमीप्रमाणेच  व्यवसाय करणाऱ्यांना पायबंद घालण्याचा संदेश दिला आहे.

आपण सध्याच्या संकटावर मात करीत अधिक समर्थपणे, अधिक लवचिकपणे पुन्हा उभे राहू यात शंकाच नाही. मात्र, तसे होण्यासाठी निसर्गाचे संरक्षण करणारी धोरणे अवलंबणे गरजेचे आहे. तसे केल्यासच निसर्ग आपल्याला मदतीसाठी हात पुढे करेल...
(लेखक ‘इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टिम सर्व्हिसेस’ (आयपीबीइएस) या संस्थेत कम्युनिकेशन ऑफिसर असून, ‘सकाळ’च्या विनंतीवरून त्यांनी लेखाचे मराठी भाषांतर प्रसिद्ध करण्यास परवानगी दिली आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com