पहाटपावलं : अभिव्यक्तीची क्षमता

प्रा. राजा आकाश
Thursday, 10 October 2019

माणसांमध्ये असलेली भावना अनुभवण्याची आणि व्यक्‍त करण्याची क्षमता त्याला इतर सजीवांपेक्षा श्रेष्ठ ठरवते. तितकीच महत्त्वाची आणखी एक देणगी निसर्गानं आपल्याला दिली आहे, ती म्हणजे विचार करण्याची शक्‍ती. असे खूप प्राणी आहेत जे माणसांपेक्षा जास्त गतीने धावू शकतात, पोहू शकतात. माणसाला शक्‍य झालं नाही; पण इतर सजीव हवेत उडू शकतात. अनेक प्राणी असे आहेत, जे माणसांपेक्षा जास्त बलवान आहेत; पण असं असलं तरीही माणूस हा सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ ठरतो.

‘विचार करणे’ (टू थिंक) या शब्दांचे वेगवेगळे अर्थ डिक्‍शनरीत दिलेले आहेत. त्यातल्या काही मुद्‌द्‌यांना एकत्र करून ‘टू थिंक’, विचार करणं म्हणजे नेमकं काय ते समजून घेता येईल. विचार करणं याला वर्तमानकाळाशी संबंधित असलेला अर्थ-समस्या सोडविणं (प्रॉब्लेम सॉल्विंग), भूतकाळाशी असलेला शब्द आठवणं (रिमेंबरिंग) व भविष्यकाळाशी संबंधित अर्थ- पूर्वानुमान करणं (अँटिसिपेटिंग). या तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत.

प्रत्येकाच्या आयुष्यात क्षणोक्षणी लहान-मोठ्या समस्या सतत भेडसावत असतात. त्या सोडवत असताना, भूतकाळात अशी समस्या आली होती काय? तेव्हा काय केलं? त्या वेळचा आपला अनुभव काय आहे, ते तपासून पाहणं महत्त्वाचं असतं. एखादी समस्या नवीन असेल, तिचा अनुभव आतापर्यंत कधीच आला नसेल तर आपल्याला इतर समस्या सोडवण्यातून आलेल्या अनुभवांची पुनर्मांडणी करून नवीन समस्या सोडवण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल. एखादी कृती करताना किंवा समस्या सोडवताना त्यातून काय रिझल्ट मिळतो याचा आपण आधीच विचार करतो. ‘रिझल्ट’चा विचार करणं म्हणजेच पूर्वानुमान करणं. समजा एखादी परीक्षा द्यायची आहे, ही झाली समस्या, ‘आपण मागच्या वर्षी कसा अभ्यास केला होता.’

‘आपल्याकडून काय काय चुका झाल्या होत्या.’ ‘तेव्हा त्या कशा सोडवल्या.’ ‘आपण कुठे कमी पडलो.’ आदींचा भूतकाळाशी संबंधित विचार आधी करावा लागेल. आपल्याला नेमका कोणता रिझल्ट अपेक्षित आहे, हा भविष्याचा विचार करावा लागेल. या आधारे आपण वर्तमानकाळात अभ्यासाचं नीट नियोजन करू शकतो. पण समजा आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर? आपल्याकडे भूतकाळातील कुठलाच अनुभव नाही. त्यामुळे नेमका अभ्यास कसा करावा, अभ्यासाचं नियोजन कसं करावं, काय वाचावं, कसं व किती वाचावं हे आपल्याला कळणार नाही. आपली अपेक्षा मात्र असेल की आपला रिझल्ट चांगला यावा, आपण पास व्हावं. माणूस स्वत:च्या अनुभवातून शिकतो, तसाच तो इतरांच्या अनुभवांतूनही तितक्‍याच प्रभावीपणे शिकू शकतो. ही देणगी फक्‍त मानवालाच आहे, इतर प्राण्यांना नाही, म्हणून आपण त्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतो आणि यशस्वी होतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Raja Akash