भाष्य : चीनला आपण ओळखलेय का?

xi-jinping
xi-jinping

चीनबरोबरील ६२च्या युद्धातील चुका आपण उगाळत असतो. काही शिकण्यासाठी चुका जरूर उगाळाव्यात, पण हे करून आपले चीनच्या धोरणांबाबतचे आकलन सुधारले का? चीन आपल्यासाठी शत्रूवत्‌ आहे व त्याच्या विरोधातील लढाई जिंकायची असेल, तर आपल्याला त्याच्याबरोबरच स्वतःलाही ओळखावे लागेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘तुम्ही तुमच्या शत्रूला आणि स्वतःला ओळखत असाल, तर अगदी शंभर लढाया होऊ देत, तुम्हाला त्यांचा निकाल काय लागेल याची काळजी करायचे कारण नाही. तुम्ही स्वतःला ओळखत असाल, पण शत्रूला ओळखत नसाल, तर मात्र प्रत्येक विजयाबरोबरच तुमचा पराभवही झालेला असेल आणि तुम्ही ना स्वतःला ओळखत असाल, ना शत्रूला, तर मग प्रत्येक लढाईत तुमचा पराभवच होईल.’ 

अडीच हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये सुन त्सू नामक रणनीतिकार होऊन गेला. ‘आर्ट ऑफ वॉर’ हा त्यांचा ग्रंथ. त्यातील ही विधाने. आज चीनचा विचार करताना त्या ग्रंथातील हा भाग तरी नीट लक्षात घेतला पाहिजे. याचे कारण चीनला ओळखण्यातील चूक हा आपला इतिहासही आहे आणि वर्तमानही. त्याचे परिणाम आपण सातत्याने भोगत आहोत. चीनने मात्र कधीही ती चूक केलेली नाही. पन्नासच्या दशकात आपण ‘पंचशील’चे गोडवे गात होतो, चीनच्या गळ्यात गळे घालत होतो, तेव्हाही चीन अक्‍साई चीनमध्ये रस्तेबांधणी करीत होता, तिबेटवर कब्जा करीत होता आणि नेफा म्हणजेच आजचा अरुणाचल प्रदेश घशात घालण्याचा विचार करीत होता. आपल्या ते लक्षात आले, तेव्हा आपण दुसरी चूक केली. ती म्हणजे स्वतःला न ओळखण्याची. तेव्हाचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांच्या ‘फॉरवर्ड पॉलिसी’ने चीनला हवी ती संधी देण्याचे काम केले आणि ‘१९६२’ घडले. हा झाला इतिहासाचा भाग. तेव्हाच्या चुका आपण सतत उगाळतच आहोत. चुका जरूर उगाळाव्यात, पण कशासाठी, तर त्यातून काही शिकण्यासाठी. आपण काय केले? त्या चुकांचा देशांतर्गत राजकीय प्रचारासाठी यथेच्छ वापर केला. त्यालाही कुणाची हरकत असण्याचे कारण नाही. पण त्यातून आपले चीनच्या धोरणांबाबतचे आकलन सुधारले का? चीनला आपण नीट ओळखू लागलो का? 

जयदेव रानडे हे ‘रॉ’ या गुप्तचर संस्थेचे माजी अतिरिक्त सचिव. ‘सेंटर फॉर चायना ॲनालिसिस अँड स्ट्रॅटेजी’ या संस्थेचे ते अध्यक्ष. त्यांच्या मते चीनबाबतची आपली समज तशी कमीच. परराष्ट्र खात्यातील चीनशी संबंधित अधिकाऱ्यांकडे ती असणे आवश्‍यक. पण तेथेही फार चांगली परिस्थिती नाही. राजकारण्यांच्या पातळीवर न बोललेलेच बरे. याचा परिणाम स्वाभाविकच चीनविषयक आपल्या धोरणांवर होत असतो. चीनच्या ताज्या आक्रमणाने- आणि हे आक्रमण साधेसुधे नाही. १९६२ नंतरचे हे सर्वांत मोठे आक्रमण आहे. त्याने हे दाखवून दिले आहे, की चीनबाबतची आपली निद्रा दुहेरी आहे. एक - गुप्तचरांच्या पातळीवरची आणि दुसरी - आकलनाबाबतची. चीनकडे अत्यंत लघुदृष्टीने पाहणे हे सातत्याने आपल्याला नडते आहे. रानडे सांगतात, की चीनच्या दृष्टीने शंभरेक वर्षे म्हणजे जणू निमिषभराचा कालावधी. त्यांचा धोरणविचार फारच लांबचे पाहणारा असतो. 

हाच मुद्दा वेगळ्या प्रकारे मांडला आहे केंद्र सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार शंकर आचार्य यांनी. ‘इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन’ या संस्थेत मानद प्रोफेसर म्हणून सध्या ते काम करतात. त्यांनी तब्बल चौदा वर्षांपूर्वी एका लेखातून चीनच्या भारतविषयक दृष्टिकोनावर प्रकाश टाकला होता.

चीनच्या काल्पनिक प्रमुख रणनीतीकाराची काल्पनिक मुलाखत अशा स्वरूपातील त्या लेखातील काही मुद्दे आजही महत्त्वाचे ठरतात. त्यातील पहिला मुद्दा आहे तो भारताच्या विकासाचा. पन्नासच्या दशकापासूनच चीनने हे ओळखले आहे की आशियाच नव्हे, तर जागतिक स्तरावर आपला खरा स्पर्धक असेल तो भारत. तेव्हा त्याला कमकुवत ठेवण्यातच आपले हित आहे. तेव्हापासून चिनी राज्यकर्त्यांनी ती ‘लाइन’ सोडलेली नाही.

६२ चे युद्ध असो की भारताच्या पश्‍चिम सीमेवर पाकिस्तानच्या माध्यमातून सातत्याने तणाव ठेवण्याचे राजकारण असो, हे सारे त्याच भूमिकेचे भाग होते. आर्थिक प्रगतीच्या बाबतीत बोलायचे, तर ६२च्या युद्धाने भारताची पंचवार्षिक योजना पाच वर्षे मागे ढकलली गेली. पुढे इंदिरा गांधी आणि त्यांचे लोकानुनयी समाजवादी, राष्ट्रवादी अर्थकारण यामुळे भारतातील उद्योगविश्व तब्बल पंधरा वर्षे मागे पडले. चीन मात्र त्याच काळात जागा झाला. बाजार आणि उद्योजकता यांचे विकासाच्या राजकारणातील स्थान चीनच्या तेव्हाच लक्षात आले होते. भारताला ती जाग येण्यास नव्वदचे दशक उजाडावे लागले. परिणाम? चीनचा दरडोई विकास दर भारताच्या दुप्पट आहे. आचार्य हे चौदा वर्षांपूर्वीचे सांगत आहेत. आजही त्यात फारसा बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत चीनशी भारत स्पर्धा कशी करणार असा त्यांचा प्रश्न आहे. 

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा आपल्याला फार अभिमान. पण या क्षेत्रातही चीनने बाजी मारलेली आहे. ‘टिकटॉक’सारखे ॲप भारतात येते, घरोघरी पोचते. त्यावर बंदी घातल्यानंतर एका अंदाजानुसार त्याचा भविष्यातील तोटा सहा अब्ज डॉलर असेल, हे ऐकून आपण चीनला कसा धडा शिकवला म्हणत आपलीच पाठ थोपटून घेतो. येथे वास्तविक हा विचार करायला हवा होता, की आपल्याकडे असे एखादे स्वदेशी आणि ‘ओरिजिनल’ भारतीय ॲप का बनू शकले नाही? सगळीच उचलेगिरी का? डिजिटल इंडिया ही ‘आयटी कुलीं’चीच असणार का? आज आपण भारताच्या ‘लोकसांख्यिक लाभांशा’बाबत बोलत असतो. पण त्यात फारसा अर्थ नाही. याचे कारण बेरोजगारी, जुनाट कामगार कायदे, त्यातील सुधारणांना होणारा विरोध ही चौदा वर्षांपूर्वीची वस्तुस्थिती आजही फार बदलेली नाही. 

चीनला भारतीय स्पर्धेचे भय न वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे दर्जेदार आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याच्या इच्छाशक्तीचा भारतात असलेला अभाव. यातील केवळ आरोग्यसेवेकडे पाहा. ‘कोरोना’काळाने तिचे पितळ रीतसर उघडे पाडले आहे. आचार्यांच्या लेखातील तो चिनी रणनीतीकार म्हणतो, की भारतीय राजकारणी, नोकरशहा आणि वेतन आयोग हे सगळे मिळून सार्वजनिक पैशांतला बराचसा वाटा आपल्याच भाऊबंदांच्या पगारावर उधळतील. आणि समजा निधी उपलब्ध झाला, तरी येथील राजकीय-प्रशासकीय व्यवस्था इतकी सडली आहे की तिच्यात मोठे प्रकल्प आखण्याची आणि यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेण्याची क्षमताच उरलेली नाही.

आळस, अकार्यक्षमता, राजकीय स्पर्धा आणि भ्रष्टाचार हे सगळे मिळून प्रकल्पाच्या अंमलबजावणीला चाप लावतील. हे आजही आपल्याकडे दिसते आहे. यात भर म्हणजे आपल्याकडील सामाजिक समस्या. आचार्य यांनी त्यासंदर्भात आरक्षणाच्या वादाचा मासला देत असे भाकीत केले होते, की मागासलेपणा आणि असमानता या समस्यांच्या सोडवणुकीबाबतची कमालीची वाईट पद्धत भारतातील खासगी क्षेत्रातही घुसेल. त्यातूनच येथील समाजात गुणवत्ता आणि कार्यक्षमता यांचे अवमूल्यन होईल. हे सगळे पाहता भारताची विकासदरातील वाढ ही एक तात्पुरती बाब आहे. चीनने त्याची काळजी करण्याचे कारण नाही. 

चीन भारतीय समाजाकडे कोणत्या नजरेने पाहतो, भारताबाबतच्या चिनी धोरणांना कोणती पार्श्वभूमी आहे हे यातून समजते. हे आपल्याला माहीत नव्हते असे नाही. पण सुमारे दीड दशकापूर्वी लिहिलेला तो लेख आजही तेवढाच ताजा वाटतो आहे, ही आपली समस्या आहे. चीन हा आपल्यासाठी शत्रूवत्‌ आहे आणि त्याच्या विरोधातील लढाई जिंकायची असेल, तर आपल्याला त्याच्याबरोबरच आपल्या स्वतःलाही ओळखावे लागेल. सुन त्सूचे म्हणणे हेच तर आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com