भाष्य : खेळू आनंदे राखून ‘अंतरे’

Sports
Sports

नजीकच्या काळात खेळांचे स्वरूप कसे असेल, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. केवळ खेळाच्याच नव्हे, तर त्यातील आनंद व्यक्त करण्याच्या पद्धतीही बदलणार आहेत. सर्व बंधने पाळून, त्यासाठी  सवयीच्या काही गोष्टी बाजूला ठेवून खेळाडूंना स्वतःचे कसब दाखवता येईल.

साऱ्या जगाला कोंडीत पकडणाऱ्या ‘कोरोना’ने, इतर उद्योगांबरोबर क्रीडा जगतालाही बंद करून ठेवले आहे. तसे पाहिले तर आता क्रीडा क्षेत्रालाही बऱ्याच प्रमाणात उद्योगाचेच स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात तेथे पैसा गुंतला आहे आणि सामने, स्पर्धा बंद झाल्याने, अनेक खेळ संघटनांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. शिवाय अनेक खेळांचा सराव घरात करता येत नाही, त्यामुळे खेळाडूंच्या कौशल्यावरही गंज चढत आहे. सामन्यांआधी काही काळ तरी सराव हवा, याबाबत त्यांचा आग्रह आहे. म्हणजेच बंदी उठली आणि लगेच खेळ सुरू झाले, असे चित्र दिसण्याची शक्‍यतता नाही. त्यासाठी टप्प्याटप्प्यानेच प्रयत्न करावे लागतील. मात्र काही देशांत दोन महिने चाललेली बंदी थोड्या प्रमाणात उठली आहे किंवा लवकरच उठण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे खेळाडूंमध्येही थोड्याफार प्रमाणात चैतन्य निर्माण होत आहे. आता या निर्बंधांच्या परिस्थितीत, सर्व बंधने पाळून, त्यासाठी सवयीच्या काही गोष्टी बाजूला ठेवून खेळाडूंना स्वतःचे कसब दाखवता येईल. अर्थात काही खेळ, स्पर्धा सुरू झाल्या, तरी त्यांना तूर्त प्रेक्षक असणार नाहीत. (मात्र त्यांचे प्रक्षेपण शक्‍य  आहे. त्यामुळे आयोजकांनाही आर्थिक ओझे सहन करावे लागणार नाही.) 

फुटबॉल, क्रिकेट अशांसारख्या, जेथे शारीरिक घसट नसते, त्या खेळांचे सामने सुरू करता येतील. काही प्रमाणात सुरू झालेही आहेत- प्रेक्षकांविना! बदलत्या परिस्थितीत खेळाडूंना आपला हर्ष व्यक्त करण्याच्या रीती बदलाव्या लागतील. आता त्यांना घोळका करून जल्लोष करता येणार नाही, मिठ्या मारता येणार नाहीत. क्रिकेटपटूंनाही सवयी बदलाव्या लागतील.

चेंडूला थुंकी, घाम लावून चकाकी आणणे, बळी मिळाल्यानंतर एकत्रित जल्लोष, फलंदाजांनी  खेळपट्टीच्या मधे, जवळ उभे राहून बातचीत करणे विसरावे लागेल. कोणत्याच सांघिक खेळात, सुरुवातीला वा मध्यंतरानंतर सर्वांनी कडे करून उत्साह आणि विजयासाठी प्रयत्न करण्याचा जोम आणण्याचा प्रयत्न करता येणार नाही. टेनिस, बॅडमिंटन यांच्या स्पर्धाही होऊ शकतात, मात्र त्यात पुरुष, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीचे सामने होऊ शकणार नाहीत. कारण त्यांमध्ये शारीरिक संपर्क होऊ शकतो. पण एकेरीचे सामने झाले, तरी खेळाडूंना स्वतःलाच कोर्टबाहेर गेलेले चेंडू आणावे लागतील. त्यासाठी बॉल बॉइज-गर्ल्स नसतील. बॅडमिंटन त्यामानाने सोपे.

तेथे खेळाडू स्वतःच शटल आणतात, शिवाय नेट मधे असल्यामुळे त्यांचा एक-दुसऱ्याशी संपर्क नसतो. मात्र त्यांनाही सामन्यानंतर प्रतिस्पर्ध्याजवळ जाता येणार नाही. मात्र टेनिसप्रमाणे दुहेरीच्या सर्वच प्रकारांना बंदीच असेल. बास्केटबॉलसारख्या खेळात प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांपासून फारसे दूर नसतात. खरे तर त्यांचा तसा पहाराच असतो! कित्येकदा तर चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी त्यांच्यात शारीरिक झटापटही होते. त्यामुळे बास्केटबॉल आणि त्याच कारणांमुळे, हॅंडबॉलचे सामने होणे तूर्त शक्‍य नाही. तीच गोष्ट बॉक्‍सिंग, कुस्ती, ज्युदो अशा अंगझटीच्या खेळांची. तेथे दुसऱ्याचा स्पर्श अनिवार्य असतो, त्यामुळे त्यांच्या सामन्यांना परवानगी देता येणार नाही.

कबड्डीचे सामनेही होऊ शकणार नाही, कारण तेथेही अंगझटीचा प्रश्न आहे.जलतरण, वॉटरपोलो, डायव्हिंग, सिंक्रोनाइज्ड स्वीमिंग, तसेच रोइंग यांचा पाण्याशी संबंध असल्याने आणि तेथेच रोगाचा फैलाव होण्याची शक्‍यता जास्त असल्याने त्यांच्या स्पर्धांचा विचारही कोणी करणार नाही. उलट वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा होऊ शकतात. कारण तेथे प्रत्येक स्पर्धक स्वतंत्रपणे कामगिरी दाखवतो. त्यांचा दुसऱ्याशी संपर्क होण्याची शक्‍यतता नसते. जिम्नॅस्टिक्‍स बाबतीतही असेच म्हणता येईल. तेथेही  विविध स्पर्धा-प्रकार असले, तरी प्रत्येकात स्पर्धक आपापले कौशल्य स्वतंत्रपणे दाखवतात मैदानी खेळ, शर्यतींबाबत मात्र विचार करता येऊ शकतो. कारण लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी आणि पोलव्हॉट अशा उड्यांच्या स्पर्धांत, त्याचप्रमाणे गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडाफेक अशा  फेकींमध्येही एका वेळी एकच खेळाडू कौशल्य आजमावित असतो. स्पर्धकांचा दुसऱ्याशी संपर्क होत नाही,  म्हणून या स्पर्धांचा विचार होऊ शकतो. 

शर्यतींबाबत बोलायचे तर तसे धावपट्टीवरील प्रत्येक पाटी (लेन) ही ठराविक अंतरावर असते आणि ते किमान एक मीटर तर असतेच. तरीही धावताना स्पर्धक क्वचित एकमेकांजवळ येऊ शकतात. त्यासाठी एक आड एक लेनमध्ये स्पर्धक ठेवणे किंवा अगदीच कुणाचा संपर्क नको असेल, तर टाइम-ट्रायलद्वारे विजेता ठरवता येईल. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाने स्वतंत्रपणे धावून नोंदवलेली वेळ विचारात घेऊन सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्याला विजेता ठरवता येईल. रिले शर्यतींना मात्र परवानगी मिळणार नाही, कारण तेथे एका धावकाचा दुसऱ्याकडे बॅटन देण्याच्या निमित्ताने संपर्क होत असतो. अशा प्रकारे योग्य आखणी करून स्पर्धा आयोजित केल्या, तर खेळाडूंची मरगळ आणि नैराश्‍य काही प्रमाणात तरी कमी होईल. बुद्धिबळ, नेमबाजीमध्ये काही ‘ई-स्पर्धां’चे प्रयोग सुरू झाले आहेत.

बुद्धिबळाच्या जागतिक झटपट डावाची सांघिक स्पर्धा सध्या सुरू आहे. तेथे तर प्रत्येकजण आपापल्या घरातूनच, ‘वर्किंग फ्रॉम होम’ पद्धतीने खेळत आहेत. योग्य प्रकारे आखणी करून अशा स्पर्धांच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करता आली, तर दूरचित्रवाणी  वाहिन्यांना मोठाच आधार मिळेल आणि सामन्यांच्या प्रक्षेपणचे हक्कआ त्यांना विकून आयोजकांनाही  खर्च भरून काढता येईल. थेट प्रक्षेपण आहे, असे कळल्यावर जाहिरातदारही आपापल्या उत्पादनाची  जाहिरात स्पर्धेच्या ठिकाणी कशी करता येईल, याचा विचार करू लागतील. कारण थेट प्रक्षेपणामुळे  ती दूरवर पोहोचू शकेल. मुख्य म्हणजे प्रेक्षकांनाही स्पर्धांची मौज मिळेल. या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. आठ मे रोजी दक्षिण कोरियामध्ये दीर्घकाळानंतर खेळाडूंना प्रत्यक्ष सामन्याचा, अर्थात ‘लाइव्ह ॲक्‍शन’चा अनुभव घेता आला. आवश्‍यक ती सर्व काळजी घेऊन तेथील के-लीगच्या सामन्यांना सुरुवात करण्यात आली.

आधी म्हटल्याप्रमाणे दूरचित्रवाणीवरून या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले गेले आणि तब्बल ३६ देशांतील प्रेक्षकांनी या सामन्याची मजा लुटली. अन्य देशांप्रमाणे यात भारतातील फुुटबॉलप्रेमींचाही समावेश होता. प्रेक्षकांविना खेळल्याची खंत खेळाडूंना होती, तरी प्रत्यक्ष मैदानावरील सामन्यात सहभागी झाल्याचा त्यांचा आनंद अवर्णनीयच होता. आता आठवडाभरातच जर्मनीमधील फुटबॉल लीगलाही सुरुवात होणार आहे. हळूहळू या पद्धतीने इतर खेळांच्याही स्पर्धा वेगवेळ्या ठिकाणी सुरू होतील. अगदी ‘फॉर्म्युला वन’च्या शर्यतींसाठीही नव्या ठिकाणांचा शोध सुरू आहे.

विराट कोहली यानेही, असे सामने होण्याची शक्‍यता आहे, असे सांगून, तसे ते झाले, तर आम्ही अशा सामन्यांत प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय खेळण्यासाठी तयार आहोत, असे  सूचित केले आहे. अर्थात नेहमी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये, प्रेक्षकांचा जल्लोष सुरू असताना खेळण्याची सवय आम्हाला असल्याने प्रेक्षक नसताना सामने खेळण्यात गंमत नाही, अशी पुस्तीही जोडली आहे. (खरे तर आजकाल कसोटी सामन्यांना फक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि क्वचित भारतातच  गर्दी असते. अर्थात मर्यादित षटकांचे वन-डे आणि टी -२० सामन्यांना मात्र मोठी गर्दी असते.) परिस्थितीला सामोरे गेले तर अडचणींतूनही मार्ग काढता येतो. फक्त या प्रकारे आयोजन करण्याची तयारी हवी. त्यासाठी कोण पुढे येतो ते पाहायचे! म्हटलेच आहे  -योजकस्तत्र दुर्लभः।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com