बैरुतमधील विध्वंसातही दिसला माणुसकीचा झरा

सई वाळिंबे
Tuesday, 11 August 2020

बैरूतमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे सगळे जग हादरले. नेमके काय झाले हे न कळाल्याने उडालेला गोंधळ, प्रचंड घबराट अशा विपरीत स्थितीतही बैरूतमध्ये दिसला तो माणुसकीचा झरा. एकमेकांना धीर देत, मदत करीत बैरूतवासीयांनी माणुसकीचे दर्शन घडविले.  

बैरूतमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे सगळे जग हादरले. नेमके काय झाले हे न कळाल्याने उडालेला गोंधळ, प्रचंड घबराट अशा विपरीत स्थितीतही बैरूतमध्ये दिसला तो माणुसकीचा झरा. एकमेकांना धीर देत, मदत करीत बैरूतवासीयांनी माणुसकीचे दर्शन घडविले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी मूळची पुणेकर, मग दिल्लीकर आणि आता लेबनॉनमधील बैरुतकर. मिस्टरांच्या जॉब-पोस्टिंगच्या निमित्ताने सध्या आमचे वास्तव्य बैरूतमध्ये आहे. मंगळवार चार ऑगस्ट. वेळ : साधारण संध्याकाळचे सहा. मिस्टर नुकतेच ऑफिसमधून आले होते. नेहमीप्रमाणे चहापाणी झाले व मी पुन्हा अध्यात्मिक लिखाण-वाचनात मग्न झाले. तेवढ्यात कानठळ्या बसवणारा आवाज ऐकू आला. तीव्र कंपनांनी घराचा ताबा घेतला. माझ्या हातातले पेन, कागद अस्ताव्यस्त विखुरले. आम्ही जोरात किंचाळलो, ‘भूकंप? ब्लास्ट

फायरिंग?..की आणखी काही?’ एव्हाना मोठ्या काचेच्या खिडक्‍या, तावदाने निखळून पडली होती. बाजूला फर्निचरचे सांगाडे चिरनिद्रेत पहुडलेले. मला तर रडूच कोसळले. काय झालेय ते समजेना. काही मिनिटांतच ‘नॉर्मल’ दृश्‍य भीषण झाले.

बाहेर रस्त्यांवरून लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. खिडकीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असलेल्या मिस्टरांना मी जोरात ओढले. म्हटले, ‘थांबा, कुठेही जाऊ नका. काय होतंय माहीत नाही. काही बरे-वाईट असेल तर आपण बरोबर राहू.’ आमची दोन्ही मुले दिल्लीत. त्यांना फोन लावला. न जाणो, काही घडले तर एकदा त्यांच्याशी बोलून घेऊ, असे वाटले. एव्हाना अध्यात्मात शिकलेले सारे माझ्याभोवती फेर धरू लागले होते. आत्मा अविनाशी असतो..तो केवळ शरीर बदलतो वगैरे वगैरे. लांब कुठेतरी यमराज प्रकट झाले की काय असा भासही झाला. महाभयंकर काहीतरी घडले होते. ‘हिरोशिमा-नागासाकी’चे सगळे तपशील मनात हजेरी लावून गेले. मन आकलनाच्या प्रयत्नात; तर डोके सुन्न, अशी अवस्था !

तेवढ्यात फोन घणघणू लागले. शेजारचे, वरच्या मजल्यांवरचे सगळे धावत, ओरडत खाली आले. फ्रेंच, इंग्लिश, अरेबिक सगळ्या भाषांमध्ये परस्परांची विचारपूस झाली. लिफ्ट टाळून आम्ही जिन्याने खाली उतरलो. फोनवर बोलणारी आमची दोन्ही मुले खरे तर काळजीत होती, घाबरलेली होती; पण ती आम्हाला धीर देत होती. ‘असं करा, तसं करू नका’, सांगत होती.

खाली अजूनही गोंगाट चालूच होता. अंशत: किंवा पूर्णतः उजाड झालेली घरे, दुकानं, मोडलेल्या गाड्या, काचेच्या चुराड्यामुळे चकाकणारा रूपेरी रस्ता, रडत रडत आपल्या जवळच्यांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असलेले लोक... असं दृश्‍य असूनही सगळे एकमेकांशी बोलत होते, धीर देत होते, शक्‍य तेवढी मदत करत होते. काही लोकांची भाषा कळत नव्हती; पण त्यांची वेदना हृदयापर्यंत पोहोचत होती. भयानक घडले होते यात तिळमात्रही शंका नव्हती; पण नेमके काय?...हे कळायला खूप वेळ गेला. 

तास-दीड तासाने आता आणखी काही घडत नाही याची खात्री करून आम्ही वर घरी आलो. घरात पाऊल ठेवायलाही जागा नव्हती. मोठी बारदाने, काचा सर्वत्र विखुरलेल्या होत्या. हॉलची भिंत उजाड झाली होती. प्रचंड घोंघावता वारा आणि वेडेवाकडे हेलकावणारे पडदे भयावह दिसत होते. आम्ही झाडू घेऊन, काचा बाजूला करून छोटी पाऊलवाट करून घेतली व सर्वप्रथम आमची पावलं देवघराच्या दिशेला वळली. विनम्र भावाने देवापुढे डोके टेकले.

काही बोलण्याची गरज नव्हती; कारण कृतज्ञता अबोलच असावी. त्या सांध्य प्रकाशात देवाचे शांत, सगुण-साजिरे रूप ‘भिऊ नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे’, असे सांगत होते. 

हळूहळू स्फोटाचे तपशील कळू लागले. आम्ही त्या घटनास्थळापासून कितीतरी दूर, पण जे जवळ असतील, त्यांची अवस्था काय झाली असेल, याची कल्पनाही करवत नव्हती. पण इतक्‍या भीषण परिस्थितीतही लोक स्वार्थ बाजूला ठेवून एकमेकांना मदत करत होते. इथले सरकार, रेडक्रॉस संघटना व वैद्यकीय कर्मचारी यांचे मदतकार्य अविरतपणे सुरू आहे. स्वत: संकटात असूनही रक्तदान कुठे व कसे करता येईल, याची चौकशी लोक करत आहेत.

अनपेक्षितपणे विस्कटलेली स्वतःची घडी सावरताना बैरूतवासीय इतरांनाही आधार देताना दिसले. त्या संकट-क्षणांनी षड्रिपूंना हरवले होते. माणसाला दिसत होता फक्त माणूस...

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Sai Walimbe