अग्रलेख: "मुंबई'चे फोटोफिनिश

अग्रलेख: "मुंबई'चे फोटोफिनिश

धावण्याच्या शर्यतीत समान क्षमता असलेले दोन स्पर्धक अंतिम रेषेवर एकाच वेळी पोहचतात, पण त्यापैकी एक ही रेषा पार करण्यासाठी झेपावतो आणि विजयी ठरतो. दोघांमध्ये फरक छाती पुढे काढण्याचा असतो. यंदाच्या "आयपीएल'मध्ये अंतिम सामन्यात असेच "फोटोफिनिश' झाले आणि "मुंबई इंडियन्स'च्या गळ्यात चौथ्यांदा विजेतेपदाची माळ पडली.

खरे तर रोहित शर्माचा मुंबई संघ असो, वा महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई संघ असो, तमाम क्रिकेटप्रेमींच्या दृष्टीने दोघेही जिंकले होते. विजय-पराजयापेक्षा विजेतेपद आणि उपविजेतेपद यांचा निकाल एका धावेने लागावा इतका थरार, रोमांच यांचा अनुभव, अंतिम सामन्याचा आनंद घेणाऱ्या लाखो प्रेक्षकांच्या नसानसात भिनला होता. दोन्ही संघांचे चाहते आपापल्या संघाच्या विजयासाठी आसुसले होते, तर मैदानावर मुंबई संघाचे अकरा खेळाडू आणि चेन्नईचे दोन फलंदाज, असे तेरा खेळाडू विजयासाठी शर्थ करीत होते. कमालीचा उत्कंठापूर्ण ठरलेला "आयपीएल'चा हा महामुकाबला कोण जिंकणार, यासाठी सर्वांनी श्‍वास रोखून धरले होते. हीच खरी "आयपीएल'ची गंमत आहे. जो लसिथ मलिंगा आपल्या अगोदरच्या षटकात महागडा ठरतो, तोच मलिंगा अखेरच्या षटकात मात्र तारणहार ठरतो. वाईड चेंडूवरून पोलार्डने केलेले "तांडव' हेही माफ असते, अन्‌ प्रेक्षकांच्या लक्षात राहतो तो फक्त "फिनिशिंग टच'! 

अशी ही "आयपीएल' एका तपाची झाली, तीत उत्तरोत्तर प्रगती झाली. खेळाडूंना मिळणाऱ्या पैशाच्या गंगेत वाढ होत गेली, प्रसिद्धी तर शिखरावर जाऊ लागली. पण, वाद होण्याची परंपरा मात्र कायम राहिली. आर. अश्‍विनचे "मंकडिंग' प्रकरण, "कॅप्टन कूल' अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने नोबॉलच्या मुद्यावरून थेट मैदानात जाऊन पंचांना केलेली विचारणा, अशाच नोबॉलची विचारणा उमेश यादव आणि विराट कोहली यांनी केल्यामुळे पंच नायजेल लॉंग यांनी पंचांच्या रूमची फोडलेली काच... असे छोटे-मोठे प्रसंग या पर्वात घडत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे सामना संपल्यानंतर दोन्ही संघांतील काही खेळाडू एकत्र येऊन चर्चा करायचे आणि मैदानावर मित्रत्वाचे नाते "हम साथ साथ है' अशा प्रकारे दाखवायचे.

पहिल्या "आयपीएल'मध्ये हरभजनने श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावल्याचा प्रसंग आणि आताचा हा दोस्ताना, "आयपीएल' किती बदलली आहे, हे दाखवून देणारा आहे. त्याचबरोबर नवोदितांना नेहमीप्रमाणे प्रकाशझोतात आणण्याची परंपरा याही "आयपीएल'ने जपली. "मुंबई इंडियन्स'मधून खेळलेला राहुल चहर, "चेन्नई'तून खेळलेला त्याचा भाऊ दीपक चहर याला तर आता विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाकरिता सराव गोलंदाज म्हणून निवडले आहे. राजस्थान संघातून खेळलेला 17 वर्षांचा रेयान पराग भारताचे पुढील आशास्थान असेल आणि शुभमन गिलकडे पुढचा विराट कोहली म्हणून पाहिले जात आहे. "आयपीएल'मधून प्रत्येक वर्षी असे काही खेळाडू पुढे येतात आणि त्यातून भारतीय क्रिकेटच्या नवी पिढीची जडणघडण होऊ लागते. लोकसभा निवडणुकीचे रण तापलेले असताना "आयपीएल'चे रणांगण भारतातच उत्साहात रंगले, हेही महत्त्वाचे आहे.

यंदाच्या स्पर्धेचा उत्तरार्ध हा भारतीय खेळाडूंपुरताच मर्यादित राहिला. विश्‍वकरंडकाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक प्रमुख परदेशी खेळाडू मध्येच मायदेशी परतले. काही परदेशी खेळाडू राहिले, पण त्यांचा विश्‍वकरंडक स्पर्धेशी संबंध नव्हता. अपवाद न्यूझीलंडच्या खेळाडूंचा होता. त्यांच्या संघाचे आव्हान असल्यामुळे त्यांना त्यांच्या क्रिकेट मंडळाने "आयपीएल' पूर्ण खेळण्याची परवानगी दिली होती. भारतीय खेळाडूंनी याचा फायदा उठवला. 

विश्‍वकरंडक स्पर्धा हाकेच्या अंतरावर असताना जवळपास दीड महिन्याची "आयपीएल' स्पर्धा आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सामन्यांचा ताण खेळाडूंवर किती आणि कसा पडतो, याची चिंता होती. त्याची वेळोवेळी चर्चाही झाली. "आयपीएल'चा उत्सव ठीक आहे, पण आता खरे आव्हान विश्‍वकरंडकाचे आहे. त्यामध्ये फ्रॅंचाईजींची नव्हे, तर देशाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

"आयपीएल'मध्ये कसे आणि किती सामने खेळायचे, हे खेळाडूंनी ठरवावे, आवश्‍यकतेनुसार त्यांनी विश्रांती घ्यावी, असे लीगपूर्वी विराट कोहली म्हणाला होता. प्रत्यक्षात एकाही भारतीय खेळाडूने विश्रांती घेतली नाही. त्यांना सराव मिळाला, हे महत्त्वाचे असले, तरी कोणत्याही प्रमुख खेळाडूला "आयपीएल'मध्ये दुखापती झाल्या नाहीत, हे सुदैवच म्हणायला हवे. अपवाद केदार जाधवचा आहे. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, शिखर धवन किंवा हार्दिक पंड्या यांनी वेगवेगळ्या संघांतून खेळताना जिवाची बाजी लावली. आता विश्‍वकरंडक स्पर्धेत तितक्‍याच तडफेने खेळ केला, तर "आयपीएल'मधील यश मग ते रोहितचे असो वा धोनीचे, खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com