#यूथटॉक : ‘मी आणि माझे’च्या पलीकडले जग

संस्कृती बापट
Saturday, 21 September 2019

‘माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे’ अशी वाक्‍ये तरुणांसमोर अगदी कोरड्या पद्धतीने ऐकवली जातात. पण त्यात खरी ‘सामाजिकता’ म्हणजे काय, याचा बोध होतच नाही. जास्तीत जास्त व्यक्ती जर खऱ्या अर्थाने ‘सामाजिक’ बनल्या, तर कितीतरी प्रश्‍नांतून मार्ग सापडू शकेल.

‘माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे’ अशी वाक्‍ये तरुणांसमोर अगदी कोरड्या पद्धतीने ऐकवली जातात. पण त्यात खरी ‘सामाजिकता’ म्हणजे काय, याचा बोध होतच नाही. जास्तीत जास्त व्यक्ती जर खऱ्या अर्थाने ‘सामाजिक’ बनल्या, तर कितीतरी प्रश्‍नांतून मार्ग सापडू शकेल.

शहरी भागांचा विकास होत असतानाच ग्रामीण भागाशी तुटत चाललेली नाळ, शहरीकरणाच्या ओझ्याखाली दबलेला निमशहरी आणि ग्रामीण (अगदी काही वेळा शहरीसुद्धा) तरुण वर्ग, २१व्या शतकात राहात असूनही लिंगभाव भेदात अडकलेली मने, शिक्षण क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार, जिवंत राहण्यासाठी पैसा हे एकच माध्यम समजून तो मिळवण्यासाठी स्वीकारलेले मार्ग, थोडक्‍या लाभासाठी विश्वास, करुणा आणि संवेदनेला दिलेली तिलांजली या सगळ्यामागे एकच कारण आहे. ते म्हणजे खऱ्याखुऱ्या सामाजिकतेचा अभाव. मुळात व्यक्ती म्हणून ‘माझी’ ओळख पुसली न जाता समाज म्हणून ‘आमची’ ओळख उभी करता येते यावर विश्वास बसला पाहिजे. मूल्यांची जाणीव व भान हे समाजाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे आहे. सामाजिक भान हे स्वतःची ओळख करण्यासाठी चालू असलेल्या विविध प्रयत्नांतून मिळते. स्वतःला शोधताना आपण ज्या कुटुंब, नातेवाईक, मित्रवर्ग अथवा आदर्शांचा आधार घेतो, त्यानुसार प्रत्येक व्यक्तिपरत्वे ही जाणीव निर्माण होण्याचा काळ आणि तीव्रता बदलू शकते.

गेली काही वर्षे ‘असीम फाउंडेशन’च्या माध्यमातून भारताच्या सीमावर्ती भागात काम करताना स्वतःभोवती विणलेल्या कोशात सुस्त झालेल्या व्यक्ती अनेक वेळा दर्शन देऊन जातात. अशा व्यक्तींना आपल्याभोवती दिसणारे जगच खरे आणि पुरेसे वाटत असते. पण त्या हे विसरतात की त्यांनी नाकारले तरी त्याबाहेरच्या जगाचे अस्तित्व मिटणार नाही. उलट बाहेरच्या जगात चालू असणाऱ्या घडामोडी इच्छा असो किंवा नसो त्यांच्या कोशावर परिणाम करतीलच. ‘स्व’ची जाणीव झाली की तेवढ्यावरच न थांबता ती जाणीव वाढवत नेणे- स्वतःबरोबरच इतरांच्या इच्छा-आकांक्षा, सुख-दुःख यांच्यासाठी सहवेदना असणे यातून समाजाचे भान येत जाते. आज आपल्या आजूबाजूला पाहिले तर प्रत्येक माणूस धावतो आहे.

प्रत्येकाची धाव अगदी जीव तोडून. कशासाठी? तर सुख आणि समाधानासाठी! पण माझा प्रश्न असा की एवढे धावूनही कोणीच सुखी का नाही? समाधान कोणाकडेच कसे नाही? आनंद कशातच मिळत का नाही? कारण बरेचदा माझी धाव माझ्यासमोरची, माझ्या व्याख्येत बसणारी सुखं मिळवण्यासाठीची- आणि त्यासाठी गरज पडली तर चुकीचे compromises करायलाही मागे पुढे न पाहणारी. सोयीस्करपणे स्वतःला नियमांमधून अलगद बाहेर काढून दुसऱ्यांसाठी मात्र त्यांचा आग्रह धरणारी वृत्ती दूर करायला हवी.

अनुभव माणसाला खूप काही शिकवून जातो.  पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी comfort zone सोडून बाहेर पडले, जम्मू-काश्‍मीर मध्ये पोचले. ज्या भागाबद्दल आपण केवळ ऐकत आलो आहोत अशा भागात नेमके चालू तरी काय आहे? माणसांच्या मनातल्या खोलवर लपलेल्या भावनांचे नेमके अर्थ काय आहेत? सगळाच गुंता आहे की कुठे तो सोडवण्याचा रस्ताही लपलेला आहे? असे प्रश्न पडले. मला जाणवले, की समाजभान आणि जाणीव ही अशा चाकोरीबाहेरच्या अनुभवातूनच मिळते.

माणसाने कितीही बौद्धिक प्रगती केली तरी करुणा  सह-अनुभूती, प्रेम आणि मैत्री या भावनाच त्याच्या मुळाशी आहेत. मुळांची काळजी घेतली गेली तरच वरचे झाड बहरणार आहे. म्हणूनच ‘मी का?’ पेक्षा ‘मी का नाही?’ याचा विचार करण्यास जेवढ्या लहान वयापासून शिकवले जाईल, तेवढे नकारात्मक आणि विघातक विचार कमी होतील. 

या जगात सर्व काही चुकीचे किंवा नकारात्मक चालू आहे, असे वाटत असेल तर आपल्यासमोर दिसणारा अंधार घालवायचा आपण प्रयत्न केला का? हे पाहिले पाहिजे. आयुष्यात संघर्ष अटळ आहे. परंतु माझ्या संघर्षापेक्षा, माझ्या आयुष्यातील अडचणींपेक्षा दुसऱ्या कोणाला तरी आणखी अवघड, अशक्‍यप्राय वाटणाऱ्या आणि कदाचित आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा पद्धतीने जगावे लागते हे जेव्हा आपण डोळे उघडून बघतो तेव्हा आपली दुःखे आपोआपच लहान वाटायला लागतात. जे आहे आणि जेवढे आहे त्यापेक्षा काहीतरी जास्त मिळवताना ज्यांच्याकडे नाही अशा कोणाला तरी आपला साथीचा हात मिळाला तर आपोआपच समाज म्हणून असणारा प्रवास समृद्ध होईल. आजूबाजूला चांगले काही नाहीच असे म्हणताना स्वतःकडेही त्रयस्थपणे बघता आले आणि त्यात सुधारणा करता आल्या तर जाणीव आणि भान मुळापासून रुजेल हे नक्की. 
(लेखिका पुण्याच्या असून देशाच्या सीमावर्ती भागात सामाजिक काम करतात.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article Sanskruti Bapat