पहाटपावलं : काळ, काम, वेग अन्‌ योग !

Dr-Shrikant-Chorghade
Dr-Shrikant-Chorghade

सात सप्टेंबर हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस होता. त्या दिवशी भारताचा तिरंगा चंद्राच्या पृष्ठभागावर रोवला जाणार होता. कित्येक महिन्यांपासून असंख्य शास्त्रज्ञ रात्रंदिवस अथक प्रयत्न करीत होते. रात्री बारापासून ‘इस्रो’च्या कार्यालयात लगबग सुरू होती. पंतप्रधानही ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांच्यासोबत केंद्रात हजर होते. घरोघरी वाहिन्यांच्या पडद्याकडे डोळे लावून कोट्यवधी भारतीय त्या क्षणाची वाट पाहात होते.

माझा मुलगा पहिल्यांदा बालमंदिरातील परीक्षेला बसला होता. त्याची गुणपत्रिका मिळाली, तेव्हा तो सांगत आला, ‘बाबा, मी थोडासा नापास झालो.’ त्याला शंभरपैकी ९९ गुण मिळाले होते. या चांद्रमोहिमेचं तसंच झालं. लाखो किलोमीटरचा प्रवास निर्विघ्नपणं पार केल्यानंतर केवळ २.१ किलोमीटर चंद्रपृष्ठापासून दूर असलेल्या ‘विक्रम’ वाहनानं संदेश पाठवणं बंद केलं. इंग्रजीत एक म्हण आहे; तिचा अर्थ असा, की ‘ओठ आणि पेला यांत अडथळे येतात.’ तसंच या मोहिमेचं झालं. शंभर टक्के यशस्वी होण्याचं श्रेय केवळ २.१ किलोमीटर अंतरानं चुकलं. शास्त्रज्ञांचा विरस झाला. नागरिकही हिरमुसले. या मोहिमेचे अध्वर्यू असलेले सिवन यांचं दु:ख तर कल्पनेच्या पलीकडे असेल. त्यांच्या भावनेचा बांध फुटला, तेव्हा पंतप्रधानांनी त्या भावना समजून घेत त्यांना जवळ घेतलं.

पाठीवर हात फिरवून त्या स्पर्शातून ‘दु:खी होऊ नका, पुन्हा प्रयत्न करा’ असा जणू मूकसंदेश दिला. परीक्षेत अपयशी झालेल्या पाल्याला खरं तर पालकांकडून अशीच नि:शब्द धीराची आवश्‍यकता असते, असं एक बालरोगतज्ज्ञ व समुपदेशक म्हणून मी अधिकारवाणीनं सांगू शकतो. ‘असं का झालं?’ या प्रश्‍नाचं उत्तर पाल्याकडे नसतं; पण काही पालक ‘असं कसं झालं?’ असा प्रश्‍न विचारून पाल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात व अपयशानं व्यथित झालेल्या पाल्याच्या मानसिक जखमेवर मीठ चोळतात.

देशाचे पंतप्रधान म्हणून एका पालकाच्या भूमिकेतून सिवन यांना स्पर्शातून आश्वस्त केलं गेलं. या चांद्रमोहिमेतून शास्त्रज्ञांच्या दृष्टीनं काय मिळालं, हे तर कालांतरानं कळेलच; पण माझ्या दृष्टीने खगोलशास्त्र व अंतराळशास्त्र या शास्त्रांबद्दल यामुळे देशभर उत्सुकता निश्‍चितच जागृत झाली असणार.

डॉक्‍टर, इंजिनिअर, वकील, संगणकशास्त्र या पलीकडे मुलांच्या भवितव्याचा विचार न करणाऱ्या पालकांसाठी व त्यांच्या पाल्यांसाठी भवितव्याच्या या नव्या वाटेबद्दल उत्सुकता निर्माण झाली असणार, हेही नसे थोडके! शिवाय सजग पालकांसाठी आपल्या अपयशी ठरलेल्या पाल्याशी कसा नि:शब्द संवाद साधायचा, याचीही जाणीव झाली असेल. शास्त्रज्ञांनी केलेलं काळ, काम आणि वेगाचं गणित बरोबर होतं, फक्त योग नव्हता. या चुकलेल्या योगाची कारणमीमांसा शास्त्रज्ञांकडून केली जाईल व पुढली ‘चांद्रयान-३’ मोहीम १०० पैकी १०० गुण मिळवेल, याची खात्री आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com