वार्तांकनाचा एक विलक्षण अध्याय

नरिमन हाउसमध्ये (छबाड हाउस) २८ नोव्हेंबर, २००८च्या पहाटे उतरणारे एनएसजी जवान.
नरिमन हाउसमध्ये (छबाड हाउस) २८ नोव्हेंबर, २००८च्या पहाटे उतरणारे एनएसजी जवान.

मुंबईतल्या ‘२६-११’च्या  दहशतवादी हल्ल्याने अनेक संदर्भ बदलले. नरिमन हाउस येथील हल्ल्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराने सांगितलेला अनुभव.

आयुष्यातल्या काही आठवणी पुसता येत नाहीत. माझ्यासाठी ही आठवण आहे मुंबईवर झालेल्या २६-११ च्या हल्ल्याची. मला अजून आठवतोय तो दिवस. मी ‘सकाळ टाइम्स’साठी काम करत होतो. मुंबईत तीन वर्षं काम केल्यावर पुण्यात शिफ्ट झालो होतो. रात्री काम संपवून घरी जाताना दक्षिण मुंबईतल्या फोर्ट भागात गोळीबाराची काही दृश्यं टीव्हीवर दिसली. पहिल्यांदा वाटलं, की हा गँगवॉरचा भाग असणार. त्यामुळे फार गांभीर्यानं घेतलं नाही. घरी आलो आणि टीव्ही लावला, तेव्हा धक्का बसला. मोठा दहशतवादी हल्ला झाला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२७ नोव्हेंबरला सकाळी ‘सकाळ’ आणि ‘सकाळ टाइम्स’च्या संपादकीय विभागाची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. मुंबईतली ही घटना महत्त्वाची होती. तिच्या वार्तांकनासाठी बातमीदार म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. मी लगेचंच बसमध्ये बसलो. प्रवासात मनात अनेक विचार येत होते. दुपारी दादरला पोचलो आणि चर्चगेट स्टेशनकडे निघालो. एरवी प्रचंड गर्दी असलेलं हे स्टेशन तेव्हा सुन्न होतं. पहिल्यांदाच मला मुंबईकरांच्या डोळ्यांत भीती दिसली. 

मी आमचे फोटोजर्नालिस्ट नितीन लवाटे यांच्याबरोबर मुंबई ब्युरोचे प्रमुख मृत्युंजय बोस यांच्याकडे गेलो. त्यांनी मला नरिमन हाउसच्या (छबाड हाउस) आजूबाजूला थांबायला सांगितलं-जिथं दहशतवाद्यांनी एका ज्यू कुटुंबाला ओलीस ठेवलं होतं. तिथं पोचल्यावर मी आणि लवाटे यांनी स्थितीचा अंदाज घेतला. सगळा भाग पोलिसांनी ताब्यात घेतला होता. ताज हॉटेलमधून अधूनमधून गोळीबारांचे आवाज येत असले, तरी छबाड हाउसमध्ये जीवघेणी शांतता होती. रात्री नॅशनल सिक्युरिटी गार्ड्‌सचे जवान आले आणि त्यांनी आजूबाजूच्या इमारतींमध्ये पोझिशन्स घेतल्या. संपूर्ण दिवस दमून गेल्यामुळे मी एका गाडीच्या बॉनेटवर थोडी विश्रांती घ्यायचं ठरवलं. अर्थात प्रचंड सावध राहणं भाग असल्यामुळे मी किंचित डुलकी घेऊ शकलो. २८ नोव्हेंबरच्या पहाटे हेलिकॉप्टरच्या प्रचंड आवाजानं जाग आली.

छबाड हाउसच्या टेरेसवर एका मोठ्या एमआय-१७ हेलिकॉप्टरनं घिरट्या घातल्या आणि ते परत गेलं. इतर इमारतींमधले एनएसजीचे कमांडोज ज्या खोलीत दहशतवादी होते त्या दिशेनं वेगानं येताना दिसले.  नंतर हेलिकॉप्टर पुन्हा आलं आणि ते नरिमन हाउसवर थांबलं. त्यातून २२ एनएसजी कमांडोज टेरेसवर उतरले. इतर इमारतींमधल्या जवानांनी गोळीबार सुरू केला आणि त्याच वेळी टेरेसवरून जवान खाली उतरले. एक तास जोरजोरात गोळीबार सुरू होता. त्यानंतर एक एनएसजी कमांडो दुसऱ्या जखमी कमांडोला बाहेर आणताना दिसला. त्यांचं नाव मेजर उन्नीकृष्णन होतं-जे नंतर शहीद झाले. सगळे दहशतवादी मारले जाईपर्यंत गोळीबार सुरू होता. इमारतीमधले सगळे लोकही मृत्यमुखी पडले-फक्त दोन वर्षांचा मोशे जिवंत राहिला होता.

संध्याकाळ झाली आणि सगळे जवान विजयी मुद्रेनं बाहेर पडले. लोक तोपर्यंत रस्त्यावर आले होते. त्यांनी जवानांचं स्वागत केलं. ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. रात्री अनेक नेते तिथं यायला सुरवात झाली. मी ऑफिसमध्ये गेलो आणि बातम्या दिल्या. तिकडे ताज हॉटेलमध्ये मात्र कारवाई सुरूच होती. मी तिकडे गेलो. २९ नोव्हेंबरला ‘ऑपरेशन ब्लॅक टोर्नाडो’ अखेर संपलं. माझ्या आयुष्यातले विलक्षण ४८ तास संपले. हा सगळा काळ मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर सावध पवित्र्यात होतो. आम्ही सगळे घाबरलो होतो. कुठल्या दिशेनं गोळी येईल सांगता येत नव्हतं. कुणालाही गोळी लागू शकत होती; पण मुंबई पोलिस, लष्करी दलं यांनी परिस्थिती उत्तम हाताळली होती. एनएसजीनं मुख्य कारवाई केली असली, तरी नौदलाचे मरिन कमांडोज आणि मुंबई पोलिसांनी आधी अक्षरशः खिंड लढवून धरली होती हे महत्त्वाचं. 

मला विचाराल, तर हा अनुभव मी इतक्या वर्षांनंतरही विसरू शकत नाही. त्या धक्क्यातून सावरायला मला जवळजवळ आठवडा लागला. मला दुःस्वप्नं पडायची. माझे वडील लष्करातून निवृत्त झाल्यानं त्यांनी या धक्क्यातून बाहेर पडायला मला मदत केली. या अनुभवाने माझ्यातल्या पत्रकाराला एक नवा आयाम दिला हे मात्र तितकंच खरं. 
(लेखक गोव्यातील मुक्त पत्रकार आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com