पहाटपावलं : भीतिपलीकडची अम्लान फुले

Sonali-Navangul
Sonali-Navangul

सगळी उत्साही तरुण मुलंमुली होती. गप्पा रंगून गेलेल्या. विषय हा की दुबळं नि शक्तिहीन केव्हा वाटतं? कुठल्याही अनुभवानं मन असं कचकड्याचं हुळहुळं होऊन बसतं तेव्हा करायचं काय? मुलांचे अनुभव बहुतांशी एकसारखेपणा असणारे होते, यश, जबाबदारी, नेतृत्व याबाबतीतल्या स्टिरिओटाईप्सना कुरवाळणारे. ‘मी दुबळा पडलो तर कसं चालेल? मग मला वाटणारी भीती, रडू मी तात्पुरतं कोंडून ठेवलं, तर नंतर ती भावना निघून जाईल.

यातूनच माझा स्ट्राँगनेस मला जाणवतो. समजा मित्राकडं बोलून बसलो तर तो म्हणणार, लेका पुरुषासारखा पुरुष तू, हातपाय काय गाळतोस? आपण असं करून भागतंय होय रे?’ - दाटलेली मोठी, नाहीतर किरकोळ अस्वस्थता बोलून दाखवायची, चार हुंदके आले तरी काय हरकत? पण या मुलांनी स्वत:ला तशी मुभा दिली नाहीये. त्यात त्यांना कणखरपणा जाणवतो, कारण कणखरपण म्हणजे हेच ही व्याख्या प्रत्येक पिढीनं त्याच्या मनात फिट केलीय. मुलींना सतत नाती गमावण्याची भीती, बोललो ते चूक की बरोबर याची भीती, गप्प राहाण्याची कोंडी नि सतत विव्हळ का याचीही कोंडी.

एक म्हणाली, ‘कामानिमित्त सतत फिरावं लागतं त्यावेळी चाळिशीच्या पुढच्या पुरुषांकडून किळसवाण्या स्पर्शाची जाणीव झाली. हे खरं नाही, कुणी कशाला करेल असं म्हणत मी आधी काही दिवस दुर्लक्ष करत राहिले, पण नंतर जाणवलं की यानं भीती वाटू लागलीय. मग अलीकडेच एका अशा पुरुषाला काही न म्हणता थेट बघत राहून तिथून उठायला भाग पाडलं. हिम्मत वाटली. मग पुढच्या खेपेस तसंच झालं, तेव्हा मात्र ही मात्रा लागू पडली नाही. आता पुन्हा धीर डळमळलाय. माझं काहीतरी चुकतंय!’ मीही सांगितलं, की परवा मला एका घरगुती पार्टीत खूप छान कलाकारानं विचारलं, ‘काय हो, तुम्ही काही घेत नाही?’  तेव्हा मी म्हटलं, ‘नको. आत्ता अँटिबायोटिक्‍स चालूहेत.’ ते ऐकणाऱ्या दुसऱ्या कलाकारानं मला प्रश्‍न केला, ‘मला सांग, कधी चालू नसतात तुला अँटिबायोटिक्‍स?’

तीनचारवेळा ‘वजन किती वाढलंय तुझं’ असं म्हटल्यावर घायाळ झाले होते. आता कळतं, माझी अस्वस्थता, भीती, दुबळं वाटणं याची नेमकी कारणं पाहून मला त्यांच्याशी गप्पा करता यायला हव्यात. भावनांची निर्दोष व्यवस्था लावता यायला हवीय. भीती नि धैर्य यांचे प्रदेश ‘क्ष किरण’ लावून बघायला हवेत. सतत ‘स्ट्रगल फॉर वर्दीनेस’च्या लीगमध्ये सामील होण्यापेक्षा भीती नि हुळहुळेपण मान्य करून पुढे सरकणं नि मिळालेल्या ज्ञानाशी कृतज्ञ असत त्याचा श्रृंगार करणं सुंदर! स्वत:ला समजून घेण्यातून जे कनवाळूपण, समवेदना उगवते तिथून नावीन्याच्या, सर्जनाच्या नि आनंदाच्या नव्या शक्‍यता फुटताहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com