सायटेक : जपानच्या मंदिरात रोबो पुजारी

सुरेंद्र पाटसकर
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

बौद्ध धर्माबद्दल लोकांची रुची कायम राहावी यासाठी जपानमधील सुमारे ४०० वर्षांपूर्वीच्या एका बौद्ध मंदिरामध्ये ‘रोबो पुजारी’ नियुक्त करण्यात आला आहे. धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे बदलेल, असा विश्वास मंदिराच्या विश्वस्तांना वाटतो आहे..

बौद्ध धर्माबद्दल लोकांची रुची कायम राहावी यासाठी जपानमधील सुमारे ४०० वर्षांपूर्वीच्या एका बौद्ध मंदिरामध्ये ‘रोबो पुजारी’ नियुक्त करण्यात आला आहे. धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे बदलेल, असा विश्वास मंदिराच्या विश्वस्तांना वाटतो आहे...

मंदिरांमध्ये सर्वसाधारणपणे पुजाऱ्याचे काम पुरुष मंडळीच करतात. त्यातही एका विशिष्ट घराण्याकडे ही जबाबदारी सोपविलेली असते. आता त्यात थोडा बदल होऊन महिला पुजाऱ्यांचीही नेमणूक अनेक ठिकाणी करण्यात आली आहे; पण एखाद्या रोबोला अर्थात यंत्रमानवाला पुजाऱ्याचे काम करताना कधी बघितले आहे का? हो, ही गोष्ट घडलीय जपानमधील क्‍योटो शहरातील ४०० वर्ष जुन्या बौद्ध मंदिरामध्ये. नियमित पुजाऱ्यांच्या जोडीला एक रोबो पुजारीही नियुक्त करण्यात आला आहे. या रोबोचे नाव ‘मिंदर’ असे ठेवण्यात आले आहे. क्‍योटोमधील कोदाइजी मंदिरात या आधुनिक पुजाऱ्याला पाहता येऊ शकते. हा रोबो मंदिरात हात जोडून प्रार्थना करतो आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांना दया आणि करुणा यांची शिकवणही देतो. मंदिरातील इतर पुजारी आवश्‍यकतेनुसार या रोबो पुजाऱ्याची मदत करतात.

मंदिरातील एक पुजारी टेन्शो गोटो यांचे म्हणणे आहे की, हा रोबो कधीच मरणार नाही. काळासोबत तो स्वतःला विकसित करत जाईल. हेच या रोबोचे वैशिष्ट्य आहे. बौद्ध धर्मातील गोष्टींनुसार तो आपल्या ज्ञानात भर घालेल, त्यामुळे लोकांना अडचणीतून मार्ग दाखविण्याचे काम त्याला करता येऊ शकेल. हा रोबो म्हणजे बदलत्या बौद्ध धर्माचे रूप आहे, असेही गोटो यांचे म्हणणे आहे.

हा रोबो पुजारी साधारतः सहा फूट उंच आहे. त्याचे हात, खांदे आणि चेहरा यांच्यावर सिलिकॉनची त्वचा लावली आहे. त्यामुळे तो भाग हुबेहुब मानवी त्वचेप्रमाणे दिसतो; परंतु, त्याचा बाकीचा धातूचा भाग उघडाच असल्याने तो रोबो असल्याचे लगेच कळते. त्याचे कपाळ ॲल्युमिनियमचे आहे व डोळ्यांत कॅमेरे बसविलेले आहेत. वजन आहे सुमारे ३५ किलो. हा रोबो तयार करण्यासाठी सुमारे १० लाख अमेरिकी डॉलर खर्च आला आहे. ओसासवा विद्यापीठातील रोबोटिक्‍सचे प्रसिद्ध प्राध्यापक हिरोशी इशिगुरो आणि झेन मंदिर यांच्या संयुक्त प्रकल्पातून याची निर्मिती झाली आहे. 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर हा रोबो विकसित होत जाईल, असा विश्वास मंदिराच्या विश्वस्तांना वाटतो. अहंकार, क्रोध यांच्या धोक्‍यांबाबत तो बोलतो. खोट्या अहंकाराबद्दल तो लोकांना सावधही करतो. जपानमधील तरुण पिढीवर धर्माचा प्रभाव कमी आहे. मंदिराचे महत्त्व केवळ लग्न आणि अंत्यसंस्कारांसाठी आहे, असे तरुण पिढीला वाटते. अनेक गोष्टी केवळ परंपरा म्हणून ते पाळतात. पारंपरिक भिक्‍खू ज्या तरुण पिढीपर्यंत पोचू शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत हा रोबो पुजारी पोचू शकेल, असा विश्वास गोटो यांना वाटतो. 

ओसाका विद्यापीठाने या रोबोबाबत सर्वेक्षणही घेतले. तेव्हा बहुतेक सर्वांनी रोबो पुजाऱ्याचे स्वागत केले; पण पुजारी अनैसर्गिक असल्याने त्याचे आकर्षण कायम राहिले नसल्याचे सांगितले. परदेशी पर्यटकांनी मात्र या प्रयोगावर नाराजी व्यक्त केली. धर्माची पवित्रता यामुळे नष्ट होत असल्याचे मत अनेक परदेशी पर्यटकांनी व्यक्त केले. काही पर्यटकांनी या निर्णयाची तुलना ‘फ्रॅंकेस्टाइनच्या राक्षसा‘शी केली आहे. हा एक काल्पनिक राक्षस आहे. 

धर्माचा कट्टरपणे कमी होत असल्याचे व धर्मनिरपेक्षता वाढत असल्याचे जागतिक चित्र आहे. त्यामुळे लोकांना धर्माकडे पुन्हा वळविण्यासाठी नव्या गोष्टींची अंमलबजावणी जगभरात केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व मोठ्या धार्मिक संस्थांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा आधुनिक साधनांचा वापर करण्यास सुरवात केली आहे. तशाच प्रकारे क्‍योटोतील मंदिराने नव्या तंत्रज्ञानाचा वापर जाणीवपूर्वक सुरू केला आहे.

मिंदर हा रोबो पुजारी लोकांशी संभाषण करत नाही. मात्र, बौद्ध धर्माशी निगडीत प्रार्थना म्हणून दाखवतो. पुढच्या टप्प्यात त्याच्यातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. धार्मिक गोष्टी करणारा ‘मिंदर’ हा जपानमधील एकमेव यंत्रमानव नाही. गेल्या काही वर्षांपासून ‘पेप्पर’ हा यंत्रमानव अंत्यसंस्कारावेळी बोलावला जातो. तो पारंपरिक मंत्र आणि त्याच्या जोडीने ड्रमही वाजवतो. संबंधित कंपनीकडून हा यंत्रमानव भाड्याने दिला जातो. थोडक्‍यात सांगायचे झाले तर ‘धार्मिक’ यंत्रमानवांचे युग ‘मिंदर’पासून सुरू झाले, तर आश्‍चर्य वाटायला नको.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Surendra Pataskar