esakal | अग्रलेख : शालीन रणरागिणी
sakal

बोलून बातमी शोधा

sushma-swaraj

राजकारणाच्या क्षेत्रातही शालीनता जपता येते, हे दाखवून देणाऱ्या सुषमा स्वराज यांनी केंद्रातील मंत्रिपदे कार्यक्षमतेने भूषविली. विशेषतः परराष्ट्र खात्यात काम करताना त्यांनी एक मानदंडच उभा केला.

अग्रलेख : शालीन रणरागिणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजकारणाच्या क्षेत्रातही शालीनता जपता येते, हे दाखवून देणाऱ्या सुषमा स्वराज यांनी केंद्रातील मंत्रिपदे कार्यक्षमतेने भूषविली. विशेषतः परराष्ट्र खात्यात काम करताना त्यांनी एक मानदंडच उभा केला.

सुषमा स्वराज यांनी आपल्या चार-साडेचार दशकांच्या प्रवासात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी तसेच जॉर्ज फर्नांडिस या तीन ज्येष्ठ नेत्यांचा आदर्श समोर ठेवला होता. वाजपेयी यांच्याकडून त्यांनी शालीनता आणि सुसंस्कृतता हे गुण उचलले, तर अडवानी यांच्याकडून त्यांना आक्रमक बाणा व वैचारिक निष्ठा यांचा वारसा लाभला. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) फर्नांडिस यांच्याकडून तळाच्या पातळीवरील सामान्य माणसांबद्दलची कणव त्यांना शिकायला मिळाली आणि आयुष्यभर त्यांनी याच आदर्शांना सामोरे ठेवत राजकारण केले. त्यामुळेच इंदिरा गांधी तसेच सोनिया गांधी यांच्यानंतर देशभरात गाजलेल्या महिला नेत्या म्हणून त्यांचे नाव कायम घेतले जाईल. नोकरशाहीच्या कार्यपद्धतीचा जास्त पगडा असलेल्या परराष्ट्र खात्याला त्यांच्यामुळे ‘मानवी चेहरा’ लाभला. त्याचे इंगित त्यांच्या कार्यशैलीत होते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून काश्‍मीर प्रश्‍नावर आणि इतरही मुद्द्यांवर भारताची बाजू प्रभावीपणे मांडण्याचे त्यांचे कामही दीर्घकाळ स्मरणात राहील.

सत्तरच्या त्या अस्वस्थ दशकात त्यांनी अभाविपच्या माध्यमातून राजकारणाचे प्राथमिक धडे गिरवले. वकिली पेशा पत्करल्यावर सर्वोच्च न्यायालयात त्यांची भेट स्वराज कौशल यांच्याशी झाली. त्या हृद्य संबंधांचे रूपांतर पुढे विवाहात झाले. कौशल हे फर्नांडिस यांचे सहकारी. त्यांचे नेतृत्वही सुषमाताईंना जवळून पाहायला मिळाले. आणीबाणीनंतर जनता पक्षाचे मंत्रिमंडळ हरयाणात सत्तारूढ झाले, तेव्हा सुषमाताईंची पक्षनिष्ठा तसेच आक्रमक वकिली बाणा, यामुळे मंत्रिपद त्यांच्याकडे चालत आले. तेव्हा देशभरातील सर्वांत तरुण मंत्री म्हणून लाभलेले बिरुद त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सार्थ करून दाखविले. पुढे पूर्वाश्रमीच्या जनसंघवासीयांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली तेव्हा विद्यार्थी परिषदेची मुळे त्यांना त्या पक्षात घेऊन गेली. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद, लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद, केंद्रातील मंत्री अशा अनेक भूमिका त्यांनी प्रभावीपणे बजाविल्या. सोनिया गांधी यांनी कर्नाटकात बेल्लारी येथून १९९९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा स्वराज यांनी त्यांच्याशी दिलेली चुरशीची झुंजही कायम लक्षात राहील. खरे तर वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर अडवाणी तसेच मुरलीमनोहर जोशी यांच्यानंतर दुसऱ्या फळीतील प्रमोद महाजन, वेंकय्या नायडू, अरुण जेटली, राजनाथ सिंह यांच्यासमवेत सुषमा यांचेही नाव घेतले जात होते आणि पाच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी बजावल्यानंतर पुढे २०१४ मध्ये त्यांना पंतप्रधानपदाची मनीषा असली तर नवल नव्हते. मात्र, त्यांनी ते कधी बोलूनही दाखवले नव्हते. अगदी बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सुषमा पंतप्रधान झालेल्या बघायला आवडेल!’ अशी टिप्पणी केल्यावरही त्यांनी मौनच बाळगले होते. अखेर संघपरिवार तसेच भाजप यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांची निवड केली, त्याकडेही त्यांनी राजकीय अपरिहार्यता म्हणूनच बघितले आणि हाती आलेल्या परराष्ट्रमंत्रिपदाला थेट सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवले. खरे तर मोदी स्वत:च हे खाते हाताळत असल्याचे चित्र २०१४ नंतर लगेच उभे राहिले होते. त्यानंतरही सुषमाताईंनी या खात्यावर आपला अमीट ठसा उमटवला, हे विशेष. जनतेला परदेशगमनासाठी लागणारा ‘व्हिसा’ मिळण्यात कोणतीही अडचण आली, की त्यांनी तो माणूस आपल्या घरातलाच आहे, असे समजून जनतेची कामे केली आणि त्यामुळेच लोकांनी त्यांना ‘व्हिसाराणी’ असे कौतुकाने संबोधायलाही सुरवात केली! कोणत्याही देशातील भारतीय दूतावास हे त्या त्या देशातील भारतीयांना आपले दुसरे घर वाटायला हवे, असे त्या कायम सांगत आणि आपले ‘ट्विटर हॅंडल’ हे परराष्ट्र खात्याची ‘हेल्पलाइन’च त्यांनी बनवून टाकले. मात्र, एवढ्यापुरती त्यांची कामगिरी मर्यादित नाही. भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपावरून पकडल्यावर पुढे हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल झाला. त्यात भारताच्या भूमिकेला मिळालेल्या यशाला स्वराज यांनी पडद्यामागून हलविलेली सूत्रे कारणीभूत ठरली.   

मात्र, २००४ मध्ये भाजपचा पराभव झाल्यावर सोनिया गांधी पंतप्रधान होण्याची शक्‍यता निर्माण झाली तेव्हा त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया संयत नव्हती; तसेच उद्योगपती ललित मोदी यांनी भारतातून पलायन केले तेव्हाही परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका अवाजवी उत्साह दाखवणारी होती, अशी टीका झाली. हे असे असले तरी एरवी त्यांनी राजकारणातील आपली प्रतिमा कसोशीने जपली. वाजपेयी यांच्याप्रमाणेच सर्वपक्षीय संपर्क-संवाद असलेल्या त्या नेत्या होत्या. विरोधकांनी कधी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती! गेले काही दिवस जेटली हेही प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणाबाहेर आहेत व महाजन यांची तर निर्घृण हत्याच झाली. एकूणच वाजपेयी-अडवाणी युगातील भाजपच्या दुसऱ्या पिढीतील बहुतेक तारे राजकारणाच्या क्षितिजावरून अस्तंगत झाले आहेत. सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे शालीनता जपणाऱ्या, प्रसंगी रणरागिणी बनणाऱ्या नेत्या आपण गमावल्या आहेत.

loading image