#यूथटॉक : कॉलेजच्या उंबरठ्यावरची शोधयात्रा

तन्मय इकारे
Saturday, 24 August 2019

आपल्याकडं अकरावी-बारावीला कनिष्ठ महाविद्यालयच म्हणत असले तरीही तो शालेय जीवनाचाच एक भाग असतो. बारावीनंतर खऱ्या अर्थाने कॉलेजचा उंबरठा गाठला जातो. त्या टप्प्यावर मनात आलेले विचार कागदावर उतरवावेसे वाटले.  कॉलेजचं जग कसं असेल, याची एकीकडे उत्कंठा, तर दुसरीकडे बारावीच्या वर्षांने दिलेल्या कटू-गोड अनुभवांची आठवण. त्यातही कटूपणाचे पारडे जास्त जड.

आपल्याकडं अकरावी-बारावीला कनिष्ठ महाविद्यालयच म्हणत असले तरीही तो शालेय जीवनाचाच एक भाग असतो. बारावीनंतर खऱ्या अर्थाने कॉलेजचा उंबरठा गाठला जातो. त्या टप्प्यावर मनात आलेले विचार कागदावर उतरवावेसे वाटले.  कॉलेजचं जग कसं असेल, याची एकीकडे उत्कंठा, तर दुसरीकडे बारावीच्या वर्षांने दिलेल्या कटू-गोड अनुभवांची आठवण. त्यातही कटूपणाचे पारडे जास्त जड. बारावीचं वर्ष म्हणजे सततचा अभ्यास, त्यात प्रत्येक आठवड्यात होणाऱ्या सराव परीक्षा, कमी मार्क पडतील याचा मनावर येणारा ताण, मग त्याचा पुढच्या परीक्षेवर होणारा परिणाम. बारावीसोबतच ‘बारावीनंतर काय?’

आपली आवड की इतरांचं अनुकरण? आवडीचे ना- आवडीचे विषय, मनाची होणारी घुसमट, असं सगळं अनुभवलं. पण अशाच वेळी आधार देणारे मित्र भेटले. दडपणातून तात्पुरती होणारी सुटका आणि पुन्हा झेप घेण्यासाठी मिळणारे बळ, याचा दिलासाही मिळत गेला. खरंच अनेक संमिश्र क्षणांची साक्ष देणारे हे वर्ष खूप काही शिकवून गेले. दहावीपर्यंतचा काळ म्हणजे खेळाच्या तासाला कवायतीला जाताना हात बांधून जातो अगदी तसाच एका सरळरेषेतील प्रवास; पण त्यानंतरचा काळ म्हणजे खो-खोमधील धावणं होय. थांबलं की बाद होणं आलंच. त्यातून पहिल्यांदाच घरापासून लांब राहणं, अर्थातच ‘हॉस्टेल लाइफ,’ ‘मेस’चं जेवण, रूममधील घमासान या साऱ्या गोष्टींतून तावूनसलाखून बाहेर पडणं म्हणजे पुस्तकाइतकंच पुस्तकाबाहेरचं जगणं शिकणं होय. परिस्थितीची जाणीव होणं म्हणजे काय असतं, हे खरं तर बारावीमध्ये कळलं. 

पालकांच्या अपेक्षा हाही ताणाचा विषय बनतो, हे खरं आहे. समाजात आपण पाहतो, की जी स्वप्नं पालक स्वतः पूर्ण करू शकले नाहीत, त्या स्वप्नपूर्तीची अपेक्षा ते त्यांच्या मुलांकडून ठेवतात. अनेकदा त्या अपेक्षा मुलांना ओझं वाटू लागतात. मग विद्यार्थी-पालक यांच्यातील अंतर वाढू लागतं. त्यातून निर्माण होणारा तणाव, येणारे औदासीन्य आणि अशाच वेळी लागणाऱ्या वाईट सवयी. त्यातून उद्‌ध्वस्त होणारी आयुष्यं... हे सगळंच खूप चिंताजनक आहे. पण पालकांच्या बाबतीत माझं मत थोडं वेंगळं आहे.

त्यांच्या अपेक्षांमागील हेतू वाईट नसतो. मुलाने आयुष्यात काहीतरी चांगलं करून दाखवावं, त्यांनी `घडावं’ असंच त्यांना वाटत असतं. पालकांचा हा निःस्वार्थी हेतू आम्ही समजून घ्यायला हवा. तसा तो घेतला, की वाढत गेलेलं अंतर आपोआपच कमी होत जातं. पालकांच्या अपेक्षा लादून न घेता त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा आणि आपली आवड यांचा एक सुवर्णमध्य काढता येऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांच्या पोटी जन्म घेऊन अभिनय क्षेत्रात उंची गाठणारी दीपिका हे होय. हा संवाद सुरू होणं म्हणजे आपलं व्यक्तिमत्त्व घडण्याचा आरंभबिंदू होय. त्यातूनच आपण आपल्या करिअरला दिशा देऊ शकतो आणि त्यासाठी महाविद्यालयीन विश्‍व  महत्त्वाचं असतं. माणूस त्याच्या करिअरमध्ये कितीही पुढे गेला तरी त्याची खरी ओळख त्याचं व्यक्तिमत्त्व देत असतं.

मग मनात विचार येतो, की बारावीमध्ये आपण अभ्यास एके अभ्यास केला; मग व्यक्तिमत्त्व घडायचं कसं? तर हीच संधी महाविद्यालयीन जीवन देईल. ते जीवन एखाद्या बगीच्यासारखं असतं,अशी माझी कल्पना आहे. महाविद्यालयीन उपक्रमांकडे मी आणि माझे मित्र खूप औत्सुक्‍याने पाहात आहोत. आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल, अशी आशा बाळगून आहोत.  गुहेतून उजेडाच्या अपेक्षेने चालत चालत बाहेर पडावं आणि अंगावर सूर्यकिरणांनी प्रकाश उधळावा अगदी तीच भावना माझी व माझ्या सहकाऱ्यांची महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना होत आहे. याही जगात आव्हानं असणारच आहेत; पण त्या आव्हानांसोबतच आम्हाला ‘घडायच्या’ संधीही असणार आहेत. आज अनेक कलावंतांच्या, लेखकांच्या अथवा कोणत्याही क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तींची मनोगतं ऐकली किंवा वाचली तर अनेक वेळा त्यांच्या महाविद्यालयीन आठवणी असतातच.

अनेकांना पहिली संधी याच जगताने दिली आहे, हेही कळतं.पण या बगीच्यात हरविण्याची भीतीही असते. हे हरवणं मात्र आपल्या इच्छा-आकांक्षा या साऱ्यांनाच हरवून बसतं. त्यामुळं प्रत्येकानं स्वतःमध्ये डोकावून स्वतःला काय हवं, याचा शोध घेतला पाहिजे. आपल्या आवडीनुसार निवडलेल्या मार्गानेच आम्ही चालत राहिलं पाहिजे. याचं कारण स्वतःचा शोध घेणारा माणूस मागे राहात नाही, अशी माझी श्रद्धा आहे.
(लेखक आळंदी येथे ‘माहिती-तंत्रज्ञाना’चे शिक्षण घेत आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Tanmay Ikare