शेपूट वाकडे ते वाकडेच !

विनायक श्रीधर अभ्यंकर
Thursday, 16 July 2020

साम्राज्य- विस्ताराची भूक वाढत चाललेल्या चीनला भारताने वेसण घातलीच पाहिजे. कारण आशाळभूत चीनचे लक्ष व लक्ष्य काश्‍मीर आणि अरुणाचल प्रदेश आहे. यातून आशियातील सत्तेचा समतोल तर बिघडेलच, शिवाय सीमेवर चीन कायमचा ठाण मांडण्याचा धोका आहे.

साम्राज्य- विस्ताराची भूक वाढत चाललेल्या चीनला भारताने वेसण घातलीच पाहिजे. कारण आशाळभूत चीनचे लक्ष व लक्ष्य काश्‍मीर आणि अरुणाचल प्रदेश आहे. यातून आशियातील सत्तेचा समतोल तर बिघडेलच, शिवाय सीमेवर चीन कायमचा ठाण मांडण्याचा धोका आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंतरराष्ट्रीय राजकारणातील सारीपाटावर सध्या चीनची तिरकी चाल विशिष्ट हेतूने पडते आहे. जागतिक महाशक्तीचा ध्यास घेतलेली ‘लाल सेना’ विस्तारवादातून आशियात दबदबा निर्माण करत आहे. तिबेट गिळंकृत करत आता त्याची भूक आहे बाल्टिस्तान - वझिरीस्थानची भूमी व्यापून भारताला कोंडीत गाठणे. पूर्वोत्तर सीमेवर अरुणाचल (नेफा) वर डोळा ठेवून चीन तशा चाली खेळताना पश्‍चिमोत्तर सीमेलगत पाकव्याप्त काश्‍मीरच्या दिशेने भारताला संभाव्य धोक्‍यात टाकत पुढे सरकत आहे. पाकिस्तान ही भूमी पन्नास वर्षांच्या लीजने चीनला सुपूर्त करतो आहे. नेफा - तिबेट - पाकव्याप्त काश्‍मीर- पाकिस्तान अशी रेल्वे चीन सुरू करत असून, चार हजार चिनी तंत्रज्ञ या भागात आहेत. ही सगळी लक्षणे म्हणजे सीमेवरील आगळीक आहे. या सर्व तिरकस चाली व डावपेच चीनच्या पोटात काय चालले आहे याच्या निदर्शक असून, त्यांची राजकीय व लष्करी दखल घेऊन भारताने पावले उचलणे अत्यावश्‍यक आहे. कारण खंडित झालेला रशिया आता भारताला कितपत पाठिंबा देईल हा प्रश्‍न आहे.

१९६२ च्या युद्धप्रसंगी रशिया चीनला भाऊ, तर भारताला केवळ मित्र म्हणाला होता. गेली ७० वर्षे भारत व पाकिस्तान काश्‍मीर समस्येमध्ये गुंतले आहेत. आता पाकच्या माध्यमातून चीन भारतावर लष्करी दडपण आणून ६२च्या युद्धात व सध्या गिळंकृत केलेल्या भारतीय भूमीवर सेना घुसवत असून वर म्हणतो आहे, की सीमेबाबत वाद असून, जुने नकाशे आम्ही दुरुस्त करत आहोत. नवीन नकाशे मुद्रित करून जगासमोर प्रकाशित करू, हे १९६२ पासूनचे तिबेट गिळंकृत केल्यापासूनचे तुणतुणे चीन वाजवत आहे.

पाकिस्तान आणि चीनची कुटिल नीती
आतातर द्विपक्षीय चर्चेत चीनला खेचून पाकिस्तान काश्‍मीरचा गुंता वाढवत आहे. अमेरिकेशी पुसट होत चाललेल्या संबंधांमुळे पाकिस्तान आता ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नीतीने चीनचा वापर करून घेऊ पाहतो आहे. निर्णायक समरप्रसंग ओढवला तर चीनने भारतावर दडपण आणावे, हा या कुटिल नीतीचा भाग आहे. आयती चालू आलेली ही संधी पाकिस्तानला दवडायची नसून, आयूबखान - चौ एन लाय यांच्यातील १९६१-६२ मधील चीन-पाक सीमा कराराचे तो पुनरुज्जीवन करू पाहत आहे. या करारात पाकिस्तानने अरुणाचल हा भाग चीनचा, तर चीनने संपूर्ण काश्‍मीर पाकिस्तानचे हे मान्य करून तसे नकाशे छापले होते. या पार्श्‍वभूमीवर भारताने काश्‍मीर समस्येवर राष्ट्रीय हिताची जपणूक करण्याकरता पुनर्विचार करून काश्‍मीरबाबतची भूमिका स्पष्ट करणे अत्यावश्‍यक ठरते. कारण १९७१च्या युद्धात चीनने रशियाच्या सहभागामुळे पाकला मदत केली नाही; पण आता या संघर्षात चीन तटस्थ राहणार नसून, काश्‍मीर समस्येवर पाकिस्तान आक्रमक होत असतानाच फुटिरतावादी रोज आपली भूमिका बदलून हा प्रश्‍न अधिकाधिक गुंतागुंतीचा बनवत आहेत.

१९६२ च्या युद्धानंतर गेली साठ वर्षे सातत्याने नेपाळलगत सीमा भागात वर्चस्व निर्माण करण्यात चीन गुंतला असून, तिबेटलगतच्या आपल्या सीमाभागात चीनने क्षेपणास्त्रे उभी केली आहेत. इतकेच नव्हे, तर भारत-चीन प्रत्यक्ष सीमा रेषेजवळ आपले वर्चस्व निर्माण करण्यात तो गुंतला असून, एप्रिलमध्ये घुसखोरी करून त्याची प्रचिती दिली आहे. गेली ७० वर्षे चीन सीमा प्रांतात रस्ते बांधून लष्करी ठाणी उभारण्यात व्यग्र आहे. सीमेवर चीनने पश्‍चिमी भागात आठ, मध्य प्रांतात चार, पूर्वोत्तर भागात ३७ पक्के, युद्धकालीन दळणवळणास योग्य रस्ते बांधले आहेत. या रस्तेबांधणीत ७४० किलोमीटरचे रस्ते भारतीय हद्दीतून काराकोरम खिंडीपर्यंत बांधून पाकच्या साह्याने हा ड्रॅगन पसरत आहे.  

चीनचा अरुणाचलवर डोळा
१९६२ च्या युद्धात जी आक्रमकता चीनने दाखवली, तीच खुमखुमी चीन पाकिस्तानच्या माध्यमातून भारताविरुद्ध अवलंबून अरुणाचल काबीज करण्याचे मनसुबे रचत आहे. रशियाच्या पतनानंतर चीनच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटल्यामुळे भारताने या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी शस्त्रसज्ज होऊन सीमेलगत डोंगराळी पलटणाच्या दहा डिव्हिजन तैनात करणे योग्य ठरेल. ध्वज - बैठका, राजकीय फलशून्य चर्चा यांच्या गुऱ्हाळात अडकून केवळ खुलासे न करता ठोस उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.

साम्राज्य विस्ताराची भूक वाढत चाललेल्या चीनला वेसण घातलीच पाहिजे. कारण आशाळभूत चीनचे लक्ष व लक्ष्य काश्‍मीर व अरुणाचल प्रदेश आहे. पुढील काळात ‘गरज सरो नि वैद्य मरो’ या न्यायाने चीन पाकचा विश्‍वासघात करेलच करेल. तसेच १९६२ च्या युद्धातील लष्करी सैनिकी व मुत्सद्देगिरीच्या अपयशाची कारणमीमांसा व उपाय याबाबत ‘व्हिक्‍टोरिया क्रॉस’ विजेते जनरल पी. एल. भगत व जनरल हॅंडर्सन ब्रुक यांनी तपशीलवार मांडलेल्या अहवालातील उपाययोजना तातडीने अमलात आणल्या पाहिजेत, अन्यथा चीनची भूप्रदेश भूक दिवसेंदिवस वाढत जाईल. यामुळे आशियातील सत्तेचा समतोल तर बिघडेलच, शिवाय सरहद्दीवर कायमच बागुलबुवा ठाण मांडेल.
(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article vinayak abhyankar on india and china dispute