Entertainment
Entertainment

भाष्य : ऐसे ऐंशीच्या दशकाचे जगणे ...

इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. बाकी इतिहासाचे माहीत नाही, पण इतिहासजमा झालेल्या एका दशकाची पुनरावृत्ती सध्या होत आहे. हे दशक आहे ऐंशीचे. या दशकाचे ठळक वैशिष्ट्य असलेल्या काही घटना नि परिस्थितीचा अनुभव ‘कोरोना’ आणीबाणीच्या काळात आपण घेत आहोत. अर्थात तो मर्यादित आहे. कदाचित त्याची व्याप्तीही शहरी मध्यमवर्गापुरती मर्यादित असेल. पण तो येतोय, हे मात्र खरे.

ऐंशीच्या दशकाचा सध्या ठळकपणे जाणवणारा, पण वरवरचा अनुभव म्हणजे ‘रामायण’- ‘महाभारत’ या मालिकांचे प्रक्षेपण. त्या दशकाच्या उत्तरार्धात आलेल्या या मालिकांनी लोकप्रियतेचे उच्चांक प्रस्थापित केले होते. आज तीसेक वर्षांनी त्या लोकप्रियतेचा तोच अनुभव पुन्हा येत आहे. एक महत्त्वाचा फरक म्हणजे पूर्वी या मालिकांमुळे रस्ते व कार्यक्रम ओस पडायचे. आता रस्ते आणि सारे सार्वजनिक आयुष्य ‘कोरोना’मुळे आधीच ओस पडले आहे. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काहीएक काम या मालिका करीत आहेत. या मालिका दाखवायला लागल्यापासून दूरदर्शनच्या एरवीच्या  पडेल ‘टीआरपी’ने विक्रमी उसळी घेतली आहे.

‘सर्कस’, ‘चाणक्‍य’, ‘शक्तिमान’ याही मालिका पुन्हा प्रक्षेपित होत असल्याने आज पस्तीशीच्या पुढे असलेली मंडळी ऐंशी-नव्वदच्या दशकांचे स्मरणरंजन अनुभवत आहेत. तसेही, काही उत्तम करण्याची किंवा घडण्याची शक्‍यता फारशी उरली नाही, की मन स्मरणरंजनात गुंतते. त्यामुळेच पौराणिक व अन्य मालिकांमधून ऐंशी व नव्वदीचा ‘नॉस्टॅल्जिया’ सध्या अनेक पिढ्या अनुभवताहेत.

हे स्मरणरंजन टीव्हीपुरते मर्यादित नाही. ते सध्या रिकामपण घालविण्यासाठी खेळल्या जाणाऱ्या बैठ्या खेळांमध्येही पाहायला मिळते. घरच्या सगळ्यांसोबत कॅरम, पत्ते, व्यापार, सापशिडी, अष्टचंग वगैरे खेळ खेळण्याचे प्रसंग गेल्या दोनेक दशकांत कमी झाले होते. प्रथम टीव्ही, नंतर लॅपटॉप आणि शेवटी मोबाईलचा पडदा यांच्यामुळे ते मागे पडले होते. ऐंशी ते नव्वदीच्या पूर्वार्धापर्यंत बालपण घालवलेल्या किंवा त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या पिढ्या सुट्यांमध्ये हेच घरगुती खेळ खेळत. आज या पिढ्यांनी आठवणींच्या अडगळीत गेलेले हे खेळ बाहेर काढले. त्यातून या पिढ्या स्वतःच्या स्मरणरंजनाचा आणि घरातील लहानांच्या रंजनाचा अवकाश भरून काढायचा प्रयत्न करीत आहेत. खाद्यपदार्थांनाही हा मुद्दा लागू आहे.

एरव्ही हवे तेव्हा चायनीज ते कॉन्टिनेन्टल असे बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय झालेल्या आपल्याला आता घरात उपलब्ध साध्याशा सामग्रीतून बनणाऱ्या पारंपरिक पदार्थांची आठवण येऊ लागली आहे. आता हे पदार्थ काही ऐंशी-नव्वदच्या दशकातील नाहीत. ते दीर्घ पाकपरंपरेचे फलित आहेत.

पण नव्वदीनंतर अशा वाळवण- खारवण- घरगुती- दुष्काळी पदार्थांचा दैनंदिन वापर आणि भावनिक मूल्य कमी होत गेले. आता शक्‍यतो घरातलीच पिठे, चटण्या, कडधान्यांवर निभावून नेण्याची वेळ आली, तेव्हा या जुन्या पदार्थांचा बाजार गरम झालाय.

ऐंशी वा सत्तरच्या दशकाचे आणखीही काही खोल अनुभव आपण घेत आहोत. जीवनावश्‍यक गोष्टींचा तुटवडा आणि त्या मिळविण्यासाठी रांगा लावणे, हा अनुभव सत्तर- ऐंशीच्या दशकात अनेकदा यायचा. कारणे वेगळी असली, तरी आज ते चित्र आहे. तूप मिळत नसल्याने ‘डालडा’, दाणेदार साखर मिळत नसल्याने लेव्हीची भुरका साखर, गॅस मिळत नसल्याने रॉकेल किंवा कोळसा अशा तडजोडी सत्तरी-ऐंशीच्या काळात बालपण घालविलेल्या आणि त्यांच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या पिढ्यांच्या अंगवळणी पडल्या होत्या.

तुटवडा आणि रांगा हे त्यावेळच्या खरेदीच्या अनुभवविश्वाचा एक सामान्य भाग होता. हा अनुभव नव्वदीनंतर निदान शहरी मध्यमवर्गीयांच्या आयुष्यातून वेगाने कमी होत गेला. ॲपद्वारे साऱ्या वस्तू केव्हाही घरी मागविण्याची सवय झालेल्या नव्या सहस्त्रकाच्या बाळांना खरेदीसाठी सत्तर- ऐंशीच्या काळात करावा लागणारा आटापिटा आता थोडाफार कळेल. जीवनावश्‍यक गोष्टींकरिताही रांगा लावाव्या लागतात, हे सुदैवाने या नव्वदोत्तर मध्यमवर्गीय पिढीच्या अनुभवविश्वाचा भाग नव्हते. ‘कोरोना’ने त्यांना त्यांच्या आई-वडील, आजी-आजोबांच्या अनुभवविश्वाची अशी अचानक ओळख करून दिली. तुटवड्याच्या त्या दशकांमध्ये साठेबाजी, काळाबाजार, छुपी वाहतूक, स्मगलिंग हेही तेजीत असे. सत्तर- ऐंशीचे हिंदी चित्रपट आठवून बघा. त्यातील बहुतेक खलनायक हे या धंद्यांमध्ये गुंतलेले असायचे. नव्वदीनंतरच्या खुल्या बाजारपेठेच्या आणि जागतिकीकरणाच्या काळात हे प्रकार कमी होत गेले. ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आता पुन्हा या गोष्टी घडत आहेत.

आपल्या दैनंदिन जगण्यावर शासन-प्रशासनाच्या व्यवस्थेची थेट व घट्ट पकड असल्याचा अनुभव आपण पुन्हा घेतोय. सकाळी फिरायला जाण्यापासून ते उद्योगधंद्यांच्या कामकाजापर्यंत अनेक गोष्टींवर शासन-प्रशासनाचे थेट नियंत्रण आपण अनुभवतोय. हा लेख ‘छापलेल्या’ वर्तमानपत्रात वाचायला मिळणार की नाही हेदेखील सध्या सरकारी निर्णयावर अवलंबून आहे. शासन-प्रशासनाच्या अशा थेट आणि सर्वंकष पकडीचा अनुभव नव्वदीनंतरच्या काळात कमी झाला. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या या काळात सरकारच्या या दृश्‍य-अदृश्‍य नियंत्रणाला बऱ्याच मर्यादा घालण्यात आल्या. रेल्वे, आरटीओ, पासपोर्ट, नगरपालिका, करभरणा अशा मोजक्‍या बाबी सोडल्या, तर निदान शहरी मध्यमवर्गीयांना तरी शासनव्यवस्थेशी फारसा थेट संपर्क न येता, दैनंदिन व्यवहार करणे गेल्या दोनेक दशकांमध्ये शक्‍य झाले होते. पण ऐंशीपर्यंत अशी स्थिती नव्हती. सरकारचे धोरण, निर्णय, अंमलबजावणी, प्रशासनशैली याचा संबंध त्यावेळी दैंनंदिन जगण्यातही जाणवायचा. ऐंशीच्या दशकानंतर जन्मलेल्या शहरी-मध्यमवर्गीय पिढ्यांना ‘कोरोना’च्या निमित्ताने सरकार नावाच्या महाकाय व्यवस्थेचे इतके दैनंदिन पातळीवरचे विराटदर्शन प्रथमच अनुभवायला मिळतेय.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही ऐंशीच्या दशकाची आठवण व्हावी, अशी स्थिती दिसते. एरव्ही आपल्या मध्यमवर्गी जगण्याशी ‘डब्ल्यूएचओ’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थाचा संबंध पाठ्यपुस्तकातील नोंदीपलीकडे येत नाही. मात्र, आता त्या संस्थेचे काय चुकले-काय बरोबर वगैरे मुद्‌द्‌यांवर आपण चर्चा करायला लागलोय. ऐंशीच्या दशकापर्यंत ‘युनो’, ‘युनेस्को’, ‘डब्ल्यूएचओ’, ‘आयएलओ’ वगैरे जागतिक संस्था- संघटना अमेरिका आणि सोव्हिएत महासंघ या महाशक्तींच्या राजकारणाचे मोठे मैदान असायचे. त्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीतून या संघटना सर्वसामान्यांच्याही जाणीवविश्वात प्रवेश करायच्या. पण ऐंशीच्या उत्तरार्धापासून सोव्हिएत महासंघ कोसळल्यानंतर अमेरिका या एकमेव महासत्तेच्या प्रभावामुळे या जागतिक संघटनांचे महत्त्व, त्यातील राजकारणाचे डावपेच वगैरे मुद्दे सर्वसामान्यांच्या दृष्टीने गैरलागू होत गेले. गेल्या काही वर्षांमध्ये अजस्त्र निर्मितीक्षमता, प्रचंड सैन्यबळ, धूर्त राजकीय धोरणे आणि उपद्रवक्षमता यांमुळे चीन एक महासत्ता म्हणून उदयाला येत होताच. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ते आता ठळकपणे जाणवत आहे. महासत्तेच्या ठायी असणारे सारे गुण-दुर्गुण चीनने या काळात दाखविले आहेत. चीन-अमेरिका यांच्यात नवे शीतयुद्ध सुरू झाल्याच्या खुणा दिसत आहेत. जागतिक राजकारण एकध्रुवीय न राहता ऐंशीच्या दशकासारखे द्विध्रुवीय होत आहे.

‘डब्ल्यूएचओ’ चीनधार्जिणी असल्याचा आरोप करून या संघटनेचा मदतनिधी थांबविण्याचा अमेरिकेचा निर्णय तर ऐंशीच्या दशकात ‘युनेस्को‘तून बाहेर पडण्याच्या निर्णयाची आठवण करून देणारा.ऐंशीचे दशक पाहिलेल्या पिढ्यांना ‘कोरोना’च्या निमित्ताने त्या दशकाचे एक भान (इथॉस) पुन्हा जाणवले  तर न पाहिलेल्या नव्या पिढ्यांना त्याची चुणूक बघायला मिळतेय. ऐंशीचे दशक म्हणजे नुसता कालावधी नव्हे, नव्वदीपासून जे आरपार बदलत गेले, त्या एका व्यापक भानाचे आणि जीवनशैलीचे ऐंशीचे दशक म्हणजे शेवटचा साक्षीदार होते. ‘कोरोना’मुळे हा शेवटचा साक्षीदार पुन्हा समोर उभा ठाकला आहे. त्यातील काही गोष्टी स्मरणरंजनासारख्या तात्कालिक ठरतील, तर काही दीर्घकालीन बदलांच्या पाऊलखुणा असतील. पण एरव्ही दोन दशकांचे भिन्न भान सध्या आपण अनुभवत आहोत. त्यातील काय चांगले, काय नाही, काय टिकाऊ, काय ठिसूळ याचा अनुभवांच्या आधारे अंदाज घेण्याची संधी ‘कोरोना’च्या निमित्ताने मिळाली आहे. ती घालविता कामा नये. अन्यथा दुर्दैवी इतिहासाचीही पुनरावृत्ती होत राहील.
(लेखक संज्ञापन, तंत्रज्ञान आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com