भाजपची पंजाबमधील घोडचूक

नवी दिल्ली सीमेवर थांबलेले आंदोलक शेतकरी
नवी दिल्ली सीमेवर थांबलेले आंदोलक शेतकरी

पंजाब- शिखांचे सन्मानजनक सहकारी राहण्याऐवजी मोदी-शहा यांच्या भाजपने त्यांचे संरक्षक म्हणून प्रस्तुत करणे सुरू केले आहे. कृषी कायद्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची हाताळणी करण्याच्या या जोडगोळींच्या रणनीतीने शिखांना लढण्यास उद्युक्त केले आहे, जे त्यांना आवडते.

भाजपला राजकारण किती चांगले कळते? हा प्रश्न विचारल्यास डोके तपासून बघा, असे उत्तर मिळू शकते. भारतात भाजपपेक्षा राजकारण कुणालाही चांगले कळत नाही, अगदी मोठ्या फरकाने. लोकसभेत भाजपच्या जागा ३०३ आहेत तर दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला ५२ जागा मिळाल्या आहेत. एवढा हा मोठा फरक आहे. आता वरचा प्रश्न पुन्हा विचारू. भाजपला पंजाबचे राजकारण किती कळते? या प्रश्नाचे उत्तर माझ्या मते अतिशय कमी असे आहे. मोदी-शहा यांच्या भाजपला पंजाब, पंजाबी लोकांचे त्यातल्या त्यात शिखांचे राजकारण अजिबात कळत नाही. कळत असते तर कृषी कायद्यातील बदलानंतर पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मागण्यांची हाताळणी करताना त्यांनी स्वतःसाठी खड्डा कशाला खणला असता ? या खड्ड्यातून बाहेर पडण्याऐवजी तो अधिक खोल करण्याचे त्यांचे काम सुरू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तरेत पंजाबने मोदी यांच्या करिष्म्याला नख लावले. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत स्वतः नरेंद्र मोदी यांच्यावर सारी मदार असताना देखील पंजाबी जनतेला त्यांनी फारसे प्रभावित केले नाही. काही ठिकाणी त्यांनी भाजपऐवजी ‘आप’च्या उमेदवारांना पसंती दर्शवली. भाजपकडे शिरोमणी अकाली दलासारखा शिखांचा पक्ष खंदा सहयोगी असताना जनतेने ‘आप’च्या पर्यायाची निवड केली. अमृतसरमधून अरुण जेटली आणि हरदीपसिंग पुरी यांना भाजपला निवडून आणता आले नाही. अकाली दलाचे समर्थन असताना या दोघांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तरेतील पंजाब हा एकमेव प्रदेश आहे की तेथे दोन्ही निवडणुकांमध्ये मोदी यांची लाट थोपवून लावण्यात आली.

आणि हे करण्यासाठी त्यांना महामार्गांवर ना खंदक खोदावे लागले ना सुरक्षा कठडे फेकून द्यावे लागले ना दगडफेक करावी लागली. निवडणुकांमध्ये मोदी यांनी भगवे फेटे घालून जाहीर सभा घेतल्या. मात्र, पंजाबमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. शेजारच्या हरियाना आणि हिमाचल प्रदेशमध्ये मात्र त्यांना भरभरून समर्थन मिळाले. पाच वर्षांत पंजाबने या लाटा थोपवून धरल्या तरीही मोदी आणि शहा यांनी पंजाबमधील रणनीतीचा फेरविचार केला नसेल तर शेतकरी आंदोलनाच्या गचाळ हाताळणीनंतर नक्कीच करावा लागेल. आताही त्यांना फेरविचार केला नाही तर त्यांच्यात राजकीय शहाणपण आणि नम्रतेचा अभाव आहे, असेच म्हणावे  लागेल.

स्वतःला इंग्रजी बोलणाऱ्यांचा नव्हे तर सर्वसामान्यांचा पक्ष म्हणविणाऱ्या भाजपला पंजाबच्या मातीतील जुन्या शहाणपणाला आपलेसे करावे लागेल. तुम्ही एखाद्याच्या (जाट) शेतीतून ऊस तोडू शकत नाही. पण त्याच्याकडून गुळाची भेली मिळवू शकता. चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवत मिठी मारून त्याच्याकडून लस्सीपण मिळवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला आपले डोके झुकवून सुरवात करावी लागेल. शरण जाऊन नव्हे, पण नम्र आणि मित्रत्वाच्या भावनेतून तुम्हाला डोके झुकवावे लागेल. कृषी विषयक कायद्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीत भाजपचे वागणे नेमके उलट ठरले.

मोदी-शहांचे मॉडेल पंजाबमध्ये अपयशी?
मोदी यांची लोकप्रियता, हिंदुत्वाच्या आधारे ध्रुवीकरण, भ्रष्टाचारी नसल्याची प्रतिमा आणि राष्ट्रीयत्व या चार चाकांवर मोदी-शहा यांच्या भाजपचे मूलभूत राजकारणाचा गाडा चालतो. मात्र, हे मॉडेल पंजाबमध्ये अपयशी का ठरले? शेती कायद्यातील सुधारणांवर शेतीवर आधारित लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या आणि शेतकऱ्यांचे राजकारण तसेच आंदोलनात पुढे असलेल्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात तुलनेत शांतता आहे. मग पंजाबच का पेटला आहे? कारण हे राज्य वेगळे आणि आणि शीखही. भाजपच्या रथाच्या चार चाकांपैकी एक चाक ध्रुवीकरणाची आहे. याचा हिंदू-मुस्लिम असा विचार केला असता पंजाबमध्ये हा पर्याय  उपलब्ध नाही. हे भाजप-संघाच्या डोक्याला समजावून सांगणे कठीण आहे. मुस्लिमांबाबत जी भीती उत्तरप्रदेश, गुजरात, ब्रम्हपुत्रेचे खोरे वा उत्तर बंगालमध्ये भाजपला निर्माण करता आली तशी पंजाबमधील शिखांमध्ये करता आली नाही.

मलेरकोटला येथील मुस्लिमांना शिखांचे प्रेम आणि सुरक्षा कायम मिळत आहे. दहावे गुरू गोविंद सिंग यांच्या काळापासून प्रेमाचा हा धागा कायम आहे. कारण येथील नवाबाने गुरूंच्या मुलांना औरंगजेबपासून वाचवण्याचा प्रयत्न केला होता. याबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून प्रेमाचे हे नाते निर्माण झाले. पारंपरिकपणे संघ आणि भाजप शिखांना वेगळ्या पंथाचे हिंदू मानतात. तसेच शिख गुरूंनी हिंदूंना वाचवण्यासाठी लढा दिला, असेही या लोकांची मान्यता आहे. हिंदू आणि शीख हे एकाच शरीराचे अविभाज्य भाग आहेत आणि पंजाब हा भारताचा तलवार असलेला हात आह. हे सारे खरे असले तरीही शीख हे हिंदू नाहीत. त्यांच्यावर हिंदुत्वाचा प्रभाव नाही. अन्यथा त्यांनी मोदींना ते शिखरावर असतानाच्या काळात तीन वेळा नाकारले नसते.

१९६० च्या दशकात अकालींच्या पंजाबी सुभा चळवळीदरम्यान शीख आणि हिंदू यांच्यातील वाद आणि तणावाचा रंग अधिक गडद झाला. या चळवळीला संघ, भारतीय जनसंघाने तेव्हा विरोध केला होता. आणीबाणीत इंदिरा गांधी यांनी काही जणांना कारागृहात डांबले तेव्हा हे दोन्ही समाज परस्परांच्या जवळ आले होते. १९७७ नंतर अकाली आणि माजी जनसंघ यांच्यात हातमिळवणी झाली. पण लवकरच भाषा, संस्कृती आणि धार्मिक बाबींवर दुफळी माजली. यानंतरची दहा वर्षे दहशतवादात गेली. त्यात संघ, भाजपला लक्ष्य करण्यात आले. वाजपेयी आणि अडवानी यांना हिंदू आणि शिखांना जवळ आणल्याशिवाय पंजाब शांत होऊन तेथे पक्षाची वाढ होणार नाही, याची जाणीव झाली. त्यांनी समविचारी अकाली नेत्यांशी कारागृहात झालेल्या चर्चेतून हा धागा पकडला. त्यातून शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्यातील युतीचा विचार पुढे आला. या युतीत भाजप लहान भाऊ म्हणून आनंदी होता. राष्ट्रीय राजकारणात आणि केंद्रीय मंत्रिमंडळात प्रकाशसिंग बादल यांना मोक्याची जागा देण्यात आली. मदनलाल खुराणा यांच्यावर अकाली आणि भाजप यांच्यातील नाते टिकवण्याची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली. हा बंध सध्याच्या भाजपने अहंकाराने तोडून टाकला आहे.

शिखांना लढायला आवडते आणि मोदी सरकारने त्यांना लढण्याची संधीच उपलब्ध करून दिली आहे. पण याने काही साध्य होणार नाही. तुम्हाला पंजाब्यांशी चर्चा करावी लागेल. त्यांचा दृष्टिकोन व्यापारी आहे. त्यांना या सुधारणांमध्ये काही फायदा दिसू शकतो. मात्र, तुम्ही हे त्यांच्या गळी बळजबरीने उतरवण्याचा प्रयत्न कराल तर संघर्ष अटळ आहे. शेवटचा मुद्दा- पंजाब हा काही हिंदी, हिंदू पट्ट्याचा भाग नाही. तुमची नेहमीची हिंदू-मुस्लिम या धोरणाची मात्रा येथे लागू पडणार नाही. हिंदू-शीख असे ध्रुवीकरण तुम्ही करू शकता. हे कुणालाही नको असेल. हवे असेल तर आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तान्यांची फूस असल्याची अफवा पसरवा आणि अप्रिय परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

पंजाब हा एकजिनसी प्रदेश नाही
एक सन्मानजनक सहकारी राहण्याऐवजी सध्याच्या भाजपने पंजाब आणि शिखांचे संरक्षक म्हणून प्रस्तुत करणे सुरू केले. यात अनुमानाच्या अनेक चूका आहेत. एक, पंजाब हा एकजिनसी प्रदेश नाही. शिखांचेही तसेच आहे. त्यांच्यातही पोटभेद आहेत. भाजपमधील जे पंजाबी प्रमुख चेहरे आपल्याला दिसतात ते जाट नाहीत. या समुदायाचे शेतीवर वर्चस्व आहे आणि त्यांना कोणतेही खंदक वा पोलिसी बळ रोखू शकत नाही. तिसरे, शीख हे हिंदू नाहीत. शेतकऱ्यांच्या आंदोलनात जाट अग्रस्थानी आहेत. सरदार अजित सिंग यांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभी सुरू केलेल्या ‘पगडी सम्हाल जट्टा‘ या चळवळीपासून हे दिसून येते. या चळवळीच्या घोषणेने त्यांचे पुतणे शहीद भगत सिंग यांच्या काळात क्रांतीगानाचे स्थान मिळवले होते.

(अनुवाद - किशोर जामकर)

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com