
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागून आज आठवडा झाला. निकाल मेमध्येच लावून शिक्षण मंडळाने कार्यतत्परता दाखवली. एरवी मेअखेरीस किंवा जूनमध्ये जाहीर होणारा निकाल मेच्या मध्यावरच लावला. राज्यातील १५ लाख ४६ हजार ५७९ मुला-मुलींच्यादृष्टीने आणि त्यांच्या पालकांच्या दृष्टीने निकाल महत्त्वाचा आहे. आता इयत्ता अकरावीच्या प्रवेशफेऱ्या सुरू झाल्या आहेत. पहिल्या फेरीतील प्रवेश सहा ते बारा जूनअखेर निश्चित होतील. त्यानंतर पुढील फेऱ्या होतील. दहावीचा निकाल ते प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात पाऊल, यादरम्यानचा कालावधी मोठा असणार आहे. उत्तीर्ण झालेल्या १४ लाख ५५ हजार ४३३ मुला-मुलींना मेमधील दोन आठवडे, अख्खा जून आणि कदाचित जुलैतही महाविद्यालये सुरू होण्याची वाट पाहावी लागणार आहे. बहुधा ऑगस्ट उजाडेल. याचाच अर्थ जवळजवळ चार शैक्षणिक महिने साडेचौदा लाख विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, कलात्मक, सर्जनशील क्षमतांच्या विकासासाठी कोणतीही योजना, दिशा न ठरवता त्यांना सक्तीची विश्रांती द्यावी लागणार आहे.