
भारतीय जनता पक्षात पदावर आणि सत्तेत असलेल्यांनी वयाची पंचाहत्तरी पार केल्यानंतर निवृत्त व्हावे, हा अलिखित संकेत २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा तयार झाला. लालकृष्ण अडवानी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांची त्यावेळी ‘मार्गदर्शक मंडळ’ नामक वानप्रस्थाश्रमात रवानगी झाली. कदाचित पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर पोहोचून तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ, अशी कल्पनाही त्यावेळी मोदींच्या मनाला शिवली नसेल. पण तसे प्रत्यक्षात घडले आहे. त्यामुळेच मोदी यांच्या येत्या १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ७५ व्या वाढदिवसाची उलटगणती गेल्या वर्षीपासूनच काहींनी सुरू केली आहे. तर काहींना आता त्याची तीव्रतेने आठवण होऊ लागली आहे.