
तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्रांतीमध्ये प्रस्थापित रोजगार संपुष्टात येतात आणि नव्या रोजगारांना चालना मिळते. जेव्हा असा स्थित्यंतराचा काळ येतो, तेव्हा नव्या बदलांना सामोरे जाण्याची तयारी कष्टपूर्वक आणि जाणतेपणाने करावी लागते. सांप्रतकाळ नेमका तसा आहे. गेल्या काही वर्षांपासून चोरपावलांनी; पण वेगाने धडकणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वावटळीने अनेक नोकऱ्या असुरक्षित बनल्या आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲमेझॉन, क्राऊडस्ट्राईक यासारख्या दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांसह जगातील १३० कंपन्यांतील ६१ हजारांहून अधिक नोकऱ्या गेल्या. इतिहासातील आजवरच्या सर्वांत क्रांंतिकारी तंत्रज्ञान ठरू पाहणाऱ्या कृत्रिम प्रज्ञेच्या (आर्टिफिशियल इंटलिजन्स-एआय) वादळात रोजगारांची पडझड अपेक्षित होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, ‘एआय’मुळे जगभरातील ४० टक्के नोकऱ्या संकटात आहेत. मॅकिन्झीच्या अंदाजानुसार, २०३० पर्यंत ८० कोटी नोकऱ्यांवर टांगती तलवार असेल.