esakal | रुग्णालयाची ‘मात्रा’ विकासासाठी गुणकारी
sakal

बोलून बातमी शोधा

pune

रुग्णालयाची ‘मात्रा’ विकासासाठी गुणकारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंगी (मेघे) हे वर्धा शहरालगत असलेले गाव. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर वर्धा शहरापासून केवळ सात किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात आचार्य विनोबा भावे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आणि गावाचे पूर्ण चित्रच पालटले. कधी देवळी मार्गावरचे वर्धेलगतचे छोटेसे गाव अशी ओळख असलेले सावंगी आज मध्य भारतात आरोग्यसेवा क्षेत्रातील ओळखीची खूण बनले आहे.

या गावात १९८९ मध्ये राधिकाबाई मेघे ट्रस्टने रुग्णालय सुरू केले. या रुग्णालयाची प्रारंभीच्या काळात विशेष ओळखही नव्हती. पण ट्रस्टने येथे आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. ट्रस्टने हळूहळू वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार केला. वैद्यकीय महाविद्यालयासोबत दंतवैद्यक महाविद्यालयसुद्धा सुरू केले. आता तर अभिमत वैद्यकीय विद्यापीठाचाही दर्जा मिळाला आहे. त्यामुळे हे रुग्णालय आणि येथील वैद्यकीय महाविद्यालय गत २० वर्षांपासून देशाच्या नकाशावर आले. रुग्णालयाचा विस्तार झाला तसा गावाचा कायापालट झाला. देवळीकडे जाताना उजव्या हातावर असलेले हे गाव आता रस्त्याच्या डाव्या बाजूने चांगलेच विकसित झाले आहे. गावाची लोकसंख्या २० हजारांवर गेली आहे. येथे जुने आणि नवे गाव अशी ओळख निर्माण होऊ लागली आहे. यामुळे सावंगी लगत असलेले पालोती, सालोड (हिरापूर) या गावांचेही रूप पालटले. याच सालोडलगत (हिरापूर) असलेल्या हनुमान मंदिराला महत्त्व आले आहे. अनेक व्यवसायदेखील सुरू झाले आहेत. विविध प्रकारची हॉटेल सुरू झाल्याने या भागातील नागरिकांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.

गाव आणि परिसरात असे व्यवसाय सुरू होताच या भागात बघता बघता जमिनी घेणाऱ्यांची संख्या वाढली. वाढत्या मागणीमुळे जमिनीत पैश्‍याची गुंतवणूक करण्यात येत आहे. यातूनच येथे अनेक मोठे व्यवसाय सुरू झाले आहेत. विविध प्रकारच्या गाड्यांची शोरुमही या मार्गावर आली आहेत. व्यवसाय वाढताच ग्रामपंचायतीने कर वाढविले. वर्ध्यात सध्या सर्वाधिक कर आकारणारी ग्रामपंचायत म्हणून या गावाची ओळख झाली आहे.

महाविद्यालयांमध्ये बाहेरील प्रांतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे गावात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. रुग्णालय विस्तारताच येथे सुरू झालेले हॉटेल आणि इतर व्यवसाय यातून अनेकांना रोजगार मिळाला. घरगुती मेस, पानठेले यासारखे व्यवसाय वाढत आहेत. या साऱ्या व्यवसायांमुळे गावातील अनेकांना रोजगार मिळाला आहे. आता दोन मोठ्या शाळा, अभियांत्रिकी महाविद्यालयसुद्धा येथे सुरू झाले आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढतच आहे. पूर्वी लहानसहान वस्तूंच्या खरेदीसाठी सावंगी व आसपासच्या गावातील गावकऱ्यांना वर्धा येथेच जावे लागायचे. आता तसे राहिलेले नाही. सर्व प्रकारच्या सेवा विकसित सावंगीतच मिळत आहेत. छोट्या गावात सुरू झालेल्या मोठ्या रुग्णालयाने गावाला विकासाची मात्राच दिली आहे. आरोग्य सेवेसोबतच ‘मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या नावाने वैद्यकीय शिक्षण संस्थेने संकुलाचे रुप धारण केले आहे.

loading image
go to top