

Despite its 'Ego', Congress Finally Accepts Tejaswi Yadav as the Face of the Bihar Mahagathbandhan!
Sakal
छटपूजेचा मुहूर्त उगवण्यापूर्वी सरतेशेवटी बिहारमधील महागठबंधन किंवा इंंडिया आघाडीच्या लाजेखातर नाईलाजाने का होईना, काँग्रेसला तेजस्वी यादव नावाच्या ‘उगवत्या’ सूर्याला नमस्कार करणे भाग पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासारख्या दिग्गजांना तेजस्वी यादव यांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सळो की पळो करुन सोडले होते. तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाला कमी लेखण्याची चूक राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ं केलेली नाही. पण सुंभ जळून तीन दशके लोटली तरीही पीळ कायम असलेल्या काँग्रेसला बिहारच्या राजकारणातील लालूप्रसाद यादव-तेजस्वी यादव यांच्या वर्चस्वाची पुरत्या गांभीर्याने दखल घ्यावीशी वाटलेली नव्हती. आता परीक्षा अगदी समोर येऊन ठेपल्यानंतर ती घ्यावी लागली आहे. कुठल्याही राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या मित्रपक्षाचे नेतृत्व मान्य करायचे नाही आणि शेवटचा अर्ज भरेपर्यंत जागावाटपावरुन तुटेपर्यंत ताणून मित्रपक्षांचा छळ करायचा, या आजारी मानसिकतेतून काँग्रेसच्या स्थानिक आणि राष्ट्रीय नेतृत्वाला बाहेर पडणे शक्य होत नाही.