esakal | अग्रलेख : बाप्पा, होऊद्या श्रीगणेशा...
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : बाप्पा, होऊद्या श्रीगणेशा...

शाळा, महाविद्यालये प्रदीर्घ काळ बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. ते आकड्यांत मांडता येत नसले तरी प्रकर्षाने जाणवत आहे. शिक्षणसंस्था सुरू करण्याच्या अनेकदा घोषणा होऊनही त्याला मुहूर्त लागत नाही. तो लवकरच लागावा, ही अपेक्षा.

अग्रलेख : बाप्पा, होऊद्या श्रीगणेशा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्रीगणेशाचे आज घरोघरी आगमन होत आहे. कोरोनाच्या महासाथीला तिलांजली, अर्थकारणाचा गाडा रुळावर येणे, रोजगाराचा आलेख उंचावणे अशा अनेक प्रश्नांसाठी गणरायाला साकडे घातले जात आहे. चौसष्ठ कला आणि चौदा विद्या निपुण श्रीगणेशाला महाराष्ट्रातीलच नव्हे तर तमाम देशवासीय बाळगोपाळांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सगळेच आपापल्या शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये उघडू दे, एकदाची शाळेची घंटा वाजूदे... अशी आळवणीही करताहेत. कोरोनाच्या ठाणबंदीने सुमारे १८ महिने किंवा पाचशे दिवसांवर शाळा कुलूपबंद आहेत. शाळेचे तोंड न पाहता विद्यार्थी दोन इयत्ता पुढे गेले, तरी सरकार शाळा खुल्या करायला धजेना. शिक्षणमंत्री वरचेवर मुहूर्ताची भाषा करत असल्या तरी तो न साधल्याने विद्यार्थ्यांची घरकोंडी कायम आहे. कधी शिक्षक संघटना, तर कधी पालक संघटना, तर कधी टास्क फोर्स शाळा उघडण्याच्या विरोधाचा सूर लावत आहेत. किमान अर्धा डझनावर मुहूर्त हुकले. त्यामुळेच गणरायाला निपुणता राहू दे किमान शिक्षण तरी सुरळीत होऊ दे, अशी प्रार्थना!

कोरोनाच्या महासाथीने झालेली जीवितहानी, वित्तीय नुकसान, गमावलेला रोजगार, व्यापार, उद्योगातील अधोगती हे सगळे आकड्यांच्या मोजपट्टीत सामावत आहे, पण विद्यार्थ्यांचे बौद्धिक, भावनिक, सामाजिक, वैचारिक आणि कौशल्याचे नुकसान किती, ते किती पिछाडीवर गेले हे मोजायला पट्टीच नाही. त्यामुळे त्याची स्थिती ठोसपणे परिपूर्ण आकडेवारीद्वारे मांडता येत नाही, हीच अडचण आहे. विशेषतः शाळकरी; त्यातही पहिली ते सातवी, आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांबाबतची स्थिती भयावह आहे. काही सर्वेक्षणातून बोधप्रद बाबी समोर येताहेत. दोन-चार दिवसांपूर्वीच ऑ|गस्टमध्येच केलेला ‘स्कूल चिल्ड्रन्स ऑनलाईन, ऑफलाईन लर्निंग सर्व्हे’ (स्कूल) प्रसिद्ध झाला. त्यातील आकडेवारी धोरणकर्ते, सरकार, पालक आणि शिक्षण संस्थाचालकांचे डोळे उघडणारी, भयाण वास्तव मांडणारी आहे.

ऑनलाईन शिक्षण अनंत कारणांमुळे पारंपरिक शिक्षणाला पर्याय देण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. कनेक्टिव्हिटी, इंटरनेट व स्मार्टफोनची अनुपलब्धता, संवादात्मक शिक्षणाचा अभाव, शंकांचे निरसन, विषयातील संकल्पना समजणे आणि त्यांचे आकलन न होणे, अशा अनेक बाबी समोर आल्या आहेत. अनेक अडचणींमुळे केवळ २४ टक्के विद्यार्थीच ऑनलाईन अभ्यास करू शकले आहेत. यामुळे निम्म्याहून अधिक मुले वाचन, लेखन या कौशल्यात दोन-तीन इयत्ता मागे गेली आहेत. गणित आणि विज्ञानासारख्या विषयातील प्रगतीबाबत न बोललेले बरे. आकडेमोड, वैज्ञानिक संकल्पना फार कमी मुलांना समजल्या. बहुतांश मुलांनी दीड वर्षांत शिक्षकांना पाहिलेलेच नाही. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक अशा १५ राज्यांतले हे सर्वेक्षण आहे. यातले सगळ्यांत नोंद घेण्याजोगे निरीक्षण म्हणजे ९० टक्क्यांवर पालकांची शाळा सुरू करण्याची सूचना.

शैक्षणिक आघाडीवरील ही स्थिती असतानाच मुलांचे सामाजिकरण होणे, सहजीवनात ती रूळणे, एकमेकांशी दंगामस्ती, डब्बा किंवा खाऊ वाटून घेणे, शिस्तीची सवय सगळेच मोडल्याने मुलांचे भावविश्व कोमजले आहे. वाढलेल्या स्क्रीनटाईमचे तसेच मैदानी खेळ थांबल्याचे दुष्परिणाम वजनाचा वाढलेला काटा आणि मुलांच्या भावभावनांचा कोंडमारा यातून दिसत आहेत. ते भयावह रूप धारण करत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबाबत यापेक्षा स्थिती वेगळी नाही. महाविद्यालयात न जाता, ऑॅनलाईन शिक्षणाअंती पदवीची भेंडोळी हातात मिळेल; पण रोजगाराच्या बाजारात गुणवत्ता सिद्ध करायला ही पिढी नापास होण्याचीच भीती अधिक आहे. विशेषतः जिथे प्रात्यक्षिके, प्रत्यक्ष कार्यानुभवाची गरज असते, अशा व्यावसायिक अभ्यासाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान अपरिमीत आहे. विषय स्वयंअध्ययनातून समजणे आणि संवादात्मक, चर्चात्मक अभ्यासातून गळी उतरणे यात गुणात्मक फरक आहे.

या काळातील विद्यार्थी गळती ही कोरोनापेक्षा अधिक वेगाने पिढी बरबाद करत आहे. यावेळी अडीच लाख विद्यार्थ्यांनी नववी उत्तीर्ण होऊनही दहावीची परीक्षा दिलेली नाही, त्यात मुलींचा भरणा अधिक आहे. भारतात सर्वाधिक लोकसंख्या उगवत्या पिढीची आहे, तिच्या भरवश्यावर फाईव्ह ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आपण पाहतो. तथापि, तिच्या सर्वांगीण आणि शैक्षणिक विकासाला शैक्षणिक संस्था दीर्घ काळ बंद ठेऊन खो घालत आहोत. ती कौशल्यनिपुण, उच्च शिक्षणात हव्या त्या गुणवत्ता आणि नैपुण्य संपादू शकली नाही तर तिचे भवितव्य अंधःकारमय ठेवल्याचा ठपका कोरोनापेक्षा धोरणकर्त्यांच्या माथीच अधिक फुटणार आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढताहेत. केंद्र सरकारने उत्सव, सणाबाबत सावधगिरीच्या सूचनाही दिल्या आहेत. परिस्थिती कोणते वळण घेईल हेही सांगता येत नाही, इथपर्यंत सगळेच मान्य. तथापि, सगळे व्यवहार, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, उद्योगधंदे सुरळीत सुरू आहेतच ना! योग्य काळजी, दक्षता घेत, कोरोना प्रतिबंधाची नियमावली पाळत आहोतच ना! मग तशाच स्वरूपाच्या दक्षता घेत, मार्गदर्शक सूचना काटेकोरपणे पाळत शाळा, महाविद्यालयेही सुरू केली पाहिजेत. त्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. शाळा, महाविद्यालये पूर्णवेळ बंद ठेवण्यापेक्षा अर्धवेळ, एक दिवसाआड अशा वेगवेगळ्या पद्धतीने चालू करता येऊ शकतात. या पिढीकडे महासाथीला तोंड देण्याची क्षमता अधिक असल्याचे तज्ज्ञच सांगताहेत. त्यामुळे गणेशोत्सवाचे औचित्य साधत सरकारने शाळा सुरू करण्याबाबतच्या मुहूर्त जाहीर करून शाळांचा श्रीगणेशा करावा.

loading image
go to top