esakal | अग्रलेख : गति-शक्तीचा दसरा!
sakal

बोलून बातमी शोधा

dasara 2021

अग्रलेख : गति-शक्तीचा दसरा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विविध सार्वजनिक क्षेत्रांना नवरात्रीच्या काळात मिळालेली गती, ही अल्पकालीन ठरू नये म्हणून सर्वच घटकांनी सावध आणि सक्रिय राहिले पाहिजे. यंदाच्या विजयादशमीचा हाच बोध आहे.

यंदाचा दसरा हा एका नव्याच अर्थाने देशाला ‘सीमोल्लंघना’कडे घेऊन जाणारा ठरणार, अशीच शुभचिन्हे विजयादशमीच्या मुहुर्तावर समोर येत आहेत. गेला दसरा हा कोराना विषाणूने जगावर आणलेल्या मळभामुळे काळवंडलेला होता. त्या दसऱ्यालाही सोने वगैरे लुटले गेलेच; पण तेव्हा मनावर एक प्रकारची उदासी होती. हा विषाणू आणखी किती हाहाकार माजवणार आहे, या भीतीने दसऱ्याच्या मेजवान्याही वातावरणात गोडी आणू शकत नव्हत्या. या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा हा भारतवासीयांचे तोंड खऱ्या अर्थाने गोड करणारा ठरणार, यात आता शंका उरलेली नाही. गेल्या वर्षभरात येणारे अनेक अडथळे पार करून आपण लसीकरणाची मोहीम जोमाने राबवली आणि आता देशातील १०० कोटी लोकांनी किमान या लसीची एक मात्रा तरी घेतली आहे. ज्यास सामूहिक प्रतिकारशक्ती म्हणजेच ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणतात, ती देशभरात निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्याचीच परिणती आता अनेक क्षेत्रांतील ‘बंद दरवाजे’ खुले होत आहेत. लोकांच्या पायांत बेड्या घालून त्यांना जागच्या जागीच ठाणबंद करून ठेवणाऱ्या या विषाणूला आपण समर्थपणे तोंड दिल्याचीच ही प्रचीती आहे.

या काळात बंद पडलेल्या सांस्कृतिक विश्वाला खुली हवा मिळणार, हे जाहीर झाल्यानंतर आता शाळांच्या पाठोपाठ महाविद्यालयेही सुरू होणार असल्याची सुवार्ता आली आहे. अर्थात, त्यासाठी विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतले असल्याची अट असली तरी महाविद्यालयांनीच स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून लसीकरणाचे कॅम्प उघडावेत, असेही जाहीर झाले आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुलभ होण्यास गती मिळणार, यात शंकाच नसावी. तसेच दोन ते १८ वर्षांमधील बाल तसेच तरुण यांच्या लसीकरणासही या विषाणूसंदर्भातील केंद्र सरकारच्या तज्ज्ञ गटाने अनुमती दिली आहे. आता या वयोगटातील लसीकरण सुरू झाल्यास १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयेही सुरू होऊ शकतात आणि गेली दीड-दोन वर्षं ‘कॉलेज लाइफ’ला मुकलेला विद्यार्थीवर्ग ते जीवन आता पुन्हा अनुभवू शकेल.

एकीकडे सांस्कृतिक तसेच शैक्षणिक विश्वाचे बंद दरवाजे उघडण्याचा निर्णय झाला असतानाच, अर्थव्यवस्थेलाही गती देण्याचे प्रयत्न जोमाने सुरू झाले आहेत. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला शेअर बाजार निर्देशांकाने केवळ साठ हजारी मनसबदारीचा किताब आपल्या शिरपेचात रोवला असे नाही, तर `एकसष्टी’ही गाठली. शेअर बाजाराच्या इतिहासातील हा उच्चांक आहे आणि त्याचे खुल्या मनाने स्वागतच करायला हवे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केलेल्या ‘गति-शक्ती’ मोहिमेमुळे पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एक नवे पर्व सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. देशाच्या अर्थकारणाला खऱ्या अर्थाने गती द्यायची असेल, तर त्यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे हे शक्तिशाली असावे लागते. अर्थात, रस्ते-वीज-पाणी या पायाभूत सुविधा म्हणजे विकास नव्हे तर विकासाच्या दिशेने वेगाने घेऊन जाणारे ते मार्ग असतात, हे लक्षात ठेवायला हवे.

पंतप्रधानांनी नवरात्रातील अष्टमीला १०० लाख कोटींची तरतूद असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रारंभ करताना, मालवाहतूक खर्चात कपात, माल हाताळण्याच्या क्षमतेतील वाढ, मालवाहतुकीच्या वेळात कपात ही या योजनेची वैशिष्ट्ये असल्याचे सांगितले. हे सारे खरोखरच प्रत्यक्षात आले तर विकासाचे अनेक प्रकल्प गती घेऊ शकतात. मात्र, त्यासाठी राज्याराज्यांतील बिगर-भाजप सरकारांनाही केंद्राच्या हातात हात घालून काम करावे लागणार आहे. अर्थात, पायाभूत सुविधांमध्ये गेल्या काही वर्षांत रस्ते-वीज-पाणी या मूलभूत बाबींबरोबरच फायबर नेटवर्कचा समावेश झाला आहे. पंतप्रधानांनी यावेळी रस्ते तसेच लोहमार्ग याबरोबरच ऑप्टिकल फायबर आदी क्षेत्रांत गेल्या सहा-सात वर्षांत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. मात्र, सध्याच्या कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मितीवर आलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रथम केंद्र तसेच राज्य सरकारांना हातात घालून प्राधान्याने काम करावे लागणार आहे.

कोरोनाच्या सावटात अनेक क्षेत्रांत मंदीचे आणि औदासिन्याचे मळभ दाटून आले असले, तरी याच काळात राजकीय पोपटपंचीला मात्र उधाण आलेले दिसत होते. आजच्या दसऱ्याच्या निमित्तानेही अनेक राजकीय आपटबार फुटतीलच आणि आतषबाजीचेही दर्शन घडेल. मात्र, आता बहुतेक क्षेत्रे खुली होत असताना, सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सर्वपक्षीय राजकारण्यांनी संयम पाळण्याची गरज आहे. राजकारणाला कोरोना विषाणूही पायबंद घालू शकला नाही, हे आपण याच काळात बघितले! अर्थात, त्यामुळेच ‘आम आदमी’च्या मनात ‘राजकारण गेलं चुलीत!’ अशी भावनाही निर्माण झालेली असू शकते. त्यामुळेच आता हे खुले झालेले दरवाजे पुन्हा बंद करावे लागणार नाहीत, याची दक्षता सर्वांनाच घ्यावी लागेल. अन्यथा, नवरात्रीच्या या दहा दिवसांच्या काळातील ‘शक्ती देवते’ने विविध सार्वजनिक क्षेत्रांना दिलेली गती आपल्याला पुन्हा मागे घेऊन जाऊ शकते, हे सर्वांनीच ध्यानात घ्यायला लागेल. यंदाच्या विजयादशमीचा हाच खरा बोध आहे!

loading image
go to top