esakal | ढिंग टांग : आईशप्पत...वाघाशी मैत्री!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : आई शप्पत...वाघाशी मैत्री!

sakal_logo
By
- ब्रिटिश नंदी

दादासाहेब शिकारखानेवाले यांना कोण ओळखत नाही? माणसांच्याच नव्हे, तर वन्यजीवांच्या विश्वातही त्यांची जबर्दस्त दहशत आहे. खांद्यावर बंदूक ठेवून दादासाहेब शिकारीला निघाले की जंगलात प्राण्यांची पळापळ होते, असे म्हणतात. कोल्हापुरच्या परिसरात कोणालाही विचारा. दादासाहेबांचे नुसते नाव जरी घेतले तरी भले भले लोक हातभर जीभ काढून एकदम कानाच्या पाळ्या पकडतात आणि मान तुकवतात. कोल्हापूर सोडा, अगदी पुण्यातही त्यांची (हल्ली) चांगलीच ख्याती आहे. अलीकडेच दादासाहेब कोल्हापूर सोडून पुण्यात सेटल झाले आहेत. ते एक ‘बरेच बरे’ शिकारी आहेत, असे पुण्यातील एकाने दुसऱ्या पुणेकराला सांगताना आम्ही स्वत: ऐकले आहे. ‘बरेच बरे’ हे विशेषण पुण्याचे आहे, हे लक्षात घ्यावे! पुण्यात ‘बरेच बरे’ म्हंजे मुंबईतले ‘आईशप्पत, लई भारी’, आणि दिल्लीच्या भाषेत ‘क्या कहने!’

दादासाहेब बोलू लागले, की ढग गडगडल्यासारखे वाटते. हसले की भूकंप झाल्याचा भास होतो. आपल्या यशस्वी शिकार मोहिमांचे किस्से दादासाहेब असे काही रंगवून सांगतात, की एकदा ते ऐकायला एकदा वाघांचा कळपच येऊन बसला होता, अशी एक दंतकथा आहे. त्यांच्या बंगल्यातील दिवाणखान्याच्या भिंतींवर तुम्हाला अनेक प्राण्यांच्या ‘ट्रॉफी’ज दिसतील, त्या प्रत्येक ट्रॉफीमागे दहा कथा प्रसिध्द आहेत. ‘बांदऱ्याचा नरभक्षक आणि इतर कथा’, ‘पुण्यातला गवा आणि गवगवा’, ‘वाघ आणि मी’ अशी त्यांची डझनावारी शिकारकथांची पुस्तके प्रसिद्धच आहेत.

दादासाहेबांच्या शिकारकौशल्याचा आम्हाला अतिशय आदर वाटतो. त्यांची ‘वाघ आणि मी’ या नव्या ग्रंथावर त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो, तेव्हा ते घरात शिरलेला उंदीर मारण्यासाठी आरडाओरडा करीत होते. अखेर त्यांच्या मार्गदर्शनाखाली नोकराने तो मस्तवाल उंदिर एका फटक्यात लोळवला, तेव्हा एका स्टूलरुपी मचाणावर सुरक्षित उभ्या असलेल्या दादासाहेबांनी तेथूनच ‘शाब्बास’ अशी दाद दिली. असो.

‘‘हा नरभक्षक काळवीट…मध्य प्रदेशात कान्हा किसलीच्या जंगलात मी एका गोळीत मारला!, ’’दादासाहेबांनी भिंतीवरील ट्रॉफीज दाखवत किस्से सांगायला सुरवात केली. नरभक्षक काळवीट पहिल्यांदाच ऐकत होतो.

‘‘हा नरभक्षक रानगवा…’’ ते म्हणाले.

‘‘हा रणथंबोरच्या जंगलातला असणार!’’ आम्ही अंदाजपंचे म्हणालो.

‘‘नाही, पुण्यात बावधनला मारला!’’ त्यांनी उत्तर दिले. पुण्यात हल्ली कोथरुडपर्यंत गवे येतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

‘‘…आणि हा गेंडा बघितलात?’’ दादासाहेबांनी अचानक विचारल्याने आम्ही गोंधळून इकडे तिकडे पाहिले.

‘‘क…कुठाय गेंडा?’’ आम्ही.

‘‘मुरबाडच्या जंगलात मारला!’’ दादासाहेब शांतपणाने म्हणाले. मुरबाडला जंगल कुठून आले? समोर भिंतीवर डुकराच्या तोंडासारखे काहीतरी दिसत होते. पण दादासाहेब म्हणताहेत तर गेंडाच असणार, असे म्हणून आम्ही पुढे सरकलो.

‘‘वाघाला मी सहसा मारत नाही! त्याच्याशी दोस्ती करतो!’’ त्यांनी शेकहँडसाठी करतात, तसा हात पुढे केला. आम्हीही अनवधानाने पुढे केला. पण त्यांनी हस्तांदोलन केले नाही.

‘‘वाघाशी आणि दोस्ती? बाप रे!’’ अतीव आदराने आम्ही.

‘‘…तीही जंगलातल्या वाघाशी! पिंजऱ्यातल्या नव्हे! हॉहॉहॉ!!’’ दादासाहेब गडगडले.

‘‘तुम्ही भयंकर शूर आहात बुवा!,’’ आम्ही श्रद्धेने म्हणालो.

‘‘हे तर काहीच नाही, बांदऱ्याच्या वाघाचा एकदा आम्ही गालगुच्चा घेऊन, त्याच्या मिशा कचाकच ओढून डोक्यावर टप्पल मारली होती! हाहाहा!!,’’ ते दर्पोक्तीने म्हणाले.

…तेवढ्यात त्यांना दुसरा उंदिर दिसल्याने चटकन स्टुलरुपी मचाणावर चढून त्यांनी

पुन्हा नोकराला सावध केले. पुन्हा असो.

loading image