स्त्रीशिक्षण काळाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्त्रीशिक्षण काळाची गरज

‘सावित्रीमाईंच्या अथक प्रयत्नांनंतरही आजसुद्धा समाजातल्या काही घटकांच्या सडक्या मानसिकतेमुळे मुलींना-पंख - असूनही-भरारी घेता येत नाही,

स्त्रीशिक्षण काळाची गरज

- दिव्या संजय कांबळे

‘‘माझ्या दृष्टिकोनातून शिक्षण हे एक शस्त्र आहे! या समाजातील अजूनही मागास असलेली विचारसरणी, अंधश्रद्धा, जातिव्यवस्था, अनिष्ठ रूढी-परंपरा यांविरुद्ध या ‘शस्त्रा’द्वारे आपण लढू शकतो. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही.

आजची स्त्री शिक्षणाच्या जोरावर बाहेर पडू शकते, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते, शिक्षणामुळे ती आज प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे,’’ हे मत आहे शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी पुण्यात राहणाऱ्या (मूळ-उस्मानाबाद) तेवीसवर्षीय दिव्या संजय कांबळे हिचे.

दिव्या म्हणते : ‘‘सावित्रीमाईंच्या अथक प्रयत्नांनंतरही आजसुद्धा समाजातल्या काही घटकांच्या सडक्या मानसिकतेमुळे मुलींना-पंख - असूनही-भरारी घेता येत नाही, क्षमता असूनही ती दाखवण्याची संधी मिळत नाही.

समाजातील विकृत घटकांमुळे मुलींवर बंधने लादली जातात. ग्रामीण भागातल्या अशा बऱ्याच मुली आहेत, ज्या शिक्षणासाठी आजही घरच्यांशी माझ्यासारख्याच लढत आहेत, तर काही जणी घरच्यांच्या मागास विचारसरणीला बळी पडून आपल्या स्वप्नांवर पाणी सोडत आहेत.

शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र आहे. त्यात मीही स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, नोकरीसाठी खूप धडपड करावी लागते.’’

‘‘सावित्रीबाई फुले यांचे काम आणि माहिती मी शालेय पुस्तकांमधून, तसेच शिक्षकांकडून ऐकले होते. स्त्रीशिक्षण ही काळाची गरज आहे, शिक्षणाअभावी मी आज कुठे असते याचा विचार करून अंगावर अक्षरशः शहारे येतात.

आजची महिला स्वतंत्र झाली, सुरक्षित झाली असे जरी वाटत असले तरी तिला आजही बुरसटलेल्या विचारांना तोंड द्यावे लागत आहे, ’’ दिव्याने आजच्या वास्तवाकडेही लक्ष वेधले. शिक्षणाअभावी असलेली महिला आणि सुशिक्षित महिला या दोघींमध्ये खूप फरक जाणवतो मला.

उदाहरणच पाहायला गेलं तर, माझीच आई काही वेळा अंधश्रद्धेला बळी पडताना दिसते, तसेच समाजात लोक काय म्हणतील, आपल्याला ज्या समाजात राहायचे आहे त्यांच्यानुसार चालावं लागेल, त्यांचा विचार करावा लागेल यांसारख्या बुरसटलेल्या विचारांना बळी पडताना तिला मी पाहिले आहे.

आजही ग्रामीण भागातील ज्या बायका अशिक्षित आहेत त्या त्यांच्या मुलींचं लग्न कमी वयात करून टाकतात. मुलींचा विचार न करता समाजाचा विचार त्या करतात. माझ्याच चुलतबहिणींच्या बाबतीतली गोष्ट.

त्यांचे फार कमी वयात लग्न झाले. कमी शिक्षणाअभावी त्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते, मग त्या समस्या मानसिक असतील, शारीरिक असतील आणि आर्थिकसुद्धा. मुलगी हे परक्याचे धन मानले जाते आणि लग्न लावून देऊन हे ‘डोक्यावरचे ओझे’ हलके केले जाते. हाच तो फरक असतो सुशिक्षित महिलांमध्ये आणि शिक्षणाअभावी राहिलेल्या महिलांमध्ये.

आपल्या मुलीचे भले कशात आहे, हे शिक्षणापासून वंचित राहिलेली महिला आपल्या पतीला समजावून सांगू शकत नाही. पितृप्रधान संस्कृती आजही पाहायला मिळते, मी अशी बरीच उदाहरणे पाहिलेली आहेत.

सावित्रीबाईंकडे बघताना...

सावित्रीबाई फुले या सात अक्षरांत आहे शिक्षणाची महती...स्त्रीची प्रगती... शिकून काय करायचं, इथंपासून शिक्षणाशिवाय आयुष्य निरर्थक इतका विशाल प्रवास स्त्रियांनी साकारला, त्यामागे सावित्रीबाईंचे अतुल्य कार्य आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रिया सावित्रीबाईंच्या कार्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, याचा धांडोळा सावित्रीबाईंच्या आजच्या जयंतीनिमित्त...

- छाया काविरे