esakal | ऑस्ट्रेलियातली आग, जगासाठी धोक्याची घंटा!
sakal

बोलून बातमी शोधा

ऑस्ट्रेलियातली आग, जगासाठी धोक्याची घंटा!

ऑस्ट्रेलियातील पर्यावरणाचा आणि अनुषंगाने राहणीमानाचा एक अविभाज्य भाग म्हणजे वणवे. यंदाचे वणवे मात्र भीषण स्वरूपाचे होते. नैसर्गिक व मानवनिर्मित परिसंस्थांमधल्या पुसट होत जाणाऱ्या सीमा व इतर कारणांमुळे उपायांच्या अंमलबजावणीवरही परिणाम होत आहे.

ऑस्ट्रेलियातली आग, जगासाठी धोक्याची घंटा!

sakal_logo
By
डॉ. स्वप्ना प्रभू

तीन वर्षांपूर्वी मेलबर्नजवळच्या डॅंडेनाँग हिल्स भागात स्थायिक झाले आणि शहरापासून दूर, नीलगिरी वृक्षांच्या वनांनी घेरलेल्या या डोंगराळ भागापासून ऑस्ट्रेलियाची तोंडओळख सुरू झाली. इथल्या आकाश, झाडं, पाण्याच्या आरसपानी रंगांनी भुरळ घातली. समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश, हवामान, प्रदूषणाचा अभाव वगैरे कारणांनी इथले रंग वेगळे दिसतात, हे तेव्हा प्रकर्षाने जाणवलं होतं. हळूहळू इथले ऋतुचक्र आणि त्याबरोबर होणारे आजूबाजूचे तीव्र बदल लक्षात येऊ लागले. वणवे इथल्या पर्यावरणाचा आणि अनुषंगाने रहाणीमानाचा अविभाज्य भाग आहेत हेही लवकरच समजलं. दरवर्षी जानेवारी - मार्चच्या दरम्यान वणव्यांच्या धोक्‍याच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेवणे अंगवळणीही पडलं. पण या वेळचे वणवे समस्त जगाचं लक्ष वेधून घेणारे ठरले. साधारण ऑगस्ट २०१९ च्या दरम्यान क्वीन्सलॅंड आणि व्हिक्‍टोरिया राज्यात हजारो लहान मोठे वणवे सुरू झाले, आणि तीन चार महिन्यांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा जवळपास पूर्ण पूर्व किनारा आणि इतर अनेक भाग बेचिराख झाले. जगभर या वणव्यांवर आणि त्या निमित्ताने हवामान बदल, पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्याचे राजकीय, आर्थिक, सामाजिक पडसाद यावर चर्चा सुरू झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आतापर्यंत २०१९-२० ‘बुशफायर’ असे संबोधल्या जाणाऱ्या या आगीने अंदाजे एक कोटी ८६ लाख हेक्‍टर जमीन भस्मसात केली आहे, यात ५९००पेक्षा जास्त इमारती नष्ट झाल्या. कमीतकमी २९ लोक आणि अंदाजे एक अब्ज प्राणी मरण पावले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात या वणव्याशी तुलना करणारे अनेक मोठे वणवे झाले आहेत; पण या वेळच्या वणव्यांचा विस्तार, तीव्रता आणि झालेले आर्थिक नुकसान सर्वाधिक असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या पन्नास वर्षांत होऊन गेलेल्या मोठ्या वणव्यांमध्ये ॲश वेड्‌नेसडे (१९८३, व्हिक्‍टोरिया), ब्लॅक क्रिसमस (२००१, न्यू साउथ वेल्स), कॅनबेरा बुशफायर (२००३), व्हिक्‍टोरिया बुशफायर (२००९), टास्मानिया बुशफायर (२०१३) आणि अनेक इतर वणव्यांचा समावेश आहे. ॲश वेड्‌नेसडेला ७५ तर २००९च्या व्हिक्‍टोरिया बुशफायरमध्ये १७३ लोक मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे. या आधीच्या सर्व घटनांमध्ये लाखो हेक्‍टर जमिनीवरील मालमत्ता बेचिराख झाली. तरीही यावेळच्या वणव्यांचा वेगळेपणा आणि त्यामागच्या काळजीचे कारण म्हणजे हवामान बदलाचा या वणव्यांशी असलेला थेट संबंध. संबंधित उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर या बदलांमुळे होणारे परिणाम. ऑस्ट्रेलियन हवामान मुळातच उष्ण आणि कोरडे असल्यामुळे दुष्काळप्रवण आहे. वर्षातल्या कुठल्याही वेळी कुठल्या न कुठल्या भागात वणव्यांची शक्‍यता असतेच. खंडाच्या वेगवेगळ्या भागात एकाच वेळी असणाऱ्या वेगवेगळ्या हवामानामुळे प्रत्येक भागात वणव्यांच्या संभावित वेळा वेगळ्या आहेत. उत्तरेकडे नॉर्दर्न टेरीटरी आणि वेस्ट ऑस्ट्रेलिया या राज्यात साधारण हिवाळा आणि स्प्रिंग ऋतुंमध्ये वणव्यांची भीती असते, ईशान्येकडे क्वीन्सलॅंड आणि आग्नेयात न्यू साउथ वेल्स या राज्यात स्प्रिंग आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला, तर खंडाच्या दक्षिण भागांमध्ये उन्हाळा आणि ऑटम ऋतूत वणव्याचे इशारे दिले जातात.

इथल्या नैसर्गिक परिसंस्था प्रामुख्याने वणव्यांमुळे विकसित झाल्या आहेत, बऱ्याच स्थानिक वनस्पती अत्यंत दहनशील आहेत, तर असंख्य प्रजाती पुनरुत्पादनासाठी वणव्यावर अवलंबून असणाऱ्या आहेत. मूळ ऑस्ट्रेलियन रहिवाशांनी (आदिवासींनी) इथल्या निसर्गाचा सूर ओळखून परिसर व्यवस्थापनासाठी वणव्यांचा उपयोग फार पूर्वीपासून केला आहे. गवताळ भाग आणि आसपासचा खुल्या वनांचा भाग जाळल्यामुळे काहीशा विरळ, परंतु पोषक तत्त्वांनी समृद्ध झालेल्या भागात भरघोस गवत उगवणे, पर्यायाने इतरत्र बेचिराख झालेल्या भागातून या जागेत कांगारू वा तत्सम प्राण्यांचे कळप येण्यास, स्थायिक होण्यास भाग पाडणे, तिथे त्यांची संख्या वाढू देणे व कालांतराने त्यांची शिकार करणे ही कला स्थानिकांकडून वापरात असल्याची नोंद आहे. या नियोजित वणव्यांचा वापर करून अधिक ताकदीचे, अनियंत्रित नैसर्गिक वणवे, इच्छित सीमेवर थोपवून ठेवणे, त्यांचा वेग व तीव्रता कमी करणे याचे तंत्र या समाजाला साध्य झाले होते. कालांतराने युरोपीय वसाहतीच्या काळात हे नियोजित वणवे बंद झाले. गवताळ भागांच्या जागा जंगलांनी वेढल्या, जंगलांच्या वसाहतींनी, नैसर्गिक आणि मनुष्यनिर्मित भूरूपात महत्त्वाचे बदल झाले. हे पारंपरिक शहाणपण थोडंफार बदलून आजच्या वणव्यांविरुद्धच्या युद्धनीतीत वापरलं जात असलं तरी वाढती लोकसंख्या, शहरीकरण, नैसर्गिक व मानवनिर्मित परिसंस्थांमधल्या पुसट होत जाणाऱ्या सीमा, यामुळे बऱ्याच वेळा हे उपाय परिणामकारकपणे अमलात आणता येत नाहीत. ‘हझार्ड रिडक्‍शन बर्न्स’ (नियंत्रित अग्निरेषा तंत्र) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपाययोजनेत काळजीपूर्वक नियोजन केलेल्या वणव्यांचा वापर केला जातो. वणव्यांची शक्‍यता ठरविणाऱ्या मूलभूत घटकांमध्ये इंधन भार, ऑक्‍सिजन आणि ज्वलन स्त्रोत हे महत्त्वाचे घटक आहेत. तर पसरलेल्या वणव्यांची तीव्रता आणि वेग वातावरणीय तपमान, इंधन भार, इंधन आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि जमिनीचा उतार यावर अवलंबून असतात. ज्वलन स्त्रोत, किंवा वणव्याच्या महत्त्वाच्या कारणांमध्ये विजा, आणि मानवी बेजबाबदारपणा या दोन्हीचा समावेश होतो. ‘हझार्ड रिडक्‍शन बर्न्स’मध्ये या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. इंधन भार म्हणजे सुकलेला पाला पाचोळा, वृक्षांच्या साली, फांद्या वगैरे. इथल्या बऱ्याच वनस्पतींमध्ये नैसर्गिक तेलाचे प्रमाण जास्त असल्याने मुळातच हा ‘इंधन भार’ खूप जास्त असतो. ‘हझार्ड रिडक्‍शन’ उपाययोजनेत हा इंधन भार जाळून नष्ट किंवा कमी करून वणव्यांची शक्‍यता किंवा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या प्रक्रिया अमलात आणण्यासाठी विशिष्ट हवामान आणि त्यामुळे वर्षातील विशिष्ट वेळ फार महत्त्वाची आहे. खंडाच्या वेगवेगळ्या प्रदेशात ह्या वेळा वेगवेगळ्या असणे साहजिक होते, परंतु वाढतं तापमान, कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे वणव्यांचे हंगाम प्रदीर्घ होत आहेत. दोन वेगवेगळ्या हवामानाच्या प्रदेशांच्या ऋतुतला फरक कमी होऊ लागला आहे. या सर्व अडचणींमुळे नियोजित वणव्यांचे तंत्र वापरणे कठीण झाले आहे.

वणव्यांचे परिणाम दूरगामी आहेत यात शंका नाही. यातून तयार झालेल्या कार्बन डाय ऑक्‍साइडची मोजदाद आत्तापर्यंत ३३ कोटी टनांवर गेली आहे. इतका कार्बन डाय ऑक्‍साइड वायू निरोगी जंगलांच्या अनुपस्थितीत नष्ट व्हायला बरीच वर्षे लागतील. याचे परिणाम म्हणून स्थानिक हवामानात झालेले बदल, उष्णता, कमी दाबाचे पट्टे, त्यामुळे निर्माण होणारे ढग, वादळे, विजा आणि या सर्व परिस्थितीमुळे इतरत्र आग पसरत जाण्यासाठी अनुकूलता असे क्‍लिष्ट वर्तुळ यातून तयार होतं. विस्थापित जनता, विस्कळित अर्थव्यवस्था, पर्यावरणाचा, स्थानिक जैवविविधतेचा ऱ्हास हे तर स्वतंत्र विषय आहेत. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व परिणाम फार गडद, ठळक होतात. इतर वेळेस आगीतून पुन्हा तरारून उभे राहण्याची सवय असलेल्या या खंडाच्या परिसंस्थांना या बदलत्या हवामानात ऋतूंची हवी ती साथ मिळेल की नाही, हा चिंतेचा विषय आहे. हा प्रश्न पूर्वीसारखा स्थानिक किंवा एखाद्या राज्यापुरताही राहिला नाहीय, हे या वणव्यांतून स्पष्ट झालेच आहे. ऑस्ट्रेलियाचे उदाहरण जगासाठी धोक्‍याची घंटा आहे. राजकीय इच्छाशक्तीशिवाय या संकटावर मात करणे शक्य नाही.
(लेखिका ऑस्ट्रेलियास्थित अभ्यासक आहेत.)

loading image