esakal | उरले सुरले ‘फैज’!
sakal

बोलून बातमी शोधा

faiz ahmed faiz

आभाळात कडाडून धरतीकडे झेपावणारी वीज मुठीत पकडू पाहणाऱ्याला कोळसा होण्याचे भागधेय चुकवता येत नाही. गेल्या शतकातले ज्येष्ठ विद्रोही शायर फैज अहमद फैज यांची कविता अशीच बिजलीसारखी होती. बगावतखोर म्हणून जितेजागतेपणी अनेक आघातांना सामोरा गेलेला हा कवी स्वत:च्याच कवितेने अनेकदा भाजलाही गेला आणि गाजलाही.

उरले सुरले ‘फैज’!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आभाळात कडाडून धरतीकडे झेपावणारी वीज मुठीत पकडू पाहणाऱ्याला कोळसा होण्याचे भागधेय चुकवता येत नाही. गेल्या शतकातले ज्येष्ठ विद्रोही शायर फैज अहमद फैज यांची कविता अशीच बिजलीसारखी होती. बगावतखोर म्हणून जितेजागतेपणी अनेक आघातांना सामोरा गेलेला हा कवी स्वत:च्याच कवितेने अनेकदा भाजलाही गेला आणि गाजलाही. ‘मुझसे पहलीसी मुहब्बत मेरे महबूब न मांग’ असे प्रियेला सांगून समाजाचे देणे फेडायला निघालेला हा अलौकिक प्रतिभेचा शायर निव्वळ शायर नव्हता. तो क्रांतिकारकाचे सळसळते रक्‍त आपल्या धमन्या-नसांमधून खेळवणारा अवलिया होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साम्यवादी विचारसरणीने भारलेली एक मोठी पिढी गेल्या शतकाच्या मध्यकाळात होती, त्यातले एक फैजसाहेब. फैजसाहेब निवर्तले, त्याला आता पस्तीस वर्षे होऊन गेली. पण, या कवीच्या मागचे नष्टचर्य काही संपायला तयार नाही. उत्तम प्राध्यापक, संपादक, दुसऱ्या महायुद्धात कर्नलपदापर्यंत बढती मिळवणारे लष्करी अधिकारी आणि त्याच वेळेस साम्यवादी, राज्यद्रोही म्हणून दहाएक वर्षांचा तुरुंगवास भोगणारा क्रांतिकारक, ‘इंग्रज मड्‌डमेशी निकाह लावणारा’ म्हणून धर्ममार्तंडांनी धिक्‍कारलेला समाजसुधारक, अशा कितीतरी गडद-गहिऱ्या रंगांनी फैजसाहेबांचे जीवन भरलेले राहिले. पाकिस्तानात ज्याची इस्लामविरोधी म्हणून संभावना झाली, त्याच शायराला मृत्यूनंतर साडेतीन दशकांनी भारतात हिंदूविरोधी ठरवले जात आहे, हा दैवाचा खेळच म्हणायचा. आयआयटी-कानपूरच्या काही विद्यार्थ्यांनी गेल्या महिन्यात (१७ डिसेंबर) ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ आणि ‘नागरिक नोंदणी’विरोधात शांततेत मोर्चा काढला. त्या मोर्चात त्यांनी फैज यांची ‘हम देखेंगे’ ही गाजलेली कविता समूहाने म्हटली.

त्यातील काही ओळीतील ‘ईश्‍वरा’बद्दलचे उल्लेख खटकल्याने हिंदुत्वाच्या काही तथाकथित कैवाऱ्यांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर लगेचच ‘आयआयटी’च्या संचालकांनी ताबडतोब विशेष समितीची स्थापना करून झाल्या प्रकाराची चौकशी आरंभली आहे. अर्थात, फैज हिंदूविरोधी आहेत की नाही, हा चौकशीचा मुद्दा नसून त्यांची कविता म्हणण्यात काही खोडसाळ उद्देश होता का? याची चौकशी सुरू असल्याची मखलाशी या समितीतर्फे आता करण्यात येत असली, तरी वास्तव काय आहे, ते साऱ्यांना कळतेच आहे. फैज यांच्या ज्या कवितेवरून एवढा वादंग माजला आहे, त्या कवितेत नेमके काय म्हटले आहे, हे जाणून घेण्याची गरजही या कैवाऱ्यांना वाटली नाही, हेदेखील सध्याच्या ज्वालाग्राही राजकारणाला साजेसेच.

१९७९ च्या आसपास पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख झिया-उल-हक यांच्या कारभाराच्या वेळी स्त्रियांवर लादल्या गेलेल्या अनेक निर्बंधांच्या विरोधात लिहिलेली ‘हम देखेंगे’ ही कविता होती. ‘...जब बिजली कड कड कडकेगी, जब अर्ज-ए-खुदा के काबे से, सब बुत उठवाए जाएंगे, हम अहले-सफा, मरदूद-ए-हरम, मसनद पे बिठाए जाएंगे, सब ताज उछाले जाएंगे....’ या कवितेतल्या ओळी आता वादग्रस्त ठरल्या आहेत. या ओळींचा ढोबळ अर्थ : एक दिवस कडाडेल वीज, डोळ्यांमधली उडेल नीज... सुरू होईल देवांचे राज्य, कट्टरतावाद्यांनी चिरडलेली देवमाणसं पुढे येतील, जुलमी ताज आणि तख्त फुटतील... या कवितेत वर्णिलेला ‘खुदा’ हा धर्मग्रंथातला नव्हे! फैज यांची शायरी इस्लाम किंवा अन्य कुठल्याही धर्मपंथात कधीच अडकली नाही. पिंडानेच साम्यवादी असणाऱ्या या कवीच्या प्रतिभेला हिंदूविरोधी ठरवणे हे केवळ हास्यास्पद नव्हे, तर हा विषय वैचारिकांमध्ये चर्चिला जाणेच अनुचित आहे.

फैज यांच्या कितीतरी कविता या समाजातील तेढी, वर्गभेद, स्वातंत्र्य अशा विषयांना वाहिलेल्या आहेत. ज्यांना ‘लुंपेन प्रोलिटॅरिएट’ किंवा ‘बुर्झ्वा’ म्हणून साम्यवादी हिणवत, त्या कणाहीन उदासीन वर्गावर कोरडे ओढण्यासाठी त्यांनी आपली शायरी शस्त्र म्हणून वापरली. सदासर्वकाळ शायरीतून प्रेमालापच करीत राहावे, याचा त्यांना मनस्वी तिटकारा असे. ‘नक्‍शे फरियादी’ हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह १९४५ साली प्रसिद्ध झाला. त्याच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘शेर लिखना जुर्म न सही... लेकिन बेवजहा शेर लिखना दानिशबंदी (शहाणपणा) भी नहीं!’ कवी हा प्राणी इतिहासापेक्षाही सत्यतेच्या निकट उभा असतो, असे प्लेटोचे एक सुभाषित आहे. अर्थात, हे वाक्‍य सर्वच कविमंडळींना लागू होते, असे नव्हे! पण, हे सुभाषित फैज यांच्या मात्र अगदी निकट उभे आहे.