अग्रलेख : ‘व्योममित्रे’चे स्वप्न!

vyom mitra
vyom mitra

अवकाश क्षेत्रातील संशोधनात भारतीय महत्त्वाकांक्षांना फुटलेले धुमारे आणि त्यासाठी सर्व पातळ्यांवर सुरू असलेले प्रयत्न लक्षणीय आहेत. गतवर्षी चांद्रमोहिमेत ऐनवेळी अडथळा निर्माण झाला; पण भारतीय वैज्ञानिकांनी प्रयत्न सोडलेले नाहीत. आता ‘गगनयान’ मोहिमेच्या यशासाठी ते कामाला लागले असून त्याचाच परिपाक म्हणजे ‘व्योममित्रे’ची प्रस्तावित अवकाशवारी. येत्या डिसेंबरात भारताचे ‘गगनयान’ अवकाशात झेपावेल, तेव्हा त्या यानाचे नियंत्रण ‘व्योममित्रे’च्या हाती असेल.

यानातील कृत्रिम वातावरण, गुरुत्वाकर्षणाचे पाश तोडून वेगाने अंतराळात कूच करणाऱ्या त्या यानाच्या नियंत्रण कक्षातील शेकडो लुकलुकणारे इंडिकेटर, यंत्रणा, निरनिराळ्या उपकरणांचा वापर हे सारे ‘व्योममित्र’ एकटीने सांभाळेल. त्या वेळी ती भारताचा प्रातिनिधिक चेहरा असेल- नव्हे, भारतीयांची अस्मिताच जणू ती आपल्यासोबत अवकाशात अभिमानाने मिरवेल. ‘व्योममित्र’ नामक या बुद्धिमान युवतीला चेहरा आहे, दोन हात आहेत. मुख्य म्हणजे प्रगल्भ मेंदू म्हणता येईल, असा काहीएक अवयव आहे.

लौकिकार्थाने तो मेंदू नसेल, पण क्षणोक्षणी वृद्धिंगत होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे वरदान तिला लाभलेले आहे. कानांवर पडणाऱ्या आदेश आणि सूचनांचे पालन तिला करता येते. अंतराळवीरांना अवकाशात येणाऱ्या अडचणी सोडवण्याची क्षमता तिच्या ठायी आहे. पण ती भारतीय असली तरी मनुष्य मात्र नाही. ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी बुधवारी तिची अधिकृत ओळख जगाला करून दिली. खुद्द ‘व्योममित्रे’ने संवाद साधून आपली क्षमता सिद्ध केली, ते ऐकून जाणतेदेखील हरखून गेले असतील. ज्या व्योमाचे उल्लेख वेदकाळापासून आढळतात, तो व्योम व्यापणारी ही ‘युवती’ भारताच्या हजारो वर्षांचा इतिहास आपल्या प्रणालीद्वारे जिवंत ठेवणार आहे.

वास्तविक चांद्रमोहिमेच्या आधीपासूनच ‘गगनयाना’च्या तयारीला ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ लागले होते. अत्यंत खर्चिक आणि महागडी अशी अवकाशातली उठाठेव भारतासारख्या तुलनेने गरीब देशाने करावी काय? हा वादाचा जुना विषय आहे. आणि बदलत्या काळासोबत तो बराचसा मागेदेखील पडला आहे. ‘अनेकसंशयोच्छेदि परोक्षार्थस्य दर्शकम, सर्वस्य लोचनं शास्त्रं, यस्य नास्तंध्य एव स:’ असे एक पुराणे संस्कृत सुभाषित आहेच. अनेक संशयांचे निराकरण करणारे, दृष्टीपल्याडचे अज्ञात सामोरे आणणारे शास्त्र वा विज्ञान हाच आपला डोळा आहे. तो नसेल तर दृष्टी असूनही आपण अंध आहोत, असे समजावे’ असा या सुभाषिताचा अर्थ. भविष्यकाळाकडे पाहात वेगाने पावले टाकीत पुढे जायचे, तर विज्ञानाचा हात धरूनच जायला हवे. 

मानवाला अवकाशात पाठविण्याआधी रशियाने सर्वप्रथम ‘लायका’ नावाची कुत्री अवकाशात पाठवली होती. तेथून सुरू झालेला प्रवास आता यंत्रमानव अंतराळात पाठविण्यापर्यंत झाला आहे. जिवांवरील परिणामांची माहिती घेण्यासाठी आता प्राणी पाठविण्याची गरज नाही, ते काम यंत्रमानवामार्फत केले जाऊ शकते. अवकाशात यंत्रमानव- म्हणजेच ‘ह्यूमनॉइड’ पाठवणारा भारत पहिला देश नव्हे. यापूर्वी अनेकदा अमेरिकी वा रशियन अंतराळतज्ज्ञांनी यंत्रमानव अवकाशात धाडले आहेत. गेल्याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात रशियाने ‘फ्योदोर’ नावाचा एक यंत्रमानव त्यांच्या अवकाशस्थानकात पाठवला होता. या ‘फ्योदोर’चा एकंदर रंगढंग ‘टर्मिनेटर’ या गाजलेल्या हॉलिवुडच्या चित्रपटातील ह्यूमनॉइडसारखा होता. त्याच्या हातात स्वयंचलित बंदूकही देण्यात आली होती. ‘फ्योदोर’च्या या काहीशा हिंसक रूपावर तेव्हा टीकादेखील झाली होती.

आपली ‘व्योममित्र’ मात्र खऱ्या अर्थाने मैत्रीण आहे. व्योम म्हणजे अवकाश. अज्ञात, अनंत अशा या व्योमपटलाची ही नवी मैत्रीण भारतीय शास्त्रज्ञांप्रमाणेच सुसंस्कृत, मितभाषी आणि कामसू आहे. रशियाच्या अगोदर ‘नासा’ने ‘सिमॉन’ नामक एक यंत्रमानव अवकाशयात्रेवर धाडला होता. अंतराळवीरांना भेडसावणाऱ्या समस्यांना उत्तरे कशी शोधावीत? हा व्यापक सवाल घेऊन ‘सिमॉन’ अंतराळफेरी करून आला.

‘व्योममित्र’ ही अवकाशयात्रेला जाणारी पहिली स्त्रीरूप प्रारूप आहे, असे म्हणता येईल. ‘व्योममित्र’ची अवकाशवारी होते न होते, तोवर आपले भारतीय अंतराळवीर पुढील वर्षी अवकाशात झेपावतील. भारतीय हवाई दलाचे चार वैमानिक त्यासाठी निवडले गेले असून, या क्षणी रशियातील एका अवकाश संशोधन केंद्रात ११ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण ते घेत आहेत. त्यांची यात्रा सुरक्षित, सफल व्हावी, यासाठी अवकाशाची ‘रेकी’ करून येण्याची जबाबदारी ‘व्योममित्रे’च्या खांद्यावर आहे. माणसाच्या विज्ञानभुकेची विवंचना मिटवण्यासाठी या मनुष्यप्राण्याने जी काही धडपड चालवली आहे, त्याचे एक फलित म्हणजे ‘व्योममित्र’. तिच्या डोळ्यांत स्वप्ने आहेत ती मानवकल्याणाची. अतिक्रमणाची किंवा कसलीच भूक तिला नाही. म्हणून तिचे स्वागत अधिक जोमाने करायचे. ‘व्योममित्रे’चे स्वप्न उज्ज्वल भविष्याचे आहे. भारताच्या, आणि कदाचित मानवतेच्याही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com