esakal | अग्रलेख : ठाकरे विरुद्ध ठाकरे!
sakal

बोलून बातमी शोधा

Raj and Uddhav thackeray

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर विधानसभा निवडणुकांनंतर अगदीच अनपेक्षितपणे नवे नेपथ्य उभे राहिल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत पुनश्‍च एकवार ‘भाऊबंदकी’ या नाट्याचा आता आणखी कितवातरी प्रयोग सुरू झाला आहे! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत राज ठाकरे यांनी आपल्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ला वेगळेच पावडर-कुंकू लावून जनतेपुढे पेश केले.

अग्रलेख : ठाकरे विरुद्ध ठाकरे!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

महाराष्ट्रात राजकीय अवकाश मिळविण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवे वळण घेतले आहे. त्यामुळे शिवसेनेलाही आपली भगवी ओळख अधोरेखित करावी लागली.

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर विधानसभा निवडणुकांनंतर अगदीच अनपेक्षितपणे नवे नेपथ्य उभे राहिल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत पुनश्‍च एकवार ‘भाऊबंदकी’ या नाट्याचा आता आणखी कितवातरी प्रयोग सुरू झाला आहे! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत राज ठाकरे यांनी आपल्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ला वेगळेच पावडर-कुंकू लावून जनतेपुढे पेश केले. तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रथमच आपल्या सत्काराच्या निमित्ताने जनतेपुढे येण्याची संधी साधली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उद्धव भाषणास उभे राहण्यापूर्वी तासभर आधीच ‘मनसे’चा नवा मेक-अप झाला होता. मात्र, उद्धव यांनी त्या ‘रंगक्रांती’वर थेट भाष्य करण्याऐवजी ‘मेरा झेंडा तेरे झेंडेसे जादा भगवा कैसा है!’ हे दाखवून देण्यातच आपल्या छोटेखानी भाषणाचा वेळ दवडला. या दोन्ही ‘रंगारंग’ सोहळ्यांना राज्यातील सत्तांतराची आणि विशेषत: उद्धव यांच्या गळ्यात पडलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या माळेची पार्श्‍वभूमी होती. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाशी कधी नव्हे इतका जबरदस्त पंगा तर घेतलाच होता. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रिपदही हासिल केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हीडिओ!’ या आपल्या चित्तचक्षुचमत्कारी नाट्याच्या प्रयोगाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेल्या राज ठाकरे यांना नंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत अवघा एकच आमदार निवडून आणता आला होता. त्यामुळे त्यांच्या १४ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न उभा राहिला होता. तेव्हा अखेरची धडपड म्हणून त्यांनी ‘मराठी बाणा’ तूर्तास कपाटात ठेवून हिंदुत्वाचा नारा दिला आहे. 

अर्थात, त्यामागे राज यांची काही राजकीय गणिते आहेत आणि ती लपून राहिलेली नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांनी १९८७मध्ये विलेपार्ले येथे झालेल्या एका पोटनिवडणुकीत हिंदुत्वाची भगवी शाल खांद्यावर घेतली आणि त्याच जोरावर भाजपच्या साथीने का होईना, काँग्रेसला पराभूत करून १९९५ मध्ये मंत्रालयावर भगवा फडकवला! तेव्हापासून बाळासाहेबांच्या ‘कडवट’ हिंदुत्वामुळे प्रेरित झालेल्या शिवसैनिकांचा एक मोठा समूह हा उद्धव यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यामुळे नाराज आहे. शिवाय, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांच्यासमवेत राज्याचा कारभार करताना, त्यांना केवळ आपले हिंदुत्वच नव्हे, तर मराठी बाणाही दोन घरे मागे घ्यावा लागणार आहे. हे लक्षात घेऊनच आता राज ठाकरे यांनी राजकीय अवकाशातील त्या पोकळीवर डोळा ठेवून आपला रंग बदलला आहे. तो बदलताना त्यांनी घेतलेला पवित्रा हा थेट बांगलादेशी मुस्लिमांची घुसखोरी, रस्त्यावरील नमाजपठण आदी गोष्टींना लक्ष्य करणारा होता. त्यामुळे त्यांच्या भाषणाचा हा भाग ऐकताना, साहजिकच आठवण होत होती ती बाळासाहेबांनीच १९९० या दशकांतील बांगला देशी घुसखोरांना मुंबईतून हाकलून देण्यासंबंधात घेतलेल्या पवित्र्याची. 

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांच्यावर अत्यंत तिखट असे वाग्बाण सोडणाऱ्या राज यांनी मोदी यांच्या चांगल्या कामांचे आपण कायमच कौतुक करत आलो आहे, अशी कबुली राज यांनी दिली. त्यामुळेच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सुधारित नागरिकत्व कायदा तसेच ‘एनआरसी’ या मुद्यांवर केंद्र सरकारला त्यांनी पाठिंबा देणे, हे काहीच अनपेक्षित नव्हते. या दोन बाबी वगळता त्यांचे भाषण हा बाळासाहेबांच्याच कोणत्याही भाषणाचा ‘रिप्ले’ होता. मात्र, राजकीय अवकाश शोधण्यासाठी त्यांनी चालविलेल्या धडपडीला मिळालेले हे एक नवीन वळण आहे, हे नक्कीच. त्यांच्या भावी वाटचालीची दिशा त्यामुळे स्पष्ट झाली आहे. राज यांच्या या नव्या भूमिकेमुळे सर्वात जास्त आनंद झाला असेल, तर तो अर्थातच भाजपला! सध्या महाराष्ट्र भाजपचे एकमेव उद्दिष्ट हे शिवसेनेचे उट्टे काढणे, एवढेच आहे आणि ते आता राज यांच्या हाताने होत असेल, तर त्यापेक्षा आनंदसोहळा तो कोणता? मात्र, अवघ्या सहा महिन्यांपूर्वी ‘वंदे मातरम!’ म्हणायला सांगणारे हे मोदी-शहा कोण, असा सवाल विचारणारे राज आता अचानक कोलांटउडी घेऊन तथाकथित राष्ट्रवादाचा आणि मुस्लिम विरोधाचा गजर करत असतील, तर त्यावर ‘मनसैनिक’ तरी कसा विश्‍वास ठेवतील? राज यांच्या धोरणात गेल्या १४ वर्षांत कशात सातत्य असेल तर ते वैचारिक धरसोडीतच दिसते! अर्थात, ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ ही राजकीय लढाई मराठी माणसाला आता नवी राहिलेली नाही. मनसेच्या मेळाव्यात आता अमित ठाकरे यांचेही लाँचिंग झाले असल्याने या संघर्षाला आणखी नवे परिमाणही मिळाले आहे. सध्या तरी ही लढाई चालू राहण्याचीच चिन्हे आहेत आणि भाजपही त्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुमक पुरवत राहील, यात शंका नाही.

loading image