esakal | अग्रलेख : डाग की दागिना?
sakal

बोलून बातमी शोधा

Donald-Trump

अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महाभियोग कारवाईला सामोरे जावे लागले. त्यांच्याविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव सिनेटमध्ये अपेक्षेनुसार फेटाळला गेल्यानंतर तडाखेबंद आणि नाट्यमय भाषण करून ट्रम्प यांनी जणू निवडणूक प्रचाराचे रणशिंगच फुंकले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तेथील राजकीय वास्तवाचे जे दर्शन घडले, ते चिंता निर्माण करणारे आहे.

अग्रलेख : डाग की दागिना?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महाभियोग कारवाईला सामोरे जावे लागले. त्यांच्याविरुद्धचा महाभियोग प्रस्ताव सिनेटमध्ये अपेक्षेनुसार फेटाळला गेल्यानंतर तडाखेबंद आणि नाट्यमय भाषण करून ट्रम्प यांनी जणू निवडणूक प्रचाराचे रणशिंगच फुंकले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तेथील राजकीय वास्तवाचे जे दर्शन घडले, ते चिंता निर्माण करणारे आहे. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाची धोरणे, ते पक्ष ज्या समाजघटकांचे प्रतिनिधित्व करतात त्यांचे वेगवेगळे हितसंबंध आणि या पक्षांची विचारसरणी यांत अंतर आहेच. पण लोकशाही चौकटीत दोघांमधील स्पर्धा आकार घेते आणि ते तसेच अपेक्षित आहे. पण या स्पर्धेला कमालीच्या दुभंगलेपणाची सध्या जी कळा आली आहे, तशी पूर्वी क्वचितच कधी आली असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त सभागृहात मंगळवारी परंपरेनुसार ट्रम्प यांचे जे भाषण झाले, त्या वेळी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधी आणि कनिष्ठ सभागृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी शिष्टाचार म्हणून हस्तांदोलनासाठी हात पुढे केला असता ट्रम्प यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले; तर चिडलेल्या पेलोसी यांनी नंतर ट्रम्प यांच्या भाषणाची प्रत भर सभागृहातच टरकावून दिली. साऱ्या जगासमोर दिसलेली ही कटूता हे एकूण राजकारण-समाजकारणात खोलवर रुजलेल्या दुभंगलेपणाचे फक्त लक्षण आहे. ट्रम्प यांची गेल्या चार वर्षांतील कारकीर्द त्याची तीव्रता वाढविणारे होते. एकतर तुम्ही ट्रम्पवादी असा, नाहीतर ट्रम्पविरोधी; या व्यतिरिक्त कोणता मार्ग उपलब्ध नाही, असे वातावरण त्या देशात तयार झाले आहे. 

वास्तविक देशाच्या सर्व क्षेत्रांतील वाटचालीचा आढावा घेत धोरणात्मक दिशा काय असेल, हे ‘स्टेट ऑफ द युनियन’च्या भाषणात सांगणे अपेक्षित असते. परंतु सर्व लोकशाही संकेत, पायंडे धुडकावून लावण्यातच पराक्रम आहे, अशी भावना असलेल्या ट्रम्प यांनी या भाषणाचा उपयोगही विरोधकांवर तोंडसुख घेण्यासाठी केला. अमेरिकेला पुन्हा महान बनविण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची जंत्री सांगत त्यांनी पूर्णपणे राजकीय प्रचाराचे भाषण केले. त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई होण्याची शक्‍यताच नव्हती, याचे कारण सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची भिस्त काही रिपब्लिकन मते फुटतील, यावर होती; परंतु मिट रॉम्नी वगळता कोणीच विरोधात मतदान केले नाही. या विजयानंतर रिपब्लिकन नेते ‘जितम्‌ मया’चा घोष करीत डेमोक्रॅटिक पक्षावर तुटून पडले.

महाभियोग हा डाग नसून जणू मिरविण्याचा दागिनाच आहे, असा आविर्भाव आणला जात आहे. देशातील सर्वसामान्य जनतेमध्ये पुरेसा पाठिंबा मिळविण्यात ज्यांना अपयश येत आहे, ते अशा मार्गांचा (महाभियोग) अवलंब करतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. सार्वत्रिक निवडणुकीतील बहुमत हेच सर्वस्व, बाकी सर्व गोष्टी तुच्छ, अशा मानसिकतेचे हे पडसाद आहेत. ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांचा हा दृष्टिकोन वारंवार समोर आला आहे. परंतु कोणत्याही सक्षम लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीप्रमाणेच एरवीच्या काळासाठी नियंत्रण आणि संतुलनाची व्यवस्था असते. कार्यकारी सत्ता निरंकुश होऊ नये म्हणून लोकशाही संस्था निर्माण केलेल्या असतात आणि निःपक्ष प्रसारमाध्यमेदेखील हेच काम करीत असतात. परंतु या कशाचीच पत्रास बाळगायची नाही आणि त्याचेच एक ‘तत्त्वज्ञान’ तयार करायचे असा ट्रम्प यांचा खाक्‍या राहिला आहे. त्यामुळेच विरोधकांशी मतभेद नव्हे तर शत्रुत्व, हे त्यांचे सूत्र राहिले आहे. 

ज्या कारणासाठी ट्रम्प यांच्यावर महाभियोग दाखल करण्यात आला, त्याचे स्वरूप गंभीर आहे. २०२०च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते व माजी उपाध्यक्ष ज्यो बिडेन हे ट्रम्प यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी असतील, असे म्हटले जाते. या बिडेन यांच्या मुलाच्या युक्रेनमधील गुंतवणुकीसंदर्भातील कथित गैरप्रकारांचे प्रकरण उकरून काढले जावे, यासाठी युक्रेन सरकारवर दबाव आणल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर होता. हे दडपण आणण्यासाठी युक्रेनला दिली जाणारी लष्करी मदतच ट्रम्प यांनी रोखून धरली होती, असा आरोप झाला. तसे असेल तर हा उघडउघड सत्तेचा गैरवापर म्हटला पाहिजे. महाभियोग प्रस्तावावर ट्रम्प यांचा विजय झाला, तरी तो राजकीय स्वरूपाचा आहे. त्यांच्यावरील या विशिष्ट आरोपांच्या सत्यासत्यतेचा फैसला त्यामुळे झालेला नाही, हे लक्षात घ्यायला हवे. ‘हम करेसो...’ या मनमानी पद्धतीने कारभार हाकूनही पुन्हा निवडून येण्याची आकांक्षा ट्रम्प यांच्यासारखा नेता बाळगू शकतो, हीच धक्कादायक बाब आहे. आता ट्रम्प यांच्या राजकीय हडेलहप्पीला येत्या निवडणुकीच्या माध्यमातून अटकाव होतो काय, ते पाहायचे.

loading image