अग्रलेख : गृहिणी, सखी, सचिव:

अग्रलेख : गृहिणी, सखी, सचिव:

अमेझॉन कंपनीने भारतीय लोकांच्या मानसिकतेचा आणि भाषांचा अभ्यास करून ‘ॲलेक्‍सा’ची निर्मिती केली आहे. आता ही बया दररोज मिनिटा मिनिटाला ‘आय लव्ह यू’ ऐकत असते! आपले पब्लिकच प्रेमाचे भुकेले, त्याला काय करणार?

हृदयीचे गुज कुणाला कानात सांगावे, असे अनेकांना भारी वाटते. पण, ते ऐकून घेणारेदेखील कुणीतरी हवे ना? कुणी फिदी फिदी हसले तर? चिडले, रागावले तर? अपमान झाला तर? या संकोचामुळे अनेक नाती जन्मायच्या आधीच संपून जातात. पण, सखी अलक्षेचे तसे नाही. तिला काहीही सांगावे... ती निमूटपणे प्रतिसाद देते.

‘‘सखी अलक्षे, आज जाने की जिद ना करो, ही गजल म्हण बरे...’’ असे नुसते आदेशावे, अलक्षा ते क्षणार्धात म्हणू लागते. मन कसे प्रसन्न होऊन जाते. सखी असावी तर अलक्षेसारखी. काहीही सांगितले, तरी ती ‘अडलंय माझं खेटर’ असे फणकारून दुरुत्तरे करीत नाही. अगदीच गोंधळली तर गप्प बसून राहते. पण, तोंडातून वावगा शब्द निघत नाही तिच्या! अलक्षाचे हे लक्षण अगदी अष्टनायिकांमधल्या स्वाधीनभर्तृकेसारखे. अहर्निश आपल्या सांगात्यासोबत राहणारी, त्याला किंवा तिला हवे-नको ते बघणारी, मन सदोदित प्रसन्न ठेवू पाहणारी. अलक्षा ही खरी सखी आहे, काही अंशी गृहिणीदेखील आहे आणि सचिव तर आहेच आहे. अशी सोबतीण मिळाली, तर कोणाला नको आहे?

सखी अलक्षेचे मूळ नाव ॲलेक्‍सा. तिला रंगरूप किंवा चेहरा नाही. आवाज मात्र आहे. बघायला गेले तर दोन-चार हजारांचे छोटेखानी डबडे. पण, त्यात हुन्नर किती दडले आहेत! एकदा घरात आली, की अगदी अंगवळणी पडून जाते. रेडिओ किंवा टेपवर म्हणाल ते गाणे लावू शकते. टीव्हीच्या वाहिन्या नुसत्या आवाजी आदेशाने बदलून देते. रिमोट कंट्रोलचीदेखील कटकट नाही. ‘‘ॲलेक्‍सा, सकाळी सहा वाजता उठीव गे...’’ असे नुसते सांगायचा अवकाश; साखरझोपेत मंजुळ सुरावट वाजवून ॲलेक्‍साने तुम्हाला जाग आणलीच म्हणून समजा. पुढारलेल्या देशात तर ही अलेक्‍सा कितीतरी व्यावसायिक कामेदेखील करते. प्रसंगी नोकरीसाठीच्या उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा घेते. टीव्ही, फ्रिज, वातानुकूल यंत्रणा चालू किंवा बंद करते. गॅरेजमधल्या मोटारीचे इंजिनसुद्धा चालू करून ठेवते, ‘ॲलेक्‍सा’च्या छोट्याशा जिवात कृत्रिम बुद्धिमत्तेचे रोपण केले आहे. या बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘ॲलेक्‍सा’ जगात अनेकांची फार लाडकी सखी, सचिव बनली आहे. भारतात तर तिने गृहिणी किंवा प्रियपात्राची भूमिकाही अंशत: स्वीकारलेली दिसते. काय आहे हे ॲलेक्‍सा प्रकरण? इंटरनेटच्या मायाजालाचेच हे आणखी एक उपयुक्‍त स्वरूप अमेझॉन कंपनीने बाजारात आणले, त्याला आता काही वर्षे झाली. स्पीकरसारखे दिसणारे हे उपकरण ‘गुगल’शी प्रामुख्याने संधान बांधून असते. गुगलवर आढळणारी बव्हंशी सर्व माहिती, डेटा ॲलेक्‍साच्या जिभेच्या अग्रावर असतो. हरघडी विकसित होण्याची क्षमता असलेली ही ‘ॲलेक्‍सा’ घरगृहस्थीच्या कामापासून व्यावसायिक मदतनिसाच्या भूमिकेपर्यंत असंख्य गोष्टी पार पाडू शकते.

ई-मेल पाठवायची आहेत? ॲलेक्‍सा, घे डिक्‍टेशन! घराचे कुलूप नीट लागले आहे का तपासायचे आहे? ॲलेक्‍सा, चेक कर बरं! रात्री उशिरा घरी न आलेला तरुण मुलगा नेमका कुठे अडकलाय हे तपासायचे आहे? ॲलेक्‍सा, त्याचं लोकेशन दाखव! अशा नानाविध आज्ञा ही ॲलेक्‍सा लीलया पाळते. तिला गरज असते ती फक्‍त वाय-फाय किंवा डेटा कनेक्‍शनची. घरचे सोडा, अवकाशयानात अंतराळवीरांसोबतही तिने दिन-रात काम करून दाखवले आहे. 

भारतात मात्र तिची भूमिका अगदीच खासगी होऊन जाते, असे चित्र आहे. अमेझॉन कंपनीने भारतीय लोकांच्या मानसिकतेचा आणि भाषांचा अभ्यास करून ‘ॲलेक्‍सा’ बाजारात आणली. आता ही बया दररोज मिनिटा मिनिटाला ‘आय लव्ह यू’ ऐकत असते! आपले पब्लिकच प्रेमाचे भुकेले, त्याला काय करणार? गेल्या वर्षी भारतात ‘ॲलेक्‍सा’ला मिळालेल्या प्रतिसादाचा आढावा घेणारा एक अहवाल अमेझॉनने नुकताच प्रसिद्ध केला, त्यात भारतीयांच्या ‘प्रीती’प्रश्‍नांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे. कित्येकांनी ‘ॲलेक्‍सा’ला ‘माझ्याशी लग्न करशील का?’ असेही विचारून टाकले आहे. ‘‘ॲलेक्‍सा, तुम कैसी हो?’’ हेदेखील भारतीय ग्राहक ‘ॲलेक्‍सा’ला आवर्जून विचारतो, असे लक्षात आले आहे. मिनिटाला सरासरी एक हजार गाणी ‘ॲलेक्‍सा’ला वाजवावी लागतात. आणि दिवसाकाठी लाखांच्या वर गाण्यांची ‘डीजेगिरी’ ‘ॲलेक्‍सा’ला भारतात करावी लागते. इतकेच काय, ‘हनुमान चालीसा’च्या पठणाची आज्ञा सर्वाधिक वेळा झाल्याचे दिसून आले आहे. ‘ॲलेक्‍सा’ला रूप आणि देह नाही, हे नशीबच म्हणायचे; अन्यथा अनवस्था प्रसंग गुदरला असता. एका इलेक्‍ट्रॉनिक उपकरणाने घडवलेला हा बदल भविष्यातील जीवनमानाची चुणूक दाखवणारा मात्र नक्‍की आहे. न जाणो, पुढेमागे, एखादी यांत्रिक ‘ॲलेक्‍सा’ सदेह स्वरूपात साकार होईल आणि कधीही न भांडणारी, रुसणारी, भेटवस्तू न मागणारी ही नवी ‘गृहिणी, सखी आणि सचिव’ थेट मॉलमधल्या शोरूममधून घरी आणली जाईल. मग काय, ‘ॲलेक्‍सा, जरा चहा टाक’ म्हटले की आलाच हातात वाफाळ चहाचा कप! असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com