esakal | अग्रलेख : ...खेळ थांबला
sakal

बोलून बातमी शोधा

wimbledon

दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचा केवळ भौगोलिक नकाशा बदलायला सुरुवात झाली, असे नाही तर लोकांच्या आचार-विचारात आणि व्यवहारातही मोठे बदल झाले. हे बदल सामाजिक पातळीवर होते, तसेच ते आर्थिक पातळीवरही होते. या बदलात जगभरात होत असलेल्या क्रीडा स्पर्धांचा अंतर्भाव असणे, हे मग अपरिहार्यच होते. तरीही लंडनमध्ये होणाऱ्या ख्यातकीर्त विम्बल्डन टेनिस स्पर्धांमध्ये महायुद्धाचा काळ वगळता कधीच खंड पडला नव्हता.

अग्रलेख : ...खेळ थांबला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचा केवळ भौगोलिक नकाशा बदलायला सुरुवात झाली, असे नाही तर लोकांच्या आचार-विचारात आणि व्यवहारातही मोठे बदल झाले. हे बदल सामाजिक पातळीवर होते, तसेच ते आर्थिक पातळीवरही होते. या बदलात जगभरात होत असलेल्या क्रीडा स्पर्धांचा अंतर्भाव असणे, हे मग अपरिहार्यच होते. तरीही लंडनमध्ये होणाऱ्या ख्यातकीर्त विम्बल्डन टेनिस स्पर्धांमध्ये महायुद्धाचा काळ वगळता कधीच खंड पडला नव्हता. मात्र, कोरोना विषाणूने जगभरातील अनेक बाबींना अल्पविराम दिला आणि त्याचाच फटका १८७७ पासून अव्याहतपणे सुरू असलेल्या आणि कोट्यवधी टेनिस शौकिनांच्या ‘दिल की धडकन’ असलेल्या विम्बल्डन स्पर्धेला बसला आहे. ‘कोरोना’च्या सावटाखाली अनेक प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धा पुढे ढकलणे भाग पडत आहे.

या पार्श्‍वभूमीवर हा विम्बल्डनचा थरार यंदा बघायला मिळेल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका-कुशंकांनी घर केले होते. खरे तर लंडनमधील विख्यात ‘ऑल इंग्लंड लॉन टेनिस ॲण्ड क्रॉक्‍वेट क्‍लब’च्या हिरवळींवर होणाऱ्या या स्पर्धेला तब्बल दोन-सव्वा दोन महिन्यांचा अवकाश आहे. तरीही या स्पर्धा रद्द झाल्याची बातमी अखेर गुरुवारी सकाळी आली आणि या स्पर्धेचे ‘ग्रॅण्ड स्लॅम’ टायटल एकदा तरी जिंकण्याची दुर्दम्य इच्छा मनी बाळगणाऱ्या जगभरातील टेनिसपटूंबरोबरच टेनिस शौकिनांनाही मोठा धक्‍का बसला. अर्थात, ‘कोरोना’मुळे विम्बल्डनच नव्हे, तर जागतिक कीर्तीच्या अनेक स्पर्धांना फटका बसला आहे आणि दर चार वर्षांनी होणारे ‘ऑलिम्पिक’ही त्यातून सुटू शकलेले नाही. खरे तर ऑलिम्पिक आणखी अडीच-तीन महिन्यांनी होणार होते, तरीही जगभरातील क्रीडापटूंच्या स्वास्थ्याच्या काळजीपोटी ते वर्षभर पुढे ढकलण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे.

मानवी संस्कृतीच्या वाटचालीत खेळाला विशेष महत्त्व आहे. रग जिरवणारा, आनंद निर्माण करणारा आणि स्पर्धा असली तरी शत्रुभाव निर्माण न करणारा हा प्रकार आहे. त्यातच जेव्हा अडथळे निर्माण होतात, तेव्हा माणसाची खरीखुरी हानी होते. जागतिक स्तरावर विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा भरवण्याची प्रेरणा १९व्या शतकात काही क्रीडाप्रेमींना मिळाली ती आठव्या शतकात ग्रीसमध्ये ऑलिम्पिया येथे होत असलेल्या अशाच प्रकारच्या स्पर्धांमुळे. त्यामुळे आज जगभरातील दोनशे देश सहभागी होत असलेल्या या स्पर्धांना ‘ऑलिम्पिक’ हे नाव देण्यात आले आणि १८९६मध्ये ते पहिल्यांदा आयोजित करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी किमान दोन दशके आधीच म्हणजे १८७७पासून विम्बल्डन स्पर्धा सुरू झाल्या होत्या. अशा या शतकांची परंपरा असलेल्या दोन प्रमुख स्पर्धांबरोबरच लंडन मॅरेथॉनबरोबरच ॲमस्टरडॅम, बार्सिलोना, टोकियो येथील मॅरेथॉन आणि युरोपियन फुटबॉल, तसेच रग्बी आणि स्नूकर्सच्या अनेक स्पर्धा एक तर रद्द करण्यात आल्या आहेत वा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ‘जिद्द’ वाखाणण्याजोगी आहे! हे मंडळ मात्र १५ एप्रिलपासून सुरू होणारी ‘इंडियन प्रिमियर लीग’ (आयपीएल) अजूनही होईल, अशी आशा धरून आहे. विम्बल्डनच्या वेबसाइटवर गेल्यास ‘कॅन्सल्ड’ अशी उदासवाणी अक्षरे ठळकपणे बघणे भाग पडत आहे, तर त्याचवेळी ‘आयपीएल’चे संकेतस्थळ मात्र ‘१५ एप्रिल’ हीच तारीख ठळकपणे दाखवीत आहे. क्रिकेटविषयीचे हे एवढे प्रेम आणि कोणताही धोका पत्करून ही स्पर्धा आयोजित करणारच, या ‘जिद्दी’मागचे ‘अर्थपूर्ण’ राजकारण एव्हाना सर्वांनाच ठाऊक झाले आहे. त्यातच विम्बल्डन असो की ऑलिम्पिक याप्रमाणे ‘आयपीएल’ या स्पर्धेतील जयविजयाचा कोणताही हिशेब जागतिक स्तरावरील क्रिकेटच्या खतावणीत नोंदला जात नाही. तो नोंदला जातो तो ‘बीसीसीआय’, तसेच या स्पर्धेतील संघांचे मालक आणि खेळाडू यांच्या खिसापाकिटात! त्यामुळे या सर्वांनाच सोन्याची अंडी देणारी ही ‘आयपीएल’ नावाची कोंबडी यंदा मरू देणारे परवडणारे नाही. त्यामुळेच परदेशी खेळाडूंविना आणि विनाप्रेक्षकही ही स्पर्धा भरवता येईल काय किंवा ऑक्‍टोबर २०२० मध्ये होणाऱ्या ‘टी २०’ स्पर्धा ‘आयसीसी’ने पुढे ढकलल्यास तेव्हा भरवता येईल काय, असे अनेक प्रस्ताव रोजच्या रोज पुढे आणले जात आहेत.

‘आयपीएल’ ही स्पर्धा २००८ मध्ये प्रथमच ज्या रंगारंग पद्धतीने आयोजित केली गेली, त्यामुळे संध्याकाळच्या निवांत वेळी त्याची मौज लुटण्याची अहमहमिका सुरू झाली. पारंपरिक क्रिकेटचे सारे नियम धाब्यावर बसवून निव्वळ करमणुकीखातर ही ‘सर्कस’ सुरू झाली आणि सध्याच्या गतिमान युगात पाच दिवसांच्या कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवणाऱ्यांच्या क्रिकेटप्रेमाला उधाण आले. पहिली दोन-चार वर्षे क्रिकेटप्रेमी या स्पर्धेत रंगून जातही होते. मात्र, त्यानंतर या स्पर्धेतील ‘पूर्वनिश्‍चिती’ हळूहळू साऱ्यांच्याच ध्यानात आली, तरीही १३० कोटींच्या या ‘क्रिकेटसत्ताक’ देशात या ‘सर्कशी’लाही आश्रय देणाऱ्यांची कमतरता नव्हती. हे सगळे मुद्दे असले तरी क्रीडारसिकांनाही या स्पर्धांचे वेध लागलेले असतात हे नाकारता येणार माही. परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी, अशीच प्रार्थना तमाम क्रीडारसिक करत असतील.

loading image