esakal | अग्रलेख : संवाद नि दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : संवाद नि दिलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन दिवसांत दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून घराघरांत ठाणबंद होऊन बसलेल्या १३० कोटी जनतेला एकाच वेळी दिलासा देताना, त्यांना आणखी एका ‘इव्हेंट’मध्ये गुंतवण्याचे कामही त्यांनी केले आहे. मोदी यांनी ‘कोरोना’ विषाणूच्या फैलावामुळे देशभरात निर्माण झालेल्या पार्श्‍वभूमीवर राज्याराज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि त्यामुळे लोकांच्या मनांतील अनेक अनुत्तरित प्रश्‍नांना अप्रत्यक्षपणे उत्तरे मिळाली.​

अग्रलेख : संवाद नि दिलासा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘कोरोना’ विषाणूच्या च्या विरोधातील लढाई अद्याप संपलेली आणि जिंकलेली नाही, ती जिंकण्यासाठी संयम आणि शिस्तीची गरज आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन दिवसांत दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून घराघरांत ठाणबंद होऊन बसलेल्या १३० कोटी जनतेला एकाच वेळी दिलासा देताना, त्यांना आणखी एका ‘इव्हेंट’मध्ये गुंतवण्याचे कामही त्यांनी केले आहे. मोदी यांनी ‘कोरोना’ विषाणूच्या फैलावामुळे देशभरात निर्माण झालेल्या पार्श्‍वभूमीवर राज्याराज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि त्यामुळे लोकांच्या मनांतील अनेक अनुत्तरित प्रश्‍नांना अप्रत्यक्षपणे उत्तरे मिळाली.

ही उत्तरे ‘रोखठोक’ पद्धतीची नसली, तरी त्यातून अनेक गोष्टी सूचित झाल्या आहेत आणि मुख्य म्हणजे जेव्हा केव्हा ‘कोरोना’ने आपल्या पायात घातलेल्या बेड्यांमधून आपण मुक्‍त होऊ, त्यानंतर कसे वागावे लागणार आहे, याचेच संकेत मिळाले. भारतातील ‘कोरोना’ संसर्गग्रस्तांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत वाढ होत असली, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याबाबतचे जे काही वेगवान गणित मांडले गेले होते, ते चुकवण्यात आपण मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो आहोत.

दिल्लीत ‘तबलिगी जमात’ या मुस्लिमांच्या एका धार्मिक संघटनेच्या कार्यक्रमासाठी बरेच लोक एकत्र आले होते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर परदेशी पाहुणेही होते. त्यातून जो काही गोंधळ झाला आणि संसर्गग्रस्तांची संख्या वाढली, ते सारे धक्कादायकच म्हणावे लागेल. ‘तबलिगी जमात’चा कार्यक्रम आणि नंतर जे काही घडले ते टाळता येऊ शकले असते, हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे.

मुंबईजवळच्या वसईतही अशीच परिषद  होणार होती. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी त्यास एकूण परिस्थिती बघून परवानगी नाकारली, हे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच स्पष्ट केले आहे. असे असताना दिल्लीत मात्र ही परवानगी कशी काय मिळाली? या कार्यक्रमासाठी जमलेली एवढी आणि विशेषत: परदेशी पाहुण्यांची गर्दी बघूनही तेथून हाकेच्या अंतरावरचे आणि मुख्य म्हणजे थेट केंद्र सरकारच्या अधिकारकक्षेत असलेले निजामुद्दीन पोलिस ठाणे काय करत होते, असे अनेक प्रश्‍न पुढे आले आहेत. मात्र, आता त्यानंतर देशभरातील साऱ्याच यंत्रणा झपाट्याने कामास लागल्या असून, त्यामुळे अनेक संसर्गग्रस्तांना शोधून ‘क्‍वारंटाईन’मध्ये पाठवण्यात यश आले, हे महत्त्वाचे आहे.

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या व्हिडिओ संवादातून आणखी एक बाब पुढे आली आणि ती महत्त्वाची आहे. ‘तबलिगी जमात’च्या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात अनेक ठिकाणी अजूनही होत असलेल्या विविध धर्मांच्या सण-समारंभांचे काय करावयाचे, असा प्रश्‍न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारल्यावर ‘मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील विविध धर्मांच्या नेत्यांशी संवाद साधून, त्यातून तोडगा काढावा,’ असे पंतप्रधानांनी सुचविले आहे. अर्थात, सगळेच राजकारणी ते करतील काय हा प्रश्‍न आहे; कारण गुरुवारी रामनवमीच्या दिवशी घरातूनच रामाला नमस्कार करावा, असे मोदी यांनी सांगितल्यावरही तेलंगणाचे मंत्री एका जंगी उत्सवात सहभागी झाले होते. हे असले प्रकार टाळण्याची सद्यःस्थितीत नितांत गरज आहे. लोकांना ब्रह्मज्ञान सांगणाऱ्या या नेत्यांचे काय करावयाचे हा खरा प्रश्‍न आहे. 

मात्र, या सर्वांपेक्षा गंभीर प्रश्‍न आपला जीव धोक्‍यात घालून संसर्गग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्‍टर, तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचा आहे. शुक्रवारी सकाळी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी अशा लोकांचे कान उपटायला हवे होते. खरे तर आज देशात मोदी यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या एका शब्दाने हे हल्ले थांबू शकले असते. त्याऐवजी त्यांनी जनतेला आणखी एक ‘इव्हेंट’ दिला. अर्थात, रिकामे हात आणि भकास मने यांना दिलासा देण्याचे काम त्यातून काही प्रमाणात साधते, हे खरेच. पण त्यामागचा उद्देश ओळखून लोकांनी त्याची अंमलबजावणी करायला हवी.

हा ‘इव्हेंट’ रस्त्यावर न येता आणि एकत्र न जमता आपापल्या घराच्या दारातूनच साजरा करावयाचा आहे. ‘जनता कर्फ्यू’नंतर वैद्यकीय क्षेत्रांतील लोकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंतप्रधानांनी सांगितलेल्या घंटानाद, तसेच थाळीनादाचा लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता उत्सव केला आणि त्यानिमित्ताने घराबाहेर पडण्याची संधी साधली. आताही तसेच झाले तर ‘सामाजिक दूरस्थते’चा बोजवारा उडेल आणि तो सर्वांसाठीच अत्यंत धोकादायक ठरू शकतो. पंतप्रधानांनीही त्याचा उल्लेख केला आहेच. ‘कोरोना’च्या विरोधातील लढाई अद्याप संपलेली आणि जिंकलेली नाही, ती जिंकण्यासाठी संयम आणि शिस्तीची गरज आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

loading image