अग्रलेख : या कसोटीला उतरूया

Vuhan-City
Vuhan-City

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या चीनमधील वुहान या महानगरातील लॉकडाउन बुधवारी उठवण्यात आला, तरी तेथील नागरिकांनी लगेच रस्तोरस्ती येऊन आनंद साजरा केलेला नाही, हे लक्षात घ्यायला हवे. त्याचे कारण म्हणजेच वुहानमधील निर्बंध उठवण्यात आले असले, तरीही तेथील रहिवाशांनी सजग राहण्याचे, तसेच आरोग्यव्यवस्थेने घालून दिलेले नियम पाळण्याचे सक्‍त आदेश तेथे कायम आहेत. अन्यथा, हा विषाणू पुन्हा नव्या जोमाने प्रवेश करू शकतो, असे ‘निदान’ आहे! गेल्या डिसेंबरमध्ये या विषाणूचे उगमस्थान वुहान असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतरच्या महिनाभरातच म्हणजे २३ जानेवारी रोजी हे महानगर ‘सील’ करण्यात आले. त्यानंतरचे ७६ दिवस तेथील रहिवाशांनी सर्व निर्बंधांचे कठोरपणे पालन केले आणि अखेर आता त्या रहिवाशांना त्यांचे स्वातंत्र्य किमान काही प्रमाणात तरी मिळाले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे.

‘सामाजिक दूरस्थता’, तसेच ‘विलगीकरण’ हाच या जीवघेण्या विषाणूच्या संसर्गावर मात करण्याचा एकमेव उपाय आहे, हा धडा वुहानने दिला आहे. त्याचबरोबर आपल्या राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेने बजावलेल्या अतुलनीय कामगिरीनेही सद्यःस्थितीत देशभरात या विषाणूशी लढताना नेमके कोणते डावपेच वापरायला हवेत, याचे आदर्श ‘मॉडेल’च उभे केले आहे. वुहान, तसेच भिलवाडा या शहरांनी घालून दिलेला हा परिपाठ देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरी आणि विद्येचे माहेरघर म्हणून ख्यातकीर्त असलेले पुणे या दोन महानगरांत गिरवण्याची नितांत गरज आजच्या घडीला निर्माण झाली आहे.

‘कोरोना’च्या भारतातील ‘स्कोअरबोर्डा’वर महाराष्ट्रच प्रथम क्रमांकावर असून, त्यातही मुंबई व पुणे येथील बाधितांची संख्या आता बेरजेऐवजी थेट गुणाकाराच्या हिशेबात वाढत चालली आहे. मुंबईत चार प्रमुख ‘हॉटस्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आले असून, त्यापैकी वरळी हा परिसर ‘सील’ करून चार दिवस उलटले आहेत. पुण्यातही काही भाग प्रथम ‘सील’ करण्यात आले होते. मात्र, तेवढ्याने भागले नाही. त्यामुळे पुण्यनगरीतील मध्य वस्तीमध्ये थेट ‘कर्फ्यू’ लागू करणे प्रशासनाला भाग पडले आहे.

अर्थात, मुंबईकरांनीही घराबाहेर पडण्यात आपण पुणेकरांपेक्षा तसूभरही  कमी नसल्याचे दाखवून दिल्यामुळे राज्याच्या राजधानीतील बाधितांची संख्याही वेगाने वाढत आहे. अर्थात, मुंबईचे पुण्यापेक्षा वेगळेपण अनेक बाबतीत आहे आणि त्याला प्रामुख्याने या महानगरातील गर्दी कारणीभूत आहे. धारावी या आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत त्यामुळेच ‘समूहसंसर्गा’ची लाट आली आहे. अवघ्या दोन-सव्वादोन चौरस किलोमीटरच्या या परिसरात सुमारे दहा लाख लोक राहतात आणि नेमक्‍या याच कारणामुळे तेथे ‘सामाजिक दूरस्थता’ अमलात आणणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळेच त्यावर मात करण्यासाठी आता ‘भिलवाडा मॉडेल’चा वापर करण्याशिवाय पर्याय दिसत नाही. 

अर्थात, हा विचार करताना भिलवाडा परिसराचे वेगळेपणही लक्षात घ्यावे लागेल. भिलवाडा जिल्ह्याचा विस्तार हा साधारणपणे दहा चौरस किलोमीटर परिसरात आहे आणि तेथील लोकसंख्या पाच लाख ६२ हजार आहे. त्यामुळे साहजिकच या रोगाची लक्षणे असलेले तेथील रहिवाशी हुडकून काढून, त्यांचे विलगीकरण करणे शक्‍य झाले.

अर्थात, धारावीतही या रोगाची प्राथमिक लक्षणे असलेल्यांची ओळख पटवणे आणि त्यांना तातडीने त्या अतिगर्दीच्या वस्तीतून बाहेर काढणे, याशिवाय अन्य कोणताही पर्याय सध्या तरी दिसत नाही. धारावीत अशी प्राथमिक लक्षणे असलेल्यांची संख्या अर्थातच काही हजारांत असू शकते, तरीही त्यांना विलग करावे लागणारच आहे. भिलवाड्यात काही हॉटेले, शाळा, तसेच वसतिगृहे यांचा वापर त्यासाठी केला गेला.

मुंबईतही तसे करता येईल. मुंबईत असलेल्या अनेक स्टेडियमवरही अशा बाधितांना वा लक्षणे असलेल्यांना स्वतंत्रपणे ठेवता येईल. पुण्यातही आता ‘कर्फ्यू’ जारी केलेल्या परिसरात भिलवाड्याप्रमाणेच बाधित, तसेच लक्षणे असलेल्यांना शोधून वेगळे करावे लागणार आहे. अर्थात, या योजनेचे यश हे मुंबई व पुण्यातील सुज्ञ नागरिक त्याला किती प्रतिसाद देतात, यावरच हे अवलंबून आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेल्या लॉकडाउनची मुदत येत्या मंगळवारी (ता. १४ एप्रिल) संपत आहे. त्यानंतर पुढे काय करावयाचे याबाबत मोदी मुख्यमंत्र्यांशी शनिवारी चर्चा करणार आहेत. हा लॉकडाउन शक्‍य तितक्‍या लवकर उठावा, अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. मात्र, महाराष्ट्रातील त्याची तारीख ठरविणे हे आपल्या सर्वांच्या हाती आहे; विशेषतः पुणे आणि मुंबईच्या नागरिकांच्या हातात आहे.

महानगरी जीवनात संकटे काही कमी येत नाहीत. पण यावेळच्या संकटाचे स्वरूप खूप वेगळे आहे. कस पाहणारे आहे. या कसोटीला उतरण्याचा निर्धार करूया. संसर्ग पसरू नये यासाठीच्या या लढ्याकरता या दोन महानगरांतील नागरिकांनी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. वुहानमधील लॉकडाउन मागे घ्यायला ७६ वा दिवस उजाडावा लागला, हे आपण सर्वांनीच ध्यानात घेतलेले बरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com