अग्रलेख : ‘गर्दी’ आणि वर्दी

अग्रलेख : ‘गर्दी’ आणि वर्दी

संसर्गाच्या या संकटकाळात गर्दीचे नियंत्रण हा अत्यंत महत्त्वाचा भाग असून, पोलिसांनी त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे आणि संवेदनशीलतेनेही करायला हवी. 

लॉकडाउनच्या काळातील सामाजिक दूरस्थतेचे सारे नियम धाब्यावर बसवून भाजी खरेदीसाठी गेलेल्या पाच जणांना अटकाव करताच, त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला करून एका फौजदाराचा हातच तोडून टाकल्याची अमानुष घटना पंजाबातील पतियाळा येथे रविवारी घडली. सुदैवाने हा हात परत जोडण्यास चंडीगडमधील डॉक्‍टरांना यश आले असले, तरी त्यामुळे लॉकडाउनच्या काळातील पोलिस व जनता यांच्या संबंधांवर प्रकाश पडला आहे. त्याचबरोबर "कोरोना'च्या संसर्गापासून लोकांना वाचविताना पोलिसांना कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे, हेही अशा घटनांतून समोर येत आहे.

पंजाबात पोलिसांवर हल्ला करणारे हे जे टोळके आहे, त्यांच्यावर कठोर कारवाईच आवश्यक आहे. सार्वजनिक हितासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांविषयी आदर आणि कृतज्ञता  असायला हवी. त्यांच्यावर हल्ला करणे, याचा निषेध करावा तेवढा थोडा. देशाच्या इतरही भागात असे काही प्रकार घडले आहेत. पतियाळातील या दुर्दैवी घटनेत पोलिसांचे वर्तन हे पूर्णपणे जबाबदार प्रशासकीय यंत्रणेचेच होते. पतियाळातील भाजी बाजारात एका गाडीतून निहंग पंथांच्या प्रमुखासह आणखी चार लोक येणे, हाच या काळात जारी असलेल्या नियमांचा भंग होता. त्यामुळे त्यांना जाब विचारणे, हे पोलिसांचे कर्तव्य होते. त्यानंतर या निहंगांनी जे काही केले ते केवळ त्यांच्या मुजोरीचे दर्शन घडवणारे होते.

देशाच्या इतर भागातही काही घटना घडल्या आहेत. कोरोना विषाणूच्या जगभरातील थैमानानंतर, लॉकडाऊन हाच या भयावह संकटावरील एकमेव उपाय असल्याचे स्पष्ट झाल्याने ही "संचारबंदी' जारी करणे सरकारला भाग पडले आहे. मात्र, त्यानंतरही देशाच्या बहुतेक भागांत ती मोडण्यातच "वीरश्री' असल्याचा काहींचा समज झाला आहे.

त्यांचा तो समज दूर करायलाच हवा. त्यांपैकी ज्यांना शब्दांचा मार पुरत नाही, त्यांच्यासाठी लाठीचा वापर अटळ असला तरी तो सरसकट करता कामा नये. एखाद्या दंगलीचे, हिंसाराचे नियंत्रण ठेवतांना पोलिसांना बजावावी लागणारी भूमिका आणि साथीच्या संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत गर्दीचे नियंत्रण करताना बजावायची भूमिका यात महदंतर आहे. हा फरक लक्षात घ्यायला हवा.  याचे कारण लाठीचा प्रसाद देणे हाच "पुरुषार्थ' असल्याचे पोलिसांनाही वाटू लागले आहे की काय ,असा प्रश्न काही ठिकाणच्या घटनांमुळे उपस्थित झाला आहे.

"कोरोना'मुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावाच्या अभूतपूर्व काळात पोलिस आणि आम आदमी यांच्यातील संबंध विकोपाला जातात की काय, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. तसे होणे हे कोणाच्याच हिताचे नाही आणि सध्याच्या काळात त्यामुळेच सर्वसामान्य जनतेबरोबरच पोलिसांनीही संयम पाळून सामंजस्याचीच भूमिका घ्यायला हवी. तथापि, सध्या संचारबंदी ही अपवादातील अपवादात्मक परिस्थितीमुळे जारी करावी लागलेली आहे, याचे भान नसल्याचे अनेक ठिकाणच्या पोलिसी "दंडा'शाहीमुळे दिसून येत आहे. एकीकडे जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा नाही आणि ती दुकाने 24 तास उघडी राहतील, अशा घोषणा सरकारतर्फे केल्या जात आहेत, तर त्याचवेळी अगदी जीवनावश्‍यक औषधांच्या खरेदीसाठी निघालेल्यांनाही पोलिसी लाठ्यांचा मार खावा लागत आहे. त्यातून आरोग्यकर्मी म्हणजेच डॉक्‍टर, त्यांचे सहकारी कर्मचारी, तसेच अंगणवाड्यांतील "आशा' भगिनी यांचीही सुटका झालेली नाही. यालाच तारतम्याचे भान सुटलेला पोलिसी खाक्‍या, असे नाईलाजाने म्हणावे लागते.

गेल्या चार दिवसांपासून, होणाऱ्या प्रचंड आणि अनियंत्रित गर्दीमुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांत अचानक भाजी आणि फळफळावळ विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारला घेणे भाग पडले. त्यामुळे अनेक किरकोळ भाजी व फळ विक्रेत्यांना आपल्याकडील मालाचे काय करावयाचे हा प्रश्‍न पडला आहे. हा सारा माल अर्थातच नाशवंत आहे.

त्यामुळे काहींनी तो विक्रीला काढताच, पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याच्या घटना राज्याच्या राजधानीतच घडल्या आहेत. खरे तर तेव्हा फळफळावळ खरेदीसाठी ग्राहकही तेथे होते. त्यांनी तो माल काही मिनिटांत "फस्त' केला असता. मात्र, पोलिसांनी त्यांना मुभा देण्याऐवजी गोरगरीब विक्रेत्यांना "प्रसाद' देणे पसंत केले. असे भान सुटणे योग्य नव्हे. त्यातूनच अनवस्था प्रसंग गुदरू शकतो. मात्र पोलिसांनी रस्त्यांवर आलेल्या लोकांवर केवळ लाठ्याच चालविल्या, असे झालेले नाही. लॉकडाऊनमुळे गरीब, गरजू, बेघर, कामगार, देहविक्रय करणाऱ्या महिला आदी विविध घटकांना पुण्यातील पोलिसांनी सुमारे चार लाख जेवणाची पाकिटे आणि अन्नधान्य देऊन खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविले आहे, याचीही नोंद घ्यायला हवी. संसर्गाच्या या संकटकाळात गर्दीचे नियंत्रण हा अत्यंत महत्वाचा भाग असून, पोलिसांनी त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे आणि संवेदनशीलतेनेही करायला हवी. लोकांनीही `गर्दी` होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. सध्याच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक आहे ती स्वयंशिस्त. ती पाळली तर संघर्षाचे प्रसंग नक्कीच कमी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com