अग्रलेख : अनास्थेचे बळी

Gas-Leakage-visakhapatnam
Gas-Leakage-visakhapatnam

विशाखापट्टणम येथील वायूगळतीत किमान अकरा जणांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूचे वृत्त बातम्यांच्या रणधुमाळीत मागे पडते न पडते, तोच औरंगाबाद परिसरात लोहमार्गावर थकून भागून विसावलेले २१ मजूर मालगाडीखाली चिरडले गेल्याची बातमी थडकली. ती काळजाला घरे पाडणारी आहे. खरे तर या दोन्ही दुर्घटनांमागे वेगवेगळ्या प्रकारची अनास्था कारणीभूत आहे.

त्यातही या रेल्वे दुर्घटनेत अनेक पदर आहेत आणि त्यात गेले काही दिवस ऐरणीवर आलेला स्थलांतरित, परप्रांतीय मजुरांच्या ‘घरवापसी’चा प्रश्‍न ठळकपणे अधोरेखित झाला आहे. देशाच्या विविध प्रांतांत मोलमजुरीसाठी आलेल्या हजारो मजुरांनी लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपत आला, तरी आपली घरी जाण्याची व्यवस्था होत नाही, हे लक्षात आल्यावर थेट पायपीट सुरू केली होती. परभणी-भुसावळ लोहमार्गावरून निघालेल्या या मजुरांनी रात्री तेथेच पथारी टाकण्याचा निर्णय घेतला.

आता लोहमार्ग ही झोपायची जागा आहे काय, असा प्रश्‍न अर्थातच विचारला जाईल. तो रास्तच आहे. त्यांची ही चूक झाली हेही नाकारता येणार नाही. पण लॉकडाउनमुळे रेल्वेसेवा बंद असल्यामुळे कोणतीही गाडी येण्याची शक्‍यता नाही, असा त्यांचा समज झाला होता. माहितीच्या युगाचा आपण उठसूट डिंडीम पिटत असतो, पण नेमकी, वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह माहिती मिळण्यात आजही किती अडचणी आहेत, हे या घटनेत दिसले. घराची ओढ लागलेल्या त्या जीवांवर काळाने घाला घातला. हा अपघात आहे हे मान्य केले, तरी मुळात इतक्‍या जिकिरीच्या प्रवासाला हे मजूर का प्रवृत्त झाले, हा मूळ प्रश्न आहे.

मजुरांच्या ‘घरवापसी’बाबत ना काही ठोस योजना आखली गेली आहे, ना त्यांना त्या संदर्भात काही स्पष्ट आश्‍वासन देण्यात आले आहे. लॉकडाउनची मुदत सतत वाढवत राहणाऱ्या आणि त्यामुळेच आपण या जीवघेण्या विषाणूला रोखू शकलो आहोत, असा वृथाभिमान बाळगणाऱ्या सरकारला या मृत्यूंची जबाबदारी टाळता येणे कठीण आहे. विशाखापट्टणम येथे जे काही घडले त्यासही अशाच प्रकारची अनास्था कारणीभूत असल्याचा निष्कर्ष प्रथमदर्शनी तरी काढण्यात आला आहे. एलजी पॉलिमर्स या कंपनीत लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर अगदीच कमी कामगार कामावर होते आणि त्यामुळेच तेथील यंत्रसामग्रीची देखभाल कशा प्रकारे होत असेल, याची कल्पना करता येऊ शकते. शिवाय, आता काही उद्योगांची चाके पुन्हा भिरभिरू लागण्याची शक्‍यताही निर्माण झाल्यामुळे या प्रकल्पातही तशी प्रारंभीची जुळवाजुळव सुरू झाली असणार. कोणत्याही रासायनिक प्रकल्पाला प्रदीर्घ काळच्या बंदीनंतर पुन्हा गती द्यायची असेल, तर तेव्हा तेथे अशा प्रकारची गळती होण्याच धोका असतो, असे तज्ज्ञ सांगतात.

मग त्याविषयी पुरेशी काळजी का घेतली गेली नाही? आता या कंपनीकडे प्रदूषण नियंत्रणासंबंधातील प्रमाणपत्रही नसल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, ही दुर्घटना न घडती, तर त्याविना हा कारखाना सुखेनैव सुरू राहिला असता. विविध परवान्यांविना असे छोटे-मोठे कारखाने आपल्या देशात शेकडोनी सुरू आहेत. त्यामुळेच विशाखापट्टणम  येथील दुर्घटनेलाही कंपनीचे व्यवस्थापन आणि सरकारी यंत्रणा यांची अनास्था कारणीभूत आहे. अवघ्या २४ तासांच्या अंतराने घडलेल्या या दोन दुर्घटनांशिवाय या ‘कोरोना’ग्रस्त  काळात आणखीही काही अशाच दुर्दैवी घटना घडल्या  आहेत. याच काळात छत्तीसगडमध्ये एका कागदाच्या कारखान्यात वायूगळती झाली होती आणि अन्य एक कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला होता. विशाखापट्टणम येथील वायूगळतीमुळे भोपाळमध्ये १९८४ मध्ये युनियन कार्बाईडच्या प्रकल्पातील वायूगळतीमुळे घडलेल्या मोठ्या दुर्घटनेच्या स्मृती जागृत झाल्या. सुदैवाने विशाखापट्टणम येथील दुर्घटनेची व्याप्ती तितकी भयावह ठरली नसली, तरी कोरोना विषाणूच्या नियंत्रणात सर्वच प्रशासकीय  यंत्रणा गुंतून पडल्या असल्याचे कारण पुढे करून, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हा धडाही आपल्याला त्यामुळेच मिळाला आहे.

औरंगाबाद परिसरात घडलेली दुर्घटना मात्र अंगावर शहारे आणणारी आहे आणि ‘घरवापसी’च्या  ओढीमुळे लोहमार्गावर विसावा घेण्याच्या चुकीने ती घडली असली ,तरीही प्रशासनाला आपली जबाबदारी झटकून टाकता येणार नाही. या घटनेबद्दल पंतप्रधानांपासून सर्वांनी दु:ख  व्यक्‍त केले आहे आणि मृतांच्या नातेवाइकांना मदतही जाहीर झाली आहे. मात्र, आधीच दारिद्य्रात  खितपत पडणे नशिबी आलेल्यांच्या या दुर्दैवी कुटुंबीयांना कितीही मदत दिली, तरी घरातील कर्ता पुरुषच निघून गेल्यामुळे ती अपुरीच ठरणार.

‘कोरोना’मुळे जाहीर झालेली ठाणबंदीची मुदत सध्या १७ मे असली, तरी त्यानंतरही ती आणखी वाढवली जाणार, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आता केंद्र, तसेच राज्य सरकारांना या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर परप्रांतीय मजुरांच्या सुरक्षित ‘घरवापसी’बाबत काही ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत. अन्यथा, या विषाणूपेक्षा अन्यत्र होत असलेल्या हलगर्जीपणामुळेच आधीच हलाखीत असलेल्यांच्या जीवावरच बेतले जाण्याच्या घटना घडण्याचा धोका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com