अग्रलेख : संकल्पशक्तीचा ‘अवकाश’

अंतराळवीर बॉब बेनकेन आणि डग हर्ले
अंतराळवीर बॉब बेनकेन आणि डग हर्ले

लेट्स लाईट धिस कँडल... हे ५१ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेच्यावेळी ॲलन शेफर्ड यांनी उच्चारलेले शब्द `नासा`चा अंतराळवीर डग हर्ली याने उच्चारले व अवकाश संशोधन क्षेत्रातील नव्या युगाचा रविवारी प्रारंभ झाला. सरकारी नियंत्रणातील अमेरिकेच्या अवकाश मोहिमांनी `स्पेस एक्स`च्या माध्यमातून `मोकळेपणाचा` श्वास घेतला. चंद्रावर मानवाने पाऊल ठेवण्यासाठी पाठविण्यात आलेले यान ज्या तळावरून पाठविण्यात आले होते, त्याच तळावरून ‘स्पेसएक्स’ यानाने यशस्वी उड्डाण केले. 

अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ कंपनीने प्रक्षेपित केलेले ‘ड्रॅगन’ नावाचे यान २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत जाऊन पोहोचणारे पहिले खासगी अवकाशयान ठरले होते. ‘नासा’ने अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत नेणारी अवकाशयाने तयार करायचे कंत्राट स्पेस-एक्स आणि बोईंग या कंपन्यांना २०१४ मध्ये बहाल केले. तब्बल नऊ वर्षांच्या खंडाने अमेरिकेच्या भूमीवरून अमेरिकी अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची मालिका पुन्हा सुरू झाली. गेली सुमारे २१ वर्षे विविध देशांतील अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात वास्तव्य केले आहे. या यानाचा पहिला भाग रशियाने १९९० मध्ये प्रक्षेपित केला होता. तर त्याचे काम पूर्ण व्हायला दहा वर्षे लागली व २००० मध्ये अंतराळवीरांचा पहिला गट तेथे पोहोचला होता. तेव्हापासून अवकाश स्थानकातील वैज्ञानिक प्रयोगांची मालिका अखंडपणे सुरू आहे. आता या अवकाश स्थानकाचे आयुष्य संपत आले आहे. त्यामुळे रशियाने नवे स्थानक तयार करण्याची घोषणा दोनच दिवसांपूर्वी केली आहे.

शास्त्रीय संशोधनाव्यतरिक्त भविष्यातील चंद्र, मंगळ व इतर ग्रहांवरील मोहिमांसाठी प्रक्षेपण तळ म्हणून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचा उपयोग करता येईल का यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या मोहिमांसाठी इलॉन मस्क यांच्या कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. अवकाश मोहिमांना यापूर्वी अनेकदा आणि आताही विरोध होत आहे. आपल्याकडील समस्या सोडवण्यासाठी खर्च करण्याऐवजी या फुकाच्या अवकाश मोहिमा हव्यात कशाला, अशी टीकाकारांची भूमिका असते. अमेरिकेची अपोलो मोहीम, स्पेस शटल मोहीम  या अर्थकारण आणि राजकारणाचा बळी ठरल्या. प्रचंड खर्चाचे कारण देऊन  २०१०मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘नासा’ची २०२० मधील चांद्रमोहीम रद्द केली. काही काळ अमेरिकेच्या मोहिमा थंडावल्या तरी इतर देशांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील मोहिमा सुरू ठेवल्या होत्या.

विज्ञानाच्या सर्व शाखांमधील संशोधन तिथे सुरू होते. गुरुत्वाकर्षणरहित अवस्थेत पहिली वनस्पती उगविल्याचे याच काळात दिसून आले. औषधांच्या चाचण्या प्रत्यक्ष मानवावर करण्यापूर्वी त्या यंत्रमानवावर किंवा मानवासारखा प्रतिसाद देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक चिपवर करण्याचे तंत्रज्ञान आता विकसित होत आहे. अशा चाचण्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात करता येऊ शकतात. अमेरिकेचा अवकाश कार्यक्रम गेली काही वर्षे थंडबस्त्यात असला तरी रशियाचा कार्यक्रम सुरू होता. सामानाची ने-आण करण्यासाठी त्यांनी इलॉन मस्क यांच्याच स्पेस-एक्स या कंपनीची मदत घेतली.

स्पेस-एक्स च्या ‘क्रू ड्रॅगन डेमो २’ या यानातून बॉब बेनकेन आणि डग हर्ले हे अमेरिकेचे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पोहोचले. त्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षण २०००मध्ये सुरू झाले होते. दोघांनीही यापूर्वी दोनदा अवकाश प्रवास केला आहे. परंतु ते ज्या यानांमधून गेले त्यात आणि ‘क्रू ड्रॅगन’मध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. पारंपरिक अंतराळ यानात असलेली शेकडो बटणे, अनंत प्रकारचे आकडे दर्शवणाऱ्या लहान-मोठय़ा तबकडय़ा या साऱ्यांचा समावेश ड्रॅगनच्या आराखड्यात नाही.

अंतराळवीरांना बसण्यासाठी असलेल्या जागेच्या वरील भागात तीन टचस्क्रीन आहेत. सर्व कामे संगणकामार्फत होणार आहेत. स्पेस सूटमध्येही बदल करण्यात आले आहेत. ‘क्रू ड्रॅगन’मध्ये प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांची अनेकदा कोरोना टेस्ट झाली आहे. सुमारे वीस आठवडे या दोघांनी आणि त्यांच्या साहाय्यकांनी आयसोलेशनमध्ये काढले आहेत. अंतराळ प्रवासाचा खर्च कमी करणे आणि मंगळावर मानवी वस्ती वसविण्यासाठी प्रयत्न करणे या उद्देशांनी  ‘स्पेस एक्स’  कंपनी सुरू झाली होती. यासाठी विविध प्रकारच्या यानांवर आणि अग्निबाणांच्या विकसनावर कंपनी काम करते. एका अंतराळवीराला अवकाशात पाठविण्यासाठी अमेरिकेच्या बोईंग स्टारलाइनर कंपनीला ९ कोटी डॉलर, रशियाच्या सोयुझ यानाला ८.६ कोटी डॉलर तर `स्पेस एक्स’च्या क्रू ड्रॅगनला ५.५ कोटी डॉलर खर्च येतो असा दावा करण्यात येत आहे.

परंतु, हा खर्च आणखी कमी करून सर्वसामान्य नागरिकांना अवकाश पर्यटनाला पाठविण्याचे `स्पेस एक्स`चे स्वप्न आहे. एकूणच कोरोनाने झाकोळलेल्या वातावरणात मानवी संकल्पशक्तीला उजाळा देणारी ही घटना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com