esakal | अग्रलेख : क्रिकेटचीच ‘कसोटी’ !
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket

कोरोना विषाणूच्या जगभरातील थैमानानंतर सारे जग गेले दोन-अडीच महिने ठप्प होऊन गेले असताना, मग क्रीडा विश्‍वालाही तंबूतच बसून राहावे लागणे, यात नवल नव्हते. मात्र, आता अनेक देश लॉकडाउनचे रूपांतर ‘अनलॉक’मध्ये करत असतानाच, वेस्ट इंडीजचा संघ पाच दिवसांच्या कसोटी मालिकेसाठी क्रिकेटच्या माहेरघरात म्हणजेच इंग्लंडमध्ये डेरेदाखल झाला आहे!

अग्रलेख : क्रिकेटचीच ‘कसोटी’ !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोना विषाणूच्या जगभरातील थैमानानंतर सारे जग गेले दोन-अडीच महिने ठप्प होऊन गेले असताना, मग क्रीडा विश्‍वालाही तंबूतच बसून राहावे लागणे, यात नवल नव्हते. मात्र, आता अनेक देश लॉकडाउनचे रूपांतर ‘अनलॉक’मध्ये करत असतानाच, वेस्ट इंडीजचा संघ पाच दिवसांच्या कसोटी मालिकेसाठी क्रिकेटच्या माहेरघरात म्हणजेच इंग्लंडमध्ये डेरेदाखल झाला आहे! एकीकडे कसोटी क्रिकेटला उतरती कळा लागलेली असताना आणि आता यापुढे पाच दिवसांच्या सामन्यांना काही भवितव्य आहे काय, अशी चर्चा सुरू असतानाच क्रिकेटचे ‘पुनश्‍च हरी ॐ!’ कसोटी सामन्यांनी सुरू व्हावे, हा खरे तर काव्यगत न्यायच. ‘कोरोना’च्या सावटात क्रिकेटच नव्हे, तर सर्वच मैदानी खेळ प्रेक्षकांविना खेळवावेत काय, यासंबंधात मन:पूत चर्चा झडल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्रिकेट हा जगभरातील हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच देशांमधील खेळ असला, तरी याच ‘खेळा’ने या देशातील क्रिकेटपटूंना मालामाल करून सोडले. मात्र, ते ‘सभ्य माणसांचा खेळ’ म्हणून जगभरात प्रसिद्धी मिळवणाऱ्या कसोटी क्रिकेटला वाऱ्यावर सोडून स्टेडियममध्ये रंगबिरंगी सर्कशी उभ्या केल्यामुळेच हे विसरून चालणार नाही. झटपट आणि बहुरंगी क्रिकेटच्या या प्रसारामुळे लागलेल्या ओहोटीत कसोटी सामन्यांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि ही फिरवलेली पाठच आता मदतीला घेऊन इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज ही मालिका होऊ घातली आहे. आधीच या कसोटी सामन्यांना शे-पाचशे प्रेक्षकही गोळा होत नव्हते आणि तिकीटबारीवर जमा होणारा गल्लाही अगदीच किरकोळ असे. मात्र, आता क्रिकेटला पुनर्जन्म देतानाच प्रेक्षकांची कसोटी सामन्यांबाबतची दूरस्थता हाच कळीचा मुद्दा ठरलेला दिसतो! त्यामुळे प्रेक्षागारात दोघांमध्ये सहा फूटच नव्हे, तर थेट साठ फूट अंतर सोडता येणे शक्‍य होणार आहे. त्यामुळेच अखेर ‘कोरोना’चा फैलाव पूर्णपणे आटोक्‍यात आणणे तर सोडाच, तो वाढता असतानाही हा मैदानी खेळ सुरू होणार आहे.

अर्थात ‘कोरोना’चे सावट अंगांगावर घेऊन हा खेळ नव्याने सुरू करताना, त्यातील नियमावलीतही अनेक धक्‍कादायक असे बदल करण्यात आले आहेत आणि त्याची चर्चा आता प्रदीर्घ काळ सुरू राहणार आहे. क्रिकेट हा असा एकमेव खेळ आहे, की त्यातील जय-पराजयाची शक्‍यता ही मैदानाचे म्हणजेच विकेटचे स्वरूप आणि चेंडूची लकाकी यावर क्रिकेटपटूंच्या कौशल्यापेक्षा अधिक अवलंबून असते. त्यामुळेच ही चेंडूची लकाकी टिकवण्यासाठी त्याला लाळ लावण्याचे प्रकार आपण कायम बघत आलो आहोत. पण ही कृती ‘कोरोना’ काळात सर्वात धोकादायक ठरू शकते, हे लक्षात आल्यामुळे असा प्रकार फक्‍त एक-दोनदाच होऊ शकेल आणि त्यानंतरही गोलंदाजाने तसा प्रकार सुरूच ठेवल्यास, त्या संघाला पाच धावांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्याचबरोबर अन्य काही खेळांप्रमाणेच आता कसोटी क्रिकेटमध्येही कोणी खेळाडू आजारी पडल्यास, बदली खेळाडू मैदानात उतरवता येणार आहे. मात्र याचा अर्थ स्पष्ट आहे. सोन्याची अंडी देणारी ही कोंबडी जिवंत राहावी म्हणून येनकेन प्रकारेण, मरू घातलेल्या कसोटी क्रिकेटच्या माध्यमातूनच या खेळाला संजीवनी देण्याचा हा प्रकार आहे. 

क्रिकेटचे अर्थकारण हे अन्य कोणत्याही खेळापेक्षा वेगळे आहे आणि त्यामुळेच मैदानातील प्रेक्षकांनी जमवलेल्या गल्ल्यापेक्षाही त्याच्या प्रक्षेपणाचे हक्‍क विकण्यातच संयोजकांना खरा रस असतो. त्याचे कारण अर्थातच घरबसल्या या खेळाची मौज लुटू पाहणाऱ्या प्रेक्षकांवर होणाऱ्या मैदानातील, तसेच टीव्हीच्या छोट्या पडद्यावरील वारेमाप जाहिराती हेच असते. त्यामुळेच आता ‘कोरोना’ने आणलेल्या या भयाच्या लाटेत घरीच बसणे सक्‍तीचे झालेले किमान गेल्या पिढीतील ‘ज्येष्ठ’ प्रेक्षक तरी या कसोटी मालिकांना प्रतिसाद देतील, याच आशेपोटी हा खेळ लावण्यात आला आहे. खरे तर वेस्ट इंडीजचे क्रिकेटविश्‍व ‘कोरोना’च्या या आक्रमणामुळे भलतेच डबघाईला आले आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या मानधनात ५० टक्‍के कपात करण्यात आली होती.

शिवाय ‘कोरोना’च्या भीतीच्या सावटामुळे हे खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यास तयार नव्हते. मात्र, त्यांना पाच-पाच हजार पौंड जादा मानधनाचे आमिष दाखवून या दौऱ्यासाठी तयार करण्यात आले असल्याने या खेळाडूंचे खरे प्रेम कशावर आहे, तेही उघड झाले. अर्थात आता हा दौरा झाला आणि क्रिकेटचा पुनर्जन्म झाला, अशा भ्रमात कोणी राहता कामा नये; कारण क्रिकेटचा प्राण आता ‘ट्‌वेंटी-२०’ आणि एकदिवसीय सामन्यांतच अडकला आहे. त्यामुळे क्रिकेटचे भवितव्य आता यंदाच्या ‘ट्‌वेंटी-२० वर्ल्ड कप’बाबत काय निर्णय होतो, यावरच अवलंबून आहे. शिवाय, ही मालिका रद्द झाल्यास त्याच काळात ‘आयपीएल’ची सर्कसही मैदानात उतरवता येऊ शकेल. मैदानातील क्रिकेट जगणार की अस्तंगत होणार, याचा ‘अर्थपूर्ण’ निकाल तेव्हाच लागू शकतो!

loading image