अग्रलेख : ‘मूर्ती’मंत भीती उभी...

America-Statue
America-Statue

‘कालौघात अनेक धर्मांनी, राष्ट्रांनी आपापल्या प्रेषितांचे, पुढाऱ्यांचे भव्य पुतळे उभारले. बघणाऱ्याला ‘तू क्षुल्लक आहेस’ याची जाणीव करून देणारे हे पुतळे असतात. खरे तर त्याच्यासाठी पुतळ्यांची गरज नाही. आभाळाकडे एक नजर टाकली तरी पुरेसे होते...’ प्रख्यात विचारवंत आणि विज्ञानलेखक कार्ल सेगन यांनी ‘ईश्वराच्या शोधात’ या आपल्या निबंधमालेत हे वाक्‍य लिहून ठेवले होते. सेगन यांचे हे वाक्‍य आठवण्याचे कारण अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या पुतळेफोडीचे सत्र.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जॉर्ज फ्लॉइड नावाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीला मिनिआपोलिस शहरात एका गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याने मानेवर गुडघा दाबून घुसमटून मारले. या घटनेने वर्णविद्वेषी धोरणामुळे खदखदत असलेला असंतोष लाव्हासारखा बाहेर आला आणि वर्णभेद आणि गुलामगिरीविषयीच्या संतापाला त्याने वाट मोकळी करून दिली आणि त्याचीच परिणती म्हणजे काही जणांचे मूर्तिभंजन. अमेरिकेच्या उत्थानाचे शिल्पकार म्हणून शतकानुशतके गौरवल्या गेलेले नेते, धुरीण, संशोधक आणि उमरावांचे पुतळे धडाधड फुटू लागले आहेत. गेल्या आठवड्याभरात किमान डझनभर पुतळे सामूहिक संतापाला बळी पडले आहेत. अमेरिका नावाचे ‘नवे जग’ शोधून काढणाऱ्या इटालियन दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस याचे व्हर्जिनिया, बोस्टन आणि मायामीमधले पुतळे खाली खेचण्यात आले किंवा त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. या कोलंबसाने अमेरिकेच्या भूमीत पाय ठेवल्यानंतरच स्थानिक कृष्णवर्णीय रहिवाशांची ‘निग्रो’ ही संभावना सुरू झाली आणि एका नष्टचर्यालाही सुरुवात झाली, या भावनेने अमेरिकेतील कित्येक नागरिक कोलंबसाच्या नावाने बोटे मोडत असतात. यादवीच्या काळात अमेरिकी संघराज्याचे अध्यक्षपद भूषविणारे जेफर्सन डेव्हिस यांचा रिचमंड येथील पुतळा खाली खेचण्यात आला. ही चारेक वर्षे अमेरिका यादवीत होरपळून निघाली होती.

दक्षिणेतील काही राज्यांनी गुलामगिरीची प्रथा वाचवण्यासाठी मोठा लढा उभारला होता. या दक्षिणी राज्यांच्या कंपूला ‘कॉन्फेडेरसी’ असे संबोधन आहे. डेव्हिस यांचे पुतळे त्याच शोषणकाळाची, गुलामगिरीची आठवण करून देतात, असा आंदोलकांचा दावा आहे. असे किमान सातशेहून अधिक पुतळे आंदोलकांच्या ‘हिट लिस्ट’वर आहेत आणि येत्या काळात या पुतळ्यांचा सोक्षमोक्ष लागेलच; परंतु या निमित्ताने अमेरिकाच नव्हे, तर जगभरातच, वंशवादाची दुखरी आणि जुनीपुराणी जखम पुन्हा एकदा भळभळू लागली आहे, हे खरेच.

कोरोना विषाणूने सारे जग पार भुईसपाट केलेले असताना असले वंशवादाचे कालबाह्य मुद्दे खरे तर पुढे यायलाच नको होते; पण चिन्हे, प्रतीके आणि पुतळे हे इतिहासापुरते राहात नाहीत, ते वर्तमानकालीन संघर्षाचेही भाग बनतात. इतिहासात झालेल्या अन्याय, अत्याचारांबद्दलचा राग मनात ठसठसत असणे अगदी स्वाभाविक असते. त्यामुळे त्या रागाला वाट मोकळी करून देण्यापुरता असा या प्रतीकात्मक कृतींचा अर्थ असला तरी समता आणि मानवी हक्कांची पुनःस्थापना यासाठी काळाला अनुरूप असेच प्रयत्न करावे लागतील; अन्यथा पुतळे कोसळतात पण संस्थात्मक जीवनात मुरून बसलेला वर्णाधारित सापत्नभाव तसाच राहतो आणि मूळ मुद्याला बगल देणे सत्ताधीशांना, प्रस्थापितांना सोपे जाते. वंशवाद खरोखर कालबाह्य झाला आहे की अजूनही तो घातक विषाणूसारखाच अदृश्‍यपणे आपले जीवघेणेच खेळ दाखवतो आहे? हा खरा सवाल आहे. त्यातच अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. वर्णविद्वेषाचा भूमिगत लाव्हाप्रवाह भूपृष्ठावर आला आहे आणि साहजिकच अस्मितांचे एक निराळेच राजकारण हळूहळू निवडणुकीचे अवकाश व्यापताना दिसू लागले आहे.

अस्मितांचे राजकारण हा नेतेमंडळींना नेहमीच फावणारा विषय असतो, हे वेगळे सांगायला नकोच. अमेरिकेतली ही प्रतीके जमीनदोस्त होत असतानाच आपल्याकडे तमिळनाडूतून एक बातमी आली. तिथल्या जवळपास हजारेक गावांची ‘वसाहतवादी’ नावे बदलून त्यांचे प्रादेशिक बारसे करण्यात आले. इंग्रजांच्या काळात या गाव वा जिल्ह्यांची नावे ‘साहेबां’नी आपल्या सोयीने ठेवली आणि त्याची स्पेलिंगदेखील बदलली.

तमिळनाडू सरकारने ही नावे बदलून प्रादेशिक अस्मितेवर फुंकर घातली आहे. आता वेल्लोरचे वीलूर, आणि नागरकॉईलचे नगेरकोविल झाले आहे, कोइम्बतूरचे कोयमपुत्तुर झाले आहे आणि तुतिकोरिनचे तुतुक्कोडी झाले आहे. ‘नावात काय आहे?’ या विचारून विचारून गुळगुळीत झालेल्या शेक्‍सपीअरी सवालाचे राजकीय उत्तर मात्र ‘बरेच काही’ असेच द्यावे लागते. अमेरिकेतले पुतळे वर्णविद्वेष आणि वसाहतवादाची प्रतीके ठरली, भारतातल्या गावांची नावेही तशीच वसाहतवादाची प्रतीके आहेत. ती बदलून किंवा नष्ट करून ना वर्णविद्वेषाचे विष निष्प्रभ होते, ना वर्चस्ववादाला ओहोटी लागते. निवडणुका तेवढ्या जिंकल्या वा हरल्या जातात. पुतळ्यांसारखी प्रतीके एरवी हारतुऱ्यांचे धनी असतात. प्रसंगी संतापाचेही कारण बनतात आणि प्रसंगी भयदेखील निर्माण करतात. असे होते याचे कारण इतिहासाकडे नेमके कसे पाहायचे, याच्याविषयीच्या स्पष्टतेचा अभाव; पण मुद्दा आहे इतिहासातून धडे घेऊन आजचे जग सुंदर करण्याचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com