esakal | अग्रलेख : मन काळोखाची गुंफा
sakal

बोलून बातमी शोधा

Sushantsinh

‘आसवांमधून बाष्पीभूत होणारा धूसर भूतकाळ आणि स्वप्नांच्या अनंत मालिकांनी ओढलेली लांबलचक स्मितरेषा... यामध्ये वाटाघाटी करणारं अधांतरी आयुष्य....’ या गूढ ओळींसोबत दिसणारी व्हिन्सेट व्हॅन गॉफ (गॉग)च्या सुप्रसिद्ध ‘स्टारी नाइट्‌स’ या अतिगूढ चित्राची तसबीर. वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी आयुष्य संपवणारा उगवता सितारा सुशांतसिंह राजपूत याच्या ‘इन्स्टाग्राम’ अकौंटवरचा हा मजकूर बरेच काही व्यक्त करणारा आणि त्याहूनही अधिक बरेच काही अव्यक्त ठेवणारा असा आहे.

अग्रलेख : मन काळोखाची गुंफा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘आसवांमधून बाष्पीभूत होणारा धूसर भूतकाळ आणि स्वप्नांच्या अनंत मालिकांनी ओढलेली लांबलचक स्मितरेषा... यामध्ये वाटाघाटी करणारं अधांतरी आयुष्य....’ या गूढ ओळींसोबत दिसणारी व्हिन्सेट व्हॅन गॉफ (गॉग)च्या सुप्रसिद्ध ‘स्टारी नाइट्‌स’ या अतिगूढ चित्राची तसबीर. वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी आयुष्य संपवणारा उगवता सितारा सुशांतसिंह राजपूत याच्या ‘इन्स्टाग्राम’ अकौंटवरचा हा मजकूर बरेच काही व्यक्त करणारा आणि त्याहूनही अधिक बरेच काही अव्यक्त ठेवणारा असा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा काहीसा गूढ मजकूर ‘इन्स्टाग्राम’वर टाकून सुशांतसिंह राजपूतने नि:शब्दपणे आपले आयुष्य संपवले. यश, कीर्ती, पैसा, तारुण्य असे सारे जे जे जीवनात कायमस्वरूपी असायला हवे असे वाटते, ते ते सारे गाठीशी असताना अचानक स्वत:च, आयुष्याचा दोर कापून टाकण्यासाठी काय मोठेसे कारण असेल? या सवालाने साऱ्यांनाच अस्वस्थ केले.

सध्या कोरोना विषाणूच्या महासाथीने सारेच मानवी जीवन क्षणभंगुर ठरवले आहे. त्याच काळात सुशांतसिंहसारख्या तेजतर्रार युवकाने नैराश्‍याच्या गर्तेत स्वत:ला झोकून देणे अधिक वेदनादायी आणि अधिक अस्वस्थ करणारे वाटते. प्राथमिक पोलिस चौकशी आणि शवविच्छेदन अहवालातील नोंदी पाहता ही आत्महत्या होती, हे उघड झालेच आहे.

त्यामागील कारणे यथावकाश कळतीलही; पण सुशांतसिंहचा मृतदेह शवविच्छेदनाच्या मेजावर जाण्यापूर्वीच समाज माध्यमे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांनी चालवलेले त्याचे विच्छेदन बीभत्स नि संवेदनाशून्य होते, असे म्हटले पाहिजे. कुण्या एका सिताऱ्याने मनाच्या विकल अवस्थेत टोकाचे पाऊल उचलले, तर त्याच्या मानसिक, आर्थिक बाबींची जाहीर उठाठेव करण्याचा अधिकार आपल्याला कोण देते? हा सारासार विवेकाचा मुद्दाच सगळीकडून गायब झाला. सुशांतसिंह याच्या माजी व्यवस्थापक युवतीने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या कशी केली होती, इथपासून त्याच्या राहत्या घराचे भाडे साडेचार लाखांच्या घरात कसे होते, इथवर बरेच काही उपसले गेले. गेले सहा महिने तो नैराश्‍याच्या समस्येशी झुंजत होता आणि त्यासाठी तो औषधेदेखील घेत होता, अशी माहितीही पुढे आली. या साऱ्यात तथ्य असेल किंवा नसेलही. परंतु, त्याबद्दल अहर्निश सुरू असलेल्या प्रतिक्रिया मात्र समाज म्हणून आपण किती अप्रगल्भ आहोत, याची साक्ष देणाऱ्या आहेत.

सिनेमावेड्यांच्या आपल्या देशात चित्रपटसितारे देवादिकांपेक्षा थोड्याशा खालच्या पायरीवर असतात इतकेच. त्यांची भव्य प्रतिमा, दर्शन, यश-अपयश, परदेशी मोटारी आणि आलिशान राहाणी, ग्लॅमरचे वलय, प्रेमप्रकरणे, नातीगोती अशा कितीतरी गोष्टी सार्वजनिक मालमत्ता बनून जातात. चाहत्यांच्या भक्तिभावात तो सितारा अष्टौप्रहर न्हात असतो आणि आपले वलय शाबूत ठेवण्यासाठी आटोकाट धडपडत असतो. पण हा झाला दृश्‍य भाग! प्रत्यक्षात तो सितारा जीवनाचे कुठले भोग भोगतो आहे, हे कुणाच्या गावीही नसते. दुर्दैवाने आपल्या उत्कट प्रतिमेच्याच प्रेमात पडलेले तारे-सितारे नार्सिसससारखे कळत नकळत आपल्याच प्रतिमेची शिकार होतात. 

गेल्या शतकात, पन्नाशीचे दशक गाजवणारी जगविख्यात अभिनेत्री मेरलिन मन्रोपासून रॉबिन विल्यम्सपर्यंत कितीतरी उदाहरणे देता येतील. भारतातदेखील याची उदाहरणे कमी नाहीत. अर्ध्यातच हार मानणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींची संख्या कमी नाही, पण कितीतरी उद्योजक, बिल्डर, शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी याच मार्गाने आपले जीवित संपवून गेल्याच्या बातम्या येत असतात. ‘अपयश आले म्हणून आत्महत्या करायची नसते’, असा साधासोपा संदेश देणारा ‘छिछोरे’ हा नुकताच येऊन गेलेला चित्रपट सुशांतसिंहनेच अभिनित केला होता. जीवनसन्मुख राहण्यातच खरे शहाणपण आहे, हे सामान्यजनांना हळूवार पटवून देणारा सुशांत स्वत: मात्र जीवनाकडे पाठ फिरवून निघून गेला, ही अस्वस्थ करणारी बाब आहे. अपयश पचविता आले पाहिजे, असे नेहेमीच सांगितले जाते, पण यशही नीट पचविता आले पाहिजे, हेही शिकण्याची गरज आहे.

संघर्षात टिकून राहण्यासाठी आधी जिवंत असणे ही मूलभूत गरज असते. संघर्षाच्या काळात मन सकारात्मक आणि जीवनाभिमुख ठेवणे, हे सोपे नसतेच. निराशेच्या गर्तेत गंटागळ्या खाणाऱ्याला ‘तुझ्यासारख्यानं असं वागावं का?’, ‘हे तुझ्या मनाचे खेळ आहेत!’, ‘हे दिवसही जातील’, किंवा ‘आम्हाला वाटलं होतं की तू खूप कणखर आहेस’ अशा छापाची समुपदेशने करणे सोपे असते; विशेषत: निराशेने ग्रासलेली व्यक्ती नेमके काय भोगते आहे, याचा गंधही नसताना तर फारच सोपे! म्हणूनच त्याची सामाजिक तिठ्यावर जाहीर चर्चा करणे उचित नसते. नेमके तेच घडले. ‘मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल...मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा... आधार कसा शोधावा?’ या कविवर्य सुधीर मोघे यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे मनाचा थांग लागणे कठीण. पण विवेकाची जोड दिली तर हेच मन दावेदार न बनता, आपले सवंगडी होऊन जाते. पण मैत्र जमले नाही, तर व्हॅन गॉफच्या चित्रासारखे ते गूढ, तुटक आणि अव्यक्त होत जाते. व्हॅन गॉफनेदेखील आत्मघातानेच जीवन संपवले होते. सुशांतसिंह राजपूतच्या जाण्याने हे मनाशी असलेल्या मैत्रकाचे महत्त्व पुन्हा एकवार अधोरेखित झाले. जीवनाच्या बहुमोलतेची जाणीव आणखी प्रखर झाली. कोरोना विषाणूच्या विश्वव्यापी थैमानात ही जाणीवच आधार बनून राहावी.

loading image