esakal | अग्रलेख : वारसा अन्‌ आरसा
sakal

बोलून बातमी शोधा

hagia sophia

‘कोरोना’ साथीच्या या काळात मंदिर, मशीद, चर्च किंवा गुरूद्वारा सोडून देव रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करायला डॉक्‍टरांच्या रूपात उतरले, अशा भावविभोर संदेशांनी सोशल मीडिया ओसंडून वाहतोय. वर्षानुवर्षे-शतकानुशतके आपण ऐकत आलो की परमेश्‍वर दगडविटा-सिमेंटच्या इमारतीत नव्हे, तर रंजल्यागांजल्यांना आपुले म्हणणाऱ्यांच्या रूपात असतो. संत कबीरांनी तर गुरूज्ञानाचा महिमा वर्णन करताना, ‘कहै कबीर मैं पूरा पाया, सब घटि साहब दीठा’, अशा शब्दांत चराचरांत देव दिसू लागल्याचा दृष्टांत सांगितला.

अग्रलेख : वारसा अन्‌ आरसा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘कोरोना’ साथीच्या या काळात मंदिर, मशीद, चर्च किंवा गुरूद्वारा सोडून देव रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करायला डॉक्‍टरांच्या रूपात उतरले, अशा भावविभोर संदेशांनी सोशल मीडिया ओसंडून वाहतोय. वर्षानुवर्षे-शतकानुशतके आपण ऐकत आलो की परमेश्‍वर दगडविटा-सिमेंटच्या इमारतीत नव्हे, तर रंजल्यागांजल्यांना आपुले म्हणणाऱ्यांच्या रूपात असतो. संत कबीरांनी तर गुरूज्ञानाचा महिमा वर्णन करताना, ‘कहै कबीर मैं पूरा पाया, सब घटि साहब दीठा’, अशा शब्दांत चराचरांत देव दिसू लागल्याचा दृष्टांत सांगितला. असे असले तरी माणसानेच ज्याची निर्मिती केली, त्या परमेश्‍वरासाठी प्रार्थनास्थळ ही राजकारणाची गरज आहे आणि साथसंसर्गामुळे लाखो माणसांचे जीव जात असतानाही जगात प्रार्थनास्थळाचे राजकारण नव्याने बाळसे धरत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बऱ्याच देशांमध्ये आधीच धर्मज्वर होता, पण, आता एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगाला धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा मार्ग दाखवणारा, महिलांना मताधिकार देणारा तुर्कस्तानही काळाची चक्रे उलटी फिरविण्याचा प्रयोगात सहभागी झाला आहे. रविवारी इस्तंबूलच्या जगप्रसिद्ध ‘हागिया सोफिया’ वारसास्थळातून, ८६ वर्षांनंतर अजानचे सूर आसमंतात पसरले. तीन दिवसांपूर्वी तुर्कस्तान सरकारने सहाव्या शतकातल्या या जागतिक वारसास्थळाला पुन्हा मशिदीचा दर्जा बहाल केला. आधी न्यायालयाने तसा निकाल दिल्यानंतर अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी ‘हागिया सोफिया’ ही प्राचीन वास्तू यापुढे मशीद असेल, असे घोषित केले.  

केवळ चर्चचे रूपांतर मशिदीत झाले म्हणून जगाला धक्‍का बसला असे नाही. मुस्लिम जगातल्या कडवेपणापासून स्वत:ला प्रयत्नपूर्वक दूर ठेवणाऱ्या तुर्कस्तानात हे घडणे अधिक धक्‍कादायक आहे. मुस्तफा केमाल जे पुढे अतातुर्क म्हणजे राष्ट्रपिता झाले,

पहिल्या महायुद्धातील सहभागामुळे पाशा ही सेनापतीसारखी उपाधी त्यांना मिळाली आणि ‘केमाल पाशा’ नावाने जगाच्या इतिहासात उदारमतवादी राज्यकर्ता म्हणून गाजले, त्यांनी आधुनिक तुर्कस्तानचा पाया घालताना ‘हागिया सोफिया’सारख्या प्राचीन वास्तूंना नवी ओळख दिली. १९३५ पासून ही देखणी इमारत संग्रहालय बनली. माणसांना धर्मांधतेकडे घेऊन जाणाऱ्या ऐतिहासिक खाणाखुणांची ओळख पुसट करण्याचा तो प्रयत्न होता व त्यातून इस्तंबूलची ऑटोमन राजगादीही सुटली नाही. 

केमाल पाशा यांनी पाया घातलेल्या तुर्कस्तानला जगात आणखी उंचीवर नेण्याच्या आणाभाका घेऊन अठरा वर्षांपूर्वी सत्तेवर आलेले अध्यक्ष एर्दोगान यांनी ‘हागिया सोफिया’ ही मशीद घोषित करताना देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मात्र मात्र एकदाही केमाल पाशा यांचे नाव घेतले नाही. थोडक्‍यात, त्यांनी केमाल पाशाचा वारसा सोडून दिला व ऑटोमन राज्यकर्त्यांची वाट धरली. ‘हागिया सोफिया’ ही जगाच्या वास्तूकलेला वेगळे वळण देणारी बायझेंटाइन शैलीची प्राचीन वास्तू. हे मूळचे कॅथेड्रल किंवा चर्च. कॉन्स्टॅटिनोपालच्या पाडावानंतर ऑटोमन किंवा ओस्मानिया राजवट स्थापन झाल्यानंतर नव्या राज्यकर्त्यांनी १४५३ मध्ये ती मशीद असल्याचे घोषित केले. पुढची उणीपुरी पाचशे वर्षे ती मशीद राहिली. वर्षभरापूर्वी तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांनी एका भाषणात ‘हागिया सोफिया‘ला मशिदीचा दर्जा देण्याचा जुना मुद्दा पुढे आणला.

धर्मनिरपेक्ष उदारमतवादी राजकारणामुळे घुसमट होत असलेले कडवे धर्माभिमानी त्यामुळे सुखावले. हे लवकर करा, अशी मागणी झाली आणि न्यायालय, मंत्रिमंडळ असा प्रवास करीत इतिहासाचे चक्र पंधराव्या शतकात नेऊन ठेवण्यात आले. जगभरातल्या चर्चच्या संघटनेने, पोप फ्रान्सिस यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असून, जगभरातून तुर्कस्तानवर टीका होत आहे. ‘नोबेल’ विजेते लेखक ओरान पामुक यांनीही नाराजी व्यक्‍त केली आहे. धर्मावर आधारित राजकारणाची गरज एर्दोगान यांना का वाटली असावी, यावर चर्चा सुरू आहे. असे मानले जाते, की गेल्या वर्षी इस्तंबूल व अंकारा महापालिकांच्या निवडणुकीत सत्ताधारी एर्दोगान यांच्या ‘एके’ पक्षाचा पराभव झाल्याने आणि आता ‘कोविड-१९’ महामारीचा सामना करताना आलेले अपयश लपविण्यासाठी त्यांनी हा धर्मांधतेचा रस्ता धरला असावा.  

‘हागिया सोफिया‘चे मशिदीकरण हा जगभरातल्या नव्या राजकारणाचा आरसा आहे. माणसांचे जीव वाचविण्यात किंवा त्यांचे जगणे सुखकर, सुंदर बनविण्यात येणारे अपयश झाकण्यासाठी धार्मिक भावनांचा कसा आधार घेतला जातो, हे जगात अनेक ठिकाणी दिसत आहे.कदाचित अनेकांना आवडणार नाही, पण हे प्रकरण आपल्याकडील मंदिर-मशीद वादासारखेच आहे. ‘हागिया सोफिया‘चा दर्जा बदलतानाही धर्मभावना, राजकारण, न्यायालय असाच प्रवास झाला. आताच्या प्रकरणात आशेचा किरण एवढाच, की तरुण पिढीला अशी मध्ययुगीन मानसिकता मान्य नाही. कदाचित ते या प्रकारचे राजकारण निष्प्रभ करतील.  

Edited By - Prashant Patil

loading image