esakal | अग्रलेख : शिकण्याचे दिवस !
sakal

बोलून बातमी शोधा

Learning

‘नेमेची येतो’ या न्यायाने विविध परीक्षांच्या निकालांचा मोसम सुरू झाला आहे. ‘सीबीएसई‘ने दहावीचे निकाल जाहीर केले असून, शालान्त परीक्षा मंडळाने बारावीचे निकाल जाहीर केले आहेत. लवकरच या मंडळाचे दहावीचेही निकाल जाहीर होतील. उत्तीर्णांच्या टक्केवारीचा चढता आलेख आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या दिशेने चाललेली वाटचाल आशा उंचावणारी म्हणता येईल.

अग्रलेख : शिकण्याचे दिवस !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘नेमेची येतो’ या न्यायाने विविध परीक्षांच्या निकालांचा मोसम सुरू झाला आहे. ‘सीबीएसई‘ने दहावीचे निकाल जाहीर केले असून, शालान्त परीक्षा मंडळाने बारावीचे निकाल जाहीर केले आहेत. लवकरच या मंडळाचे दहावीचेही निकाल जाहीर होतील. उत्तीर्णांच्या टक्केवारीचा चढता आलेख आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या दिशेने चाललेली वाटचाल आशा उंचावणारी म्हणता येईल. पण या सगळ्यांवर असलेले ‘कोविड-१९’च्या संकटाचे सावट अगदी गडद असे आहे. या संकटाने सगळ्यांच्याच प्रवासाला ब्रेक लावल्याने त्यातून होणारे वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान अन्‌ वेदनांपासून कोणाचीच सुटका नाही; परंतु हाच काळ स्वतःकडे पुन्हा पाहण्याचा, स्वतःमध्ये बदल करण्याचाही आहे. त्या अर्थाने आलेला हा ‘संधी’काळच.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत तर हे जास्तच खरे आहे. त्यामुळेच आता परीक्षा केवळ विद्यार्थ्यांची नाही, तर शाळा, शिक्षक, पालक आणि धोरणकर्ते या सगळ्यांचीच आहे. मुख्य म्हणजे एकमेकांच्या सहकार्यानेच त्यांना ती पार करायची आहे. 

पहिले आव्हान आहे ते शाळांविना शिक्षणाचे. तसे ते चालू ठेवायचे तर तंत्रज्ञानाची मदत घेण्यास पर्याय नाही. त्यामुळेच ‘ऑनलाईन शिक्षण’ हा परवलीचा शब्द झाला आहे. अनेक कंपन्या या नव्या परिस्थितीचा फायदा उठवण्यास सरसावल्या आहेत. मुलांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून वेगवेगळी ‘सोल्युशन्स’ घेऊन त्या पुढे येत आहेत. पालकांनीही आता हे वास्तव स्वीकारले आहे; आणि त्यादृष्टीने तयारी सुरू  केली आहे.

मनुष्यबळविकास मंत्रालयाने काही मार्गदर्शक संहिता प्रसृत केल्या असून ‘स्क्रीन’पुढे प्राथमिक आणि माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त किती वेळ बसावे याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ते आवश्‍यक होतेच, पण तेवढ्यापुरता विचार करून भागणारे नाही. घरोघरी मोबाईल वा कम्पुटरच्या स्क्रीनसमोर बसून विद्यार्थी नेमके काय आणि कसे शिकणार आहेत, हा मुद्दा सर्वात कळीचा. स्क्रीनवर देखील तोच वर्गातला फळा त्यांना दिसत असेल, पूर्वीच्याच पद्धतीने महिती घोकून घेण्याची शैली अवलंबली जात असेल, तर हा नवा पर्यायदेखील ‘अनुत्तीर्ण’ होण्यास वेळ लागणार नाही. तंत्र नवे वापरायचे आणि शिक्षणाची पद्धत मात्र जुनीच ठेवायची, ही विसंगती आत्ताच्या घडीला घातक ठरेल. अशा एकरेषीय कथन-श्रवण प्रक्रियेने शिक्षणातील विद्यार्थ्यांचा रस कमी होण्याचा धोका आहे.

शिक्षण घरात बसून घ्यायचे आहे, याचा अर्थ ते फक्त स्क्रीनपुढे बसूनच घ्यायचे आहे, असा नव्हे. आपल्याला शिकायचे आहे ते हेच. हा उर्वरित वेळ किती अर्थपूर्ण रीतीने व्यतीत केला जातो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्या दोन्हीतली परस्परपूरकता विद्यार्थ्यांना खूप उपयोगी पडेल. शिक्षणात पालकांची भूमिका महत्त्वाची असते हे आजवर अनेकदा उच्चारले जाणारे सुवचन आता मात्र थेट पालकांच्या पुढ्यात येऊन उभे ठाकले असून, त्याला प्रतिसाद देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. तर नवकल्पनांचा उपयोग प्रत्यक्ष शिकवण्याच्या कामात करण्याची संधी शिक्षकांनाही चालून आली आहे. त्यांनी नेमके काय करायचे?

सुदैवाने अर्थपूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाविषयी महाराष्ट्रात वेगवेगळे प्रयोग करणारे अनेक कार्यकर्ते-अभ्यासक आहेत. आपापल्या भागात ते निष्ठेने काम करीत आहेत. पण त्यांचा शैक्षणिक विचार आणि कृती ही त्यांच्या कार्यक्षेत्रापुरती राहते आणि कितीही प्रकाशमय असली तरी ती बेटेच राहतात. पण आता त्या प्रयत्नांना सार्वत्रिक करण्याची संधी आहे. शिक्षण निव्वळ पाठ्यपुस्तकात बंदिस्त न राहता त्याला अनुभवाधारित शिक्षणाचे स्वरूप आता द्यावे लागेल. प्रत्यक्ष हाताने काम करण्यातून जो अनुभव मिळतो त्याचा उपयोग संकल्पना पक्‍क्‍या होण्यासाठी करता येतो. अशाच एका कार्यकर्तीने घरात करण्याजोग्या अनेक ‘शैक्षणिक कृतीं’चा आराखडा तयार केला असून, शालेय पातळीवर त्याचा उत्तम उपयोग होईल. उदाहरणार्थ चौथी, पाचवीसाठी घरच्या घरी तराजू करून त्याचा रोजच्या व्यवहारात नुसता वापर करून घेतला, तर कितीतरी संकल्पना मुलांना समजावून देता येतात, हे तिने दाखवून दिले. अशा अनुभवातून काय शिकायला मिळाले याचा प्रतिसाद देणे-घेणे हे मग ‘स्क्रीन’समोरच्या वेळेत करायला हवे. ही पूरकता शिकण्याची प्रक्रिया अधिक सुकर करेल. 

केवळ बघे आणि श्रोते निर्माण न करता ‘कर्ते’ही घडवायचे आहेत. ते शिक्षणाचे प्रयोजनही आहे. हे प्रयत्न करतानाच नवी डिजिटल दरी निर्माण होऊ नये, यासाठी सरकारला जबाबदारी उचलावी लागेल. ग्रामीण व दुर्गम भाग, तसेच अत्यंत गरीब आर्थिक स्तरातील विद्यार्थी हे आधुनिक साधने हाताशी नसल्याने शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत, हे पाहायला हवे. त्यासाठीही कल्पक  योजना तयार कराव्या लागतील. कस पाहणारा असा हा सर्वांच्याच शिकण्याचा काळ आहे, तो याच वेगवेगळ्या संदर्भांत.

Edited By - Prashant Patil

loading image