अग्रलेख : वैधानिक इशारा!

अग्रलेख : वैधानिक इशारा!

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर कोरोनाच्या सावटाखाली मार्चमध्ये अवघ्या २१ दिवसांसाठी जारी झालेली ठाणबंदी वाढता वाढता वाढे या न्यायाने वाढतच गेली. स्वातंत्र्यदिनाचा सोहळाही विषाणूने जेरबंद केलेल्या अवस्थेत साजरा करणे नशिबी आले. कायम मोठ्या धामधुमीत पार पडणारा गणेशोत्सवही याच विषाणूच्या भीतीपोटी संयमाने आणि निग्रहाने घरातल्या घरातच साजरा झाला. गणेशोत्सवाइतकाच लोकांच्या उत्साहाला उधाण आणणारा सण म्हणजे नवरात्र. यंदा या नवरात्रीतही गरबा साजरा करण्यास बंदी घालणे सरकारला भाग पडले असतानाच, आता घटस्थापनेला अवघा पंधरवडा उरला असताना, केंद्र तसेच राज्य सरकारने सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले अनेक दरवाजे उघडण्यासंबंधात घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच करायला हवे. त्यातील सर्वांत महत्त्वाचे दार हे उपाहारगृहांचे आहे. देशभरातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, पुणे यांसारखी महानगरेच नव्हे, तर नोकरी-धंद्यानिमित्ताने परगावी राहणाऱ्या अनेकांची मोठीच पंचाईत उपाहारगृहे बंद असल्याने झाली होती. केवळ हे लोकच नव्हे, तर या बंदीमुळे व्यवसायाची वाट लागत असल्याने रेस्टॉरंट तसेच बार आणि फूड कोर्टचे मालकही, टप्प्याटप्प्याने ठाणबंदी उठवण्यास सुरुवात झाल्यापासून ‘खुल जा सिम सिम!’ असा मंत्र जपत होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र सरकारने बुधवारी आपल्या ‘मिशन बिगीन अगेन’ मोहिमेच्या पाचव्या टप्प्यासंबंधातील मार्गदर्शक सूत्रे जाहीर करताना हे दार उघडल्याने अनेकांची सोय होणार आहे. लहान-मोठ्या उपाहारगृहांबरोबरच आता बडी रेस्टॉरंट्‌स तसेच ‘बार’ही येत्या सोमवारी आपले दरवाजे उघडतील. अर्थात, यापैकी कोठेही आसनक्षमतेच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा वर्दळ वाढणार नाही, याच्या दक्षतेची जबाबदारी उपाहारगृहांच्या व्यवस्थापनावर टाकली आहे. मात्र, लोकांनीही आता ‘हॉटेले उघडली, चला बसू या!’ असा अतिरेक करता कामा नये. गेल्या महिनाभरात दुकाने तसेच अन्य काही व्यवसायांना परवानगी देताच तसेच कार्यालयांमधील उपस्थितीचे प्रमाण वाढवताच, लोकांनी केलेली अतोनात गर्दी, ‘मास्क’ला दिलेली तिलांजली आणि सामाजिक दुरस्थतेच्या नियमांचा उडवलेला फज्जा यामुळे सरत्या महिन्यातच देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. ही बाब लक्षात घेऊनच कोरोनोत्तर काळातील जीवन अधिक संयमाने आणि सामाजिक हित लक्षात घेऊनच सुरू करावे लागणार आहे. 

गेल्या सहा महिन्यांतील या ठाणबंदीमुळे केवळ हॉटेल व्यवसाय नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रांपासून ते चित्रपटगृहांपर्यंत अनेक क्षेत्रे कोलमडली आहेत. त्यातच गर्दी आणि त्यामुळे होणारी संसर्गाची वेगवान लागण यामुळे मुंबई महानगराची जीवनवाहिनी असे बिरूद लाभलेली उपनगरी रेल्वेसेवाही सर्वसामान्यांसाठी बंदच आहे. आता सिनेमागृहेही आसनक्षमतेच्या ५० टक्‍के उपस्थितीवर खुली करण्याचा तसेच जलतरण तलावही त्याच क्षमतेने क्रीडापटूंसाठी खुले करण्यास केंद्राने मुभा दिली आहे. तसेच १५ ऑक्‍टोबरनंतर म्हणजेच घटस्थापनेच्याच मुहूर्तावर शाळा-कॉलेजेही सुरू होऊ शकतात, असे केंद्रीय गृहखात्याचे आदेश आहेत. मात्र, महाराष्ट्रात शाळा-कॉलेजे तसेच चित्रपटगृहे यांची दारे ही किमान ३१ ऑक्‍टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र, पुणे परिसरातील उपनगरी रेल्वे सेवाही सुरू झाल्याने मग मुंबईकरांचे काय, असा प्रश्‍न आहे.

मुंबईत मध्य रेल्वेच्या १७७४, तर पश्‍चिम रेल्वेच्या १३६७ फेऱ्या कोरोनापूर्व काळात होत. मध्यंतरी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली असली, तरी प्रमाण मात्र अत्यल्प आहे. सध्या मध्य रेल्वेच्या २४ टक्‍के (४२३ फेऱ्या) होत आहेत तर पश्‍चिम रेल्वेची उपनगरी वाहतूक ३७ टक्‍के (५०६ फेऱ्या) होत आहे. त्यात १५ ऑक्‍टोबरनंतर वाढ होण्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सूचित केले आहे. अर्थात, उपाहारगृहे असोत की अन्य व्यापारउदीम जर सुरळीतपणे चालवायचा असेल तर त्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई या पट्ट्यातील रेल्वे वाहतूकही जवळपास पूर्ण क्षमतेने सुरू करावी लागेल. या सेवेअभावी सरकारी तसेच बॅंका, न्यायालये आदी कार्यालयांमधील कर्मचारी तसेच तेथे कामकाज असलेली जनता यांचे अतोनात हाल होत आहेत. उपनगरी रेल्वे सेवा सुरू होताच, गर्दी एकदम वाढणार हेही स्पष्ट आहे. या पार्श्‍वभूमीवर केव्हा ना केव्हा सरकारला ठोस निर्णय घ्यावाचे लागतील. 

कोरोनाच्या सावटाखालील प्रारंभीच्या काळात सरकारने काही पावले खंबीरपणे उचलली. लोकांनीही ते निर्बंध कसोशीने पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता बंद दरवाजे हळूहळू का होईना उघडले जात असताना, लोकांचेही हे निर्बंध झुगारून देण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा वैधानिक इशारा ओळखून वागावे लागेल. आता आपल्याला किमान मास्क, सामाजिक दूरस्थता, तसेच सॅनिटायझरचा वापर या जीवनावश्‍यक बाबी झाल्या आहेत, हे लक्षात घेऊन सावधपणे वावरावे लागणार आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com