अग्रलेख : देहावरली त्वचा आंधळी...

louise gluck
louise gluck

अमेरिकी कवयित्री लोइस ग्लुक यांना यंदाचा साहित्यातील नोबेल सन्मान जाहीर झाला, तेव्हा जगभरातले साहित्यवर्तुळ काहीसे स्तिमित झाले असणार. कारण हे नाव तसे अनपेक्षितच म्हटले पाहिजे. गेली काही वर्षे बंडखोर, सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने मुखर होणाऱ्या कविश्रेष्ठांकडेच नोबेल पुरस्काराचा मान चालून जाताना दिसला आहे. गेल्या दोन वर्षांत लागोपाठ ओल्गा तोकारचुक आणि पीटर हॅंडकेसारख्या बंडखोर किंवा मर्यादित अर्थाने वादग्रस्त म्हणा हवे तर- साहित्यिकांना सन्मानित करून नोबेल निवड समितीने बराच वादंग ओढवून घेतला होता. यंदा मात्र हा सन्मान ज्येष्ठ कवयित्री ग्लुक यांच्या कपाटात गेला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्लुक यांची कविता काही बंडखोर किंवा क्रांतिबिंतीची फुले फुलवणारी वगैरे नाही. ती त्यांच्या कवितेची जातकुळीच नाही. ऐहिकातल्या गोष्टींचीच दखल घेत, जाता जाता पौराणिक दंतकथा आणि काव्यकल्पनांना स्पर्श करत वैश्विक अवकाशालाच हात घालू पाहणारी त्यांची कविता इंग्रजी साहित्य वर्तुळाला गेली पन्नास वर्षे सुपरिचित आहे. ग्लुकबाईंच्या कविता अगदी घराघरांत पोचल्या आहेत, असेही म्हणता येणार नाही.

तरीही अस्सल अमेरिकी वळणाच्या घरगुती अनुभवांतून उमटलेली जाणीव बघता बघता जगदाकार होतानाचा अनुभव त्यांच्या बव्हंशी कवितांमधून मिळतो. त्यात शब्दालंकृती किंवा चमत्कृती असते असेही नाही. थेट शब्दांनी साधलेले ते अनुभूतीचे विच्छेदनच असते. उदाहरणार्थ त्यांच्या ‘माय मदर्स फोटोग्राफ’ या कवितेतल्या चार ओळी : ‘तिरक्‍या नजरेने चोरटेपणाने पाहणाऱ्या तेरेझभोवती वडलांच्या हाताचा विळखा...आणि माझ्या चिमुकल्या तोंडात चिमुकला आंगठा...आळसट वृक्षसावलीत पेंगणारा स्पॅनियल (कुत्रा.)...आणि हिरवळीपल्याड, कॅमेऱ्याच्या पल्याड डोळा लावून उभी आई...’ लोइस ग्लुक यांनी उभ्या केलेल्या या चित्रचौकटीतून एक मौन प्रतिक्रिया उमटते. हा आईने काढलेला फोटो आहे की आणखी कुणी, हे आपोआप कळून जाते.

ग्लुक यांनी नेहमीच्या जीवनातील वस्तू आणि वास्तव काव्यात वापरत त्याचे परिमाण बदलून टाकले. या कवितेला अमेरिकेतील वैचारिकांमध्ये आणि जाणकारांमध्ये नि:संशय पहिल्यापासूनच वरचे स्थान आपापत: मिळाले होते. पण अन्य बंडखोर किंवा विस्थापितांचे हुंकार ऐकवणाऱ्या कवींच्या कवितांची भाषांतरे अन्य भाषांमध्ये झाली, तसे काही ग्लुक यांच्याबाबत फारवेळा घडले नाही. कारण बरीच वर्षे त्यांची कविता ही अमेरिकी जीवनबंधातच बंदिस्त राहिली होती. तसे पाहू गेल्यास ‘पुलित्झर’पासून जवळपास सर्व जागतिक सन्मान ग्लुकबाईंना वेळोवेळी मिळाले आहेत.

अनेक विचारपीठांकडून मानसन्मान लाभले आहेत. पण तरीही त्याला जागतिक परिमाण इतक़्या उशिरा का मिळाले, हे एक नवलच मानायला हवे. त्याअर्थाने ग्लुकबाईंच्या कविता या प्रस्थापितांच्या वर्गातल्याच म्हणता येतील. ग्लुकबाईंच्या काव्यसंभारातला हा देहविदेहाचा खेळ अचूक हेरून ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने त्यांना ‘द बॉडी आर्टिस्ट’ अशी सादर उपाधी दिली होती. खरेतर शारीर अनुभूतीतच वैश्विकतेचे दर्शन घडवणाऱ्या कविता हा काही नवा प्रकार नाही. देशोदेशींच्या कवितांमध्ये हे दर्शन झाले आहे. ऊर्दू शायरीत तर याची उदाहरणे मुबलक सापडतील.

कविता ही मूलत: वैयक्तिक असते. एखादी जाणीव विजेसारखी आसपास चमकते. ती पकडण्याच्या खटाटोपात हात भाजण्याचे भय! पण प्रतिभावान कवी त्याच विजेला शब्दरूप देतो. कविवर्य ग्रेस यांच्या शब्दात सांगायचे तर ‘क्षितिज जसे दिसते, तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी, छिलून घ्यावी कोणी...’ ही कवितेची ईर्ष्या असते. लोइस ग्लुक यांची कविता सर्वसाधारणत: अशाच प्रकारची अनुभूती देते. ‘पर्सिफानी द वाँडरर’ या शीर्षकाची त्यांची एक गाजलेली कविता आहे. पर्सिफानी ही ग्रीक देवता.

अन्नधान्याची, झाडाफुलांची देवता. मृत्यूदेव हेदिसने तिचे अपहरण करून पाणिग्रहणही केले. या पर्सिफानीच्या दंतकथेत लोइस ग्लुक यांना आताच्या स्त्रीत्वाची संवेदना सापडली. पर्सिफानीचे रुपक त्यांनी अनेक कवितांमध्ये वापरलेले आढळते. अशा दंतकथांमध्ये दडलेल्या वर्तमानातील संवेदनांचे विच्छेदन ग्लुकबाईंनी कवितेतून केलेच, पण लघुनिबंधांमधूनही केले. येल विद्यापीठात त्या आजही सर्जनशील साहित्यनिर्मिती हा विषय शिकवतात.

विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कोंडाळ्यात बसून गप्पाष्टके रंगवतात. नवनवीन कवितांचे, लेखांचे अभिवाचन करतात आणि उत्तम स्वयंपाकही करतात. ग्लुकबाईंना यंदा आपल्याला ‘नोबेल’ मिळणार याची सुतराम कल्पना नव्हती. ‘मला वाटलं की हुकलंच ते आता कायमचं!’ अशी गंमतीशीर प्रतिक्रिया त्यांनी दिली. एरवी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात स्टॉकहोममध्ये एक भारदस्त कार्यक्रम झाला असता. मोजक्‍या निमंत्रितांसमोर स्वीडनचे सोळावे सम्राट गुस्ताफ यांनी ग्लुकबाईंना ‘नोबेल’ सन्मान समारंभपूर्वक बहाल केला असता.

परंतु, यंदा ‘कोरोना’ महामारीने सारेच बदलून टाकले आहे. यंदा हा समारंभ होणार नाही. ग्लुकबाईंना हा पुरस्कार दूरस्थ पद्धतीनेच प्रदान केला जाईल. हादेखील काव्यगत न्याय. घरगुती जीवनात वैश्विकतेच्या खुणा शोधणाऱ्या कवयित्रीला एक वैश्विक पुरस्कार घरगुती स्वरूपात स्वीकारावा लागणार!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com