अग्रलेख : दसऱ्याचे फटाके!

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

शिवसेनेच्या गेल्या पाच-साडेपाच दशकांच्या इतिहासात यंदाचा दसरा अनेकार्थांनी आगळा-वेगळा होताच; शिवाय त्यात एकाचवेळी मुख्यमंत्री आणि ‘पक्षप्रमुख’ असा डबल रोल करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी जणू फटाक्‍यांच्या हजाराच्या माळा लावून आसमंत दणाणून सोडला. शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या या मेळाव्याचे एक वैशिष्ट्य तिथे शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाच्या वेळी कडाडणाऱ्या हजाराच्या माळा हे असे. यंदा कोरोनाच्या सावटाखाली हा मेळावा याच शिवाजी पार्क मैदानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सावरकर स्मारकात झाल्यामुळे तेथे प्रत्यक्षात फटाक्‍यांच्या लडी फुटण्याची शक्‍यता बिलकूलच नव्हती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, ती उणीव उद्धव ठाकरे यांनी लवंगी फटाक्‍यांपासून थेट ॲटमबॉम्बपर्यंत आणि भुईचक्रापासून बाणापर्यंत अनेक शाब्दिक फटाके उडवत भरून काढली. एकीकडे मुख्यमंत्रिपदाचा बाज सांभाळायचा आणि त्याचवेळी शिवसेनेची आक्रमकताही कायम राखायची, असे हे दुहेरी आव्हान त्यांनी लीलया पेलले. महाविकास आघाडी सरकारात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांच्याबरोबर गेल्याने शिवसेना शेळपट, नेभळी आणि सेक्‍युलर झाली काय, या आरोपांना त्यांनी आपली देहबोली तसेच आक्रमक वक्‍तृत्व यांतून खणखणीत उत्तरे दिली. गेल्या १०-११ महिन्यांत बाळासाहेबांचा शिवसैनिक इतका मरगळलेला कसा आणि टोकाचे आरोप झाल्यानंतरही तो थंड कसा, असा प्रश्‍न विचारला जात होता. या शिवसैनिकांमध्ये जान आणण्याचे काम उद्धव यांच्या या भाषणामुळे झाले, यात शंकाच नाही. शिवसेना तसेच स्वत: उद्धव ठाकरे यांच्यासाठी यंदाच्या या दसरा मेळाव्याची ही सर्वांत मोठी फलश्रुती आहे.

काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी केल्यामुळे शिवसेनेची ‘सोनिया सेना’ म्हणून संभावना करण्यात भारतीय जनता पक्षाचे गल्लीबोळातील प्रवक्‍ते आघाडीवर होते. त्याचवेळी ‘शिवसेनेने हिंदुत्वाचा भगवा आपल्या खांद्यावरून खाली उतरवला असून, आता खरे हिंदुत्ववादी ते आम्हीच,’ असेही संधी मिळेल तेव्हा राज्यातील भाजप नेते दाखवून देत होते. त्या वादात अखेरीस राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनीही उडी घेतली आणि आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘तुम्ही सेक्‍युलर तर झाला नाहीत ना?’ असा खोचक आणि राज्यघटनेचा अनादर करणारा थेट सवाल विचारला होता. उद्धव ठाकरे यांनी कोश्‍यारी यांचा प्रत्यक्ष नामोल्लेख  न करता काळी टोपी घालणारे, अशा शब्दांत केला. अशा प्रकारे बोचकारे काढत आणि मर्मी घाव घालत वार करणे, हेच बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य असे.

उद्धव यांची शैली मवाळ आहे. मात्र, महाआघाडीत गेल्यानंतर ती अगदीच गुळगुळीत आणि पुचाट झाली आहे, अशी टीका गेले १०-११ महिने करणाऱ्यांना त्यांनी या मेळाव्यातून गप्प केले. त्याचवेळी सदासर्वदा उद्धव ठाकरे आणि त्यांचे सरकार यांच्यावर ग्राम्य भाषेत ओरखडे काढणारे नारायण राणे तसेच त्यांचे दोन चिरंजीव यांचीही नावे न घेता, बेडूक आणि त्याची दोन मुले अशी गोष्ट सांगत त्यांनी शिवसैनिकांच्या भावना बोलून दाखवल्या. त्यातून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेही  सुटले नाहीतच; शिवाय थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘दिवे लावा, टाळ्या, घंटा वाजवा!’ आदी उपक्रमाचीही त्यांनी थेट शिवसेनेच्या भाषेत खिल्ली उडवली आणि ते करताना, ‘हे सरकार पाडून दाखवाच!’ असे खुले आव्हान भाजपला दिले. शिवसैनिकांच्या थंड झालेल्या मानसिकतेत ठिणगी टाकण्याचे काम या भाषणातून नक्‍कीच झाले, असे त्यामुळे सहज  म्हणता येते. 

मुख्यमंत्रिपदाचा मास्क काही काळ खाली उतरवून आपण बोलणार आहोत, असा डिसक्‍लेमर त्यांनी सुरुवातीलाच देऊन टाकला होता. त्यामुळेच शिवसेनेवरील विखारी टीकेस थेट त्याच भाषेत उत्तरे देत त्यांनी मेळाव्यात राजकीय रंग भरले. 

अर्थात, मुख्यमंत्री या नात्याने आलेली जबाबदारीही उद्धव विसरले नव्हते. गेले काही महिने कोरोनाशी सुरू असलेल्या लढाईमुळे राज्य आर्थिक संकटात सापडले आहे. जीएसटीचा परतावा मिळत नसल्यामुळे मोठ्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पंतप्रधानांनी या करप्रणालीत एक तर दुरुस्ती तरी करावी वा ते शक्‍य नसल्यास हा कायदाच रद्द करावा, अशी मागणी केली. या मागणीच्या पूर्तीसाठी देशभरातील मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्याचे आवाहन करून, त्यांनी हा मेळावा आणि त्यातील भाषण हे थेट देशपातळीवरची बातमी होईल, याचीही जातीने काळजी घेतली. हे सारे शिवसैनिकांनाच नव्हे तर शिवसेना तसेच हे सरकार यांच्या समर्थकांना हवे-हवेसेच होते. एकंदरीत, हा दसरा मेळावा आगळा-वेगळा ठरला, तो उद्धव ठाकरे यांची आक्रमक शैली आणि भाजपवर केलेले थेट वार यामुळेच.

शिवाय, त्यामुळेच राज्यात पुन्हा काही नवी समीकरणे वा भाजप-सेना युती यासंबंधात रोजच्या रोज नवनव्या पुड्या सोडणाऱ्यांना तूर्तास तरी चांगलीच चपराक बसली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com