अग्रलेख : चंदेरी दुनियेवर डोळा

Bollywood
Bollywood

समुद्रमंथनात हाती लागलेल्या चौदा रत्नांपैकी एक म्हणजे कल्पवृक्ष, तो देवादिकांनी लांबवला. तो हस्तगत करून देवाधिदेव इंद्रदेवाने मेरूपर्वतावरील नंदनवनात रुजवला. इच्छेचे फळ देणाऱ्या या कल्पतरूसाठी दानवांनीही प्रचंड संघर्ष केला, अशा आख्यायिका पुराणात सापडतात. आख्यायिकाच त्या... इच्छा फलद्रुप करणारा कल्पवृक्ष वगैरे चमत्कारी गोष्टी आख्यायिकांमध्येच शोभणाऱ्या, मर्त्यलोकात त्याची काय मातब्बरी? पण, असा इहलोकीचा एक कल्पवृक्ष चंदेरी दुनियेच्या रूपाने महाराष्ट्राच्या अंगणात उभा आहे आणि तो समूळ उपटून आपल्या परसदारी नेऊन लावण्यासाठी काही राज्ये धडपडत आहेत, अशी वर्तमानातली ‘आख्यायिका’ सांगते  आहे!

आता चंदेरी दुनिया ऊर्फ बॉलिवूड हा कल्पवृक्ष आहे, असे मानणे थोडेसे अतिशयोक्त होईल, हे खरेच. पण, सध्या त्यासंदर्भात चाललेले उलटसुलट आरोप-प्रत्यारोप पाहता चर्चेपुरते घटकाभर खरे मानून चालायला हरकत नसावी. ही बॉलिवूड नावाची चीज मुंबई महानगरीत गेली जवळपास ११० वर्षे रुजलेली आहे. तिची पाळेमुळे घट्ट रोवून फोफावते आहे. अर्थात, घराणेशाही, अमली पदार्थ, ढिली नीतिमत्ता, पैशासाठी वाट्टेल त्या थराला जाणारे व्यवहार, उधळपट्टी, ग्लॅमरची चमकधमक , मसालेदार गॉसिप, अशा एक ना हजार गोष्टींनी आपली चित्रसृष्टी विविध मार्गांनी चर्चेत असतेच. किंबहुना, पडद्यावरल्या कलाकृतींच्या विशुद्ध रसग्रहणापेक्षा या असल्या गोष्टींचीच चर्चा इथे अधिक होत असते. सध्या तर त्यास अगदी ऊत आला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याला कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा, ही मायानगरी मुंबईतून पळविण्याचा कथित इरादा! त्यासाठी त्यांनी बृहद नोयडा भागात, यमुना एक्‍स्प्रेस वेच्या काठाला एक हजार एकर जागा मुक्रर करून अवघे बॉलिवूड तेथे आणून वसविण्याचा घाट घातल्याचे वृत्त आहे. याचाच दुसरा अर्थ असा, की बॉलिवूड ही काही मुंबईची मक्तेदारी नाही. स्वस्त चित्रीकरण, अद्ययावत सुविधा, अत्याधुनिक यंत्रणा, असे सारे उभे करून दिले की झाले! बॉलिवूडमध्ये बस्तान बसविलेली मंडळी मुंबईला ‘राम राम’ ठोकून उत्तर प्रदेशात येऊन ‘जय सियाराम’ म्हणतील, असा काहीसा हा समज आहे. म्हटले तर, ही एक हास्यास्पद आयडिया आहे आणि म्हटले तर, एक धाडसी औद्योगिक पाऊल. ते नेमके काय आहे, हे येणारा काळ ठरवेलच.

सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की बॉलिवूड हे एक एखादे सफरचंद नव्हे, की पेटीत घातले आणि दुसरीकडे नेले. किंवा तो काही मोटारींचा अवाढव्य कारखानाही नव्हे, की बंगालमधल्या सिंगूरमधून आवरला आणि गुजरातेत आणून वसविला. गेली शंभराहून अधिक वर्षे विकसित होत असलेली बॉलिवूड ही एक संकल्पना आहे. ती मुंबईचा अविभाज्य अंग बनली, त्यामागेही काही भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. कुण्या मुख्यमंत्र्याला किंवा धनवंत उद्योजकाला वाटले म्हणून हलवता येण्यासारखी ती वस्तू नव्हे. दादासाहेब फाळके किंवा दादासाहेब तोरणेंसारख्या प्रतिभावंत लोकांनी मुंबई-कोल्हापुरात चित्रसृष्टीची मुहूर्तमेढ रचली, त्यामागे एक लखलखीत इतिहास आहे, तो आधी मुळातून तपासला की सध्याची चर्चा किती फोल आहे, ते लगेच कळून येते.

ब्रिटिशांच्या काळात मुंबईत चित्रसृष्टीचे बस्तान बसले. चित्रपटनिर्मात्यांसाठी मुंबई ही नेहमीच तांत्रिकदृष्ट्या आधुनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सोयीची नगरी राहिली आहे. फाळणीच्या विदारक अनुभवातून आपला देश गेला, त्यानंतर तर या चित्रसृष्टीने इथे चक्क बाळसे धरले. याला कारणीभूत आहे ती इथली ‘काम से काम’ ठेवणारी, कार्यमग्नतेला प्राधान्य देणारी जातिधर्मविहीन मानसिकता आणि त्यातून उमटलेली चित्रपटसृष्टीची स्वत:ची अशी कार्यसंस्कृती. ती अनेक दशकांच्या कार्यप्रवाहात विकसित झालेली आहे. भौतिक गोष्टी उपलब्ध झाल्या, तरी अशा कार्यसंस्कृतीचे विकसनच व्हावे लागते, त्याला कुठलाही शॉर्टकट नसतो. कल्पवृक्षाच्या पुनर्रोपणाची मोहीम राबविणाऱ्यांनी याचाही विचार करायला हवा. हैदराबादेत ‘रामोजी सिटी’ उभी राहिली काय किंवा मॉरिशसच्या सरकारने भरघोस सवलती जाहीर करून हिंदी चित्रकर्मींना आमंत्रण दिले काय; शेवटी बॉलिवूड आहे तिथेच आहे व तेथेच राहील, हे लक्षात घ्यायला हवे.

आजही हिंदीतील कित्येक चित्रपट किंवा वेबमालिकांचे चित्रीकरण गाझियाबाद, धनबाद, अयोध्या, लखनौ, दिल्ली, आदी उत्तरेतील शहरांमध्ये होत असते. पण, असे असले तरी त्यांमध्ये बॉलिवूडचीच प्रसिद्ध निर्मितीमूल्ये असतात. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर मुंबईतली चंदेरी दुनिया उत्तरेत नेण्याची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी चित्रनिर्माते आणि दिग्दर्शकांच्या गाठीभेटींचा सपाटा लावला आहे. या नव्या ‘मंथना’तून एखादे उत्तम निर्मितीस्थळ उत्तरेत उभे राहीलही; किंबहुना तसे ते उभे राहिले, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. तिथे बॉलिवूड किंवा कदाचित हॉलिवूडची मंडळीही येऊन आपल्या कलाकृती निर्माण करतील. पण, त्याचा अर्थ बॉलिवूडचा पत्ता बदलला, असा होणार नाही. कल्पवृक्षाला पोस्टल ॲड्रेस नसतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com