esakal | अग्रलेख : जिज्ञासेचा अवकाश
sakal

बोलून बातमी शोधा

Space

‘वसुधैव कुटुंबकम्‌’ ही उक्ती पृथ्वीवर जरी माणूस प्रत्यक्षात साकारू शकला नाही, तरी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाद्वारे (आयएसएस) त्याने ती प्रतीकात्मक स्वरूपात का होईना प्रत्यक्षात उतरविल्याचे निदर्शनाला येते. या स्थानकाने मंगळवारी (ता. २) द्विदशकपूर्ती  साधली. अमेरिका, रशिया, कॅनडा, जपान यांच्यासह युरोपातील ११ देशांच्या समावेशाच्या ‘युरोपीय स्पेस एजन्सी’ यांच्या सहभागाने आणि दीडशे अब्ज डॉलरच्या खर्चातून ते आकाराला आले.

अग्रलेख : जिज्ञासेचा अवकाश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘वसुधैव कुटुंबकम्‌’ ही उक्ती पृथ्वीवर जरी माणूस प्रत्यक्षात साकारू शकला नाही, तरी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाद्वारे (आयएसएस) त्याने ती प्रतीकात्मक स्वरूपात का होईना प्रत्यक्षात उतरविल्याचे निदर्शनाला येते. या स्थानकाने मंगळवारी (ता. २) द्विदशकपूर्ती  साधली. अमेरिका, रशिया, कॅनडा, जपान यांच्यासह युरोपातील ११ देशांच्या समावेशाच्या ‘युरोपीय स्पेस एजन्सी’ यांच्या सहभागाने आणि दीडशे अब्ज डॉलरच्या खर्चातून ते आकाराला आले. पहिल्या मोहिमेत अमेरिकी आणि रशियन अंतराळवीर एकत्रितरीत्या तेथे १३६ दिवसांच्या वास्तव्याला गेले. पृथ्वीच्या वर अंतराळात सुमारे २५० मैलांवर, तासाला सतरा हजार किलोमीटर वेगाने हे स्थानक पृथ्वीप्रदक्षिणा करते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आत्तापर्यंत १९ देशांतील २४१ अंतराळवीरांनी तेथे वास्तव्य करून अनेकविध प्रयोग केले. २२७ स्पेसवॉकने त्याची निर्मिती, डागडुजी केली. फक्त महिलांनीच स्पेसवॉक केल्याचा विक्रम गेल्या वर्षी झाला. १०८ देशांतील शास्त्रज्ञ, संशोधकांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यावर अभ्यास व संशोधन केले. अंतराळ विज्ञान, जीवशास्त्र, मानवी आरोग्य, भौतिकशास्त्र, क्वांटम मेकॅनिक्‍स, जनुकीय बदल, गुरुत्वाकर्षण आणि अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण अशा अनेक बाबींचा यात समावेश आहे. असे प्रचंड खर्चीक प्रयोग आणि त्याचे होणारे बरे-वाईट परिणाम याबाबत मतभेद, वाद, चर्चा होऊ शकते. तरीही जिज्ञासा आणि नावीन्याच्या शोधासाठी उपजतच झपाटलेल्या माणसाला कधी स्वस्थ बसवणार नाही, हेदेखील खरेच.

अवकाशाचे अंतरंग आणि समुद्राचा तळ दोन्हीचेही त्याला कायमच आकर्षण राहिलेय. अनेकदा फॅन्टसी किंवा मानवी कल्पनेच्या मायाजालातून निर्माण होणाऱ्या स्वप्नवत बाबींतूनच कधीतरी संशोधनाला दिशा मिळते. विज्ञानाच्या संशोधनांच्या बळावर माणसाने नवनिर्मितीची, प्रगतीची शिखरे गाठली.

आकाशात पक्ष्याप्रमाणे विहरणे आणि अंतराळात डूब घेत त्याचे अंतरंग शोधणे, हे साध्या नजरेपासून ते महाकाय दुर्बिणी आणि उपग्रहांच्या मोहिमांनी गतिमान झाले. तसाच हा अंतराळ स्थानकाचा प्रयोग. संशोधनासाठी अनेक देशांनी मतभेद, वैरभाव दूर सारून एकत्रित येणे नव्या पर्वाची नांदीच. त्यांच्या नागरिकांनी अंतराळातील संयुक्त वास्तव्यातून जगण्याच्या रूढी, परंपरा, विचारसरणी दूर सारून मानवतेच्या भवितव्यासाठी नव्या संधींचा शोध घेणे, या नजरेतून या प्रयोगाकडे पाहिले पाहिजे. शीतयुद्धानंतर पहिल्यांदा दोन महासत्तांसह इतर महत्त्वाचे देश यानिमित्ताने एकत्र आले. 

अंतराळ वसाहतीपासून ते चंद्र आणि मंगळ यांवर वसाहती, अवकाशात कायमस्वरूपी वास्तव्यासाठीच्या शक्‍यतांचा वेध घेतला जातोय. तेथे जगताना आहार, विहार, निद्रा, आरोग्य, पाणी व अन्न यांच्या गरजा भागवणे आणि तिथल्या परिस्थितीत त्यांची निर्मिती, मानवी व्यवहारापासून ते सहजीवनातले बदल अशा अनेकानेक आयामांवर यानिमित्ताने अभ्यास केला गेला. शिवाय, प्रोटीनच्या स्फटिकांपासून औषधनिर्मिती, पाण्याचे शुद्धीकरण, स्मृतिभ्रंश, कंपवात, कर्करोगापासून अंतराळातील वास्तव्याने हाडे, स्नायूंचे येणारे आजार, गुरुत्वाकर्षणाचे दैनंदिन व्यवहारांवर होणारे परिणाम आणि ते दूर करणे, अशा कितीतरी बाबींवर संशोधनाची संधी साधता आली. याच अंतराळ स्थानकातून क्‍युबसॅट सोडणे शक्‍य असल्याने आत्तापर्यंत अडीचशेवर क्‍युबसॅट अंतराळात सोडले. त्याने संशोधनाला चालना मिळाली. या सगळ्या उपद्‌व्यापातून किती आणि काय हाती आले, त्याचे व्यापक स्वरूपात व्यावहारिक फायदे किती, यावर मतभेद निश्‍चित आहेत. कारण, एकट्या ‘नासा’ला या स्थानकाच्या देखभालीसाठी वर्षाला तीन-चार अब्ज डॉलर खर्च येतो. या मोहिमाही खर्चीक असल्या तरी मानवतेच्या भवितव्यासाठी दिलेली किंमत म्हटली पाहिजे. 

‘कोलंबिया’ आणि ‘चॅलेंजर’ या स्पेस शटलच्या अपघाताने आणि १४ अंतराळवीरांच्या मृत्यूने अमेरिकेच्या अवकाश मोहिमांना आणि संशोधनाला खीळ बसली होती. तथापि, उद्योगपती एलॉन मस्क यांच्या ‘स्पेस-एक्‍स’ मोहिमेने त्याला पुन्हा चालना मिळाली. अंतराळ संशोधनाविषयीच्या मोहिमा सुरुवातीला सरकारांनी सुरू केल्या. पण, आता यात खासगी कंपन्याही उतरत आहेत. मस्क यांच्या जोडीलाच ‘ॲमेझॉन’चे सर्वेसर्वा जेफ बेझोस हेही ‘ब्लू ओरिजीन’द्वारे अंतराळ सफर घडवणे, तेथे वास्तव्य अशा अनेक बाबींवर संशोधन आणि मोहिमांवर भर देताहेत. बेझोसना अंतराळात तर मस्कना मंगळावर वसाहत करायची आहे. कोणताही दूरदर्शी उद्योजक, व्यवसायिक पैसा मिळवण्याच्या नवनव्या संधी, गुंतवणुकीचे मार्ग, कधीही कोणी न केलेले उद्योग शोधत असतो. व्यवसायविस्ताराची ती गरज जगातल्या या श्रीमंतांना आता अंतराळात घेऊन जात आहे. हा सगळ्या अनिश्‍चिततेचा पण प्रयोगशीलतेचा खर्चीक मामला आहे, तरीही तिथे पैसे लावायला ते तयार होतात, याचा अर्थ माणसाच्या विकासाचे नवे पर्व कदाचित त्यांना खुणावत असावे. आज त्यांच्या कल्पना स्वप्नवत, हॉलिवूडपटातील कथानकाला चपखल लागू पडणाऱ्या वाटत आहेत. तथापि, पंधराव्या, सोळाव्या शतकात भांडवलाच्या बळावर नवीन भूमीचा, व्यवसायाचा, खाणींचा शोध घेत माणसाने पृथ्वीचा कोनाकोपरा धुंडाळला आणि साम्राज्य निर्माण केले. त्याचाच हा पुढील टप्पा ठरू शकतो.

Edited By - Prashant Patil